पुराणकाळात ‘प्राग्जोतिशपूर’ म्हणून ओळखला जाणारा भूभाग, साधारण चौथ्या शतकापासून ‘कामरूप’ म्हणून नावारूपाला आला. पुढे अहोम साम्राज्यामुळे अलीकडचे प्रचलित नाव लाभलेला प्रदेश म्हणजे आताचा आसाम. ईशान्य भारताचे प्रवेशद्वार! आसाम म्हटले की, लगेच चहाचे मळे, काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातले एकशिंगी गेंडे आणि हत्ती, ब्रह्मपुत्र महानद नजरेसमोर येतात. याव्यतिरिक्त आसामची ओळख सांगणारे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे माँ कामाख्या मंदिर! या लेखातून माँ कामाख्याची महती आणि ईशान्य भारतातील या प्रमुख तीर्थक्षेत्राचा विकास यांचा घेतलेला हा आढावा...
पुराणकथेनुसार, दक्षाने केलेल्या यज्ञासाठी महादेवांना आमंत्रण दिले नाही आणि यज्ञस्थळी त्यांचा अपमान केल्याने माता सतीने त्याच यज्ञकुंडात उडी मारून आत्मदहन केले. महादेवांना हे समजल्यावर क्रोधायमान होत, आपल्या पत्नीचे अर्धवट जळलेले शरीर हातात घेऊन त्यांनी तांडव सुरू केले. महादेवांच्या कोपामुळे होऊ घातलेल्या विनाशापासून सृष्टीला वाचवण्यासाठी विष्णूंनी सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे जिथे पडले, तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. ‘प्रग्जोतिशपूर’च्या ‘नीलाचल’ टेकड्यांत सतीचा ‘योनी’ भाग पडला, त्याठिकाणी निर्माण झालेले शक्तिपीठ म्हणजे, माँ कामाख्या मंदिर! मातेच्या तीन महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक म्हणजेच, अपत्यनिर्मिती आणि तो करणारा अवयव म्हणजेच, ‘योनीमंडल’ येथे पडल्याने कामाख्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कामाख्या हे ‘शाक्तपीठ’ समजले जाते.
भारतातूनच नाही; तर जगभरातून तांत्रिक, अघोर आणि ‘शाक्त’ उपासक कामाख्या मंदिराला भेट द्यायला येतात. हिंदू मंदिर उपासनापद्धतीत, स्त्रीने मासिकधर्माच्या चार दिवसांत मंदिरात जाऊन पूजा करणे निषिद्ध मानले गेले आहे. मात्र, कामाख्या हे एकमेव मंदिर आहे, जिथे मासिकधर्माच्या काळातही स्त्रिया देवीदर्शनाला जाऊ शकतात. हे समजल्यावर अनेकांना धक्का बसतो. पण, कामाख्या मंदिर याच गोष्टीसाठी ओळखले जाते. स्त्रीच्या मासिकधर्माला इथे अत्यंत पवित्र समजले जाते. कारण, हा मासिकधर्म सृजनासाठी गरजेचा असतो. मातेच्या शरीराचा ‘योनी’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग इथे पूजेत असतो. दरवर्षी दि. २२ जून ते दि. २६ जून याकाळात इथे साजरा होणारा ‘अंबुबाची मेळा’ हे मातेच्या वार्षिक रजस्वला काळाचे प्रतीक असते. तीन दिवस, तीन रात्री हे मंदिर बंद असते. कारण, या काळात माता विश्राम करत असते. चौथ्या दिवशी वार्षिक शुद्धिकरण करून मंदिर भाविकांसाठी उघडले जाते. निसर्गात प्रत्येक मादी रजस्वला होते. तिचे रजस्वला होणे किळसवाणे नसून, जननासाठी गरजेचे असते, हा संदेश इथे मिळतो. कामाख्या मंदिरात देवीची कुठलीही पारंपरिक मूर्ती नसून, योनीसदृश आडवा दगड आहे. मंदिराच्या तळघरातल्या गुहासदृश गर्भगृहात माँ कामाख्या विसावली असून, इथे आत शिरल्याबरोबर जणू मातेच्या गर्भाशयात शिरल्याची भावना जागी होते. गुहेत असलेला नैसर्गिक ओलावा, देवीला वाहिलेला सिंदूर, लाल वस्त्रे आणि त्यातच पसरलेला प्रकाश याचे अवर्णनीय वातावरण गर्भगृहात तयार होऊन इथे गूढ आणि भारावलेपण जाणवते.
साधारण जूनच्या मध्यावर आसाममध्ये ‘अहर मास’ समजला जातो. याच अहर मासात कामाख्या मंदिराच्या गर्भगृहातला नैसर्गिक जलस्रोत चार दिवस प्रवाहित होतो. हा प्रवाह मातेचा रजस्वलाकाळ समजून त्याकाळात ‘अंबुबाची मेळा’ साजरा केला जातो. त्याकाळात मंदिर बंद असले, तरीही मंदिराच्या परिसरात हजारो तांत्रिक, अघोर आणि शाक्तपंथीय साधक साधनेसाठी जमा होतात. चौथ्या दिवशी वार्षिक शुद्धिकरणानंतर मंदिर भाविकांसाठी उघडले जाते. भाविकांना प्रसाद म्हणून मातेच्या अंगावरचे लाल वस्त्र, ज्याला ‘रक्तवस्त्र’ म्हणतात; गर्भगृहात वाहते झालेले पवित्र जल आणि मातेला वाहिलेला लाल सिंदूर दिला जातो. इथल्या सिंदुराचे वैशिष्ट्य म्हणजे, तो स्फटिकरूपात असतो. अंबुबाची मेळ्याच्या प्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रसादात मिळालेले रक्तवस्त्र घरी नेऊन वंशवृद्धीसाठी, कुटुंबसुखासाठी पूजेत ठेवले जाते. वर्षभर नजरेस न पडणारे तांत्रिक, ‘शाक्त’ साधक या पर्वणीकाळात मंदिरात येतात आणि हा विशेष प्रसाद सोबत घेऊन जातात.
कामाख्या मंदिर संकुलात दहा स्वरूपात माता पूजली जाते. काली, धुमावती, मातंगी, बगलामुखी, तारा, कमला, भैरवी, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी आणि त्रिपुरसुंदरी देवी मंदिरे इथे आहेत. याच जोडीला कामेश्वर, सिद्धेश्वर, केदारेश्वर, अमरटोकेश्वर, अघोर या पाच स्वरूपांत शंकराची आणि सौभाग्य मंदिर व पांडुनाथ या स्वरूपांत विष्णूची पूजा केली जाते.
कामाख्या मंदिराचा इतिहास अतिप्राचीन असून, हे मंदिर अनेकदा उद्ध्वस्त केले गेल्याने परत बांधले गेले. सर्वप्रथम ‘काला पहाड’ने हे मंदिर उद्ध्वस्त केल्याची नोंद मिळते. त्यानंतर १५६५ साली ‘कोच बिहार’ राजवटीच्या राजा चिलराईने मंदिराला बांधून काढले. त्यानंतर आसामवर राज्य करत असलेल्या अहोम सम्राटांनी या मंदिराचा विकास केल्याने या बांधकामांवर मिश्र छाप दिसून येते. मुस्लीमशासित बंगाल प्रांतातून आणलेल्या कारागिरांनी पूर्वेकडच्या हिंदूशैलीसोबत सरमिसळ करून बनवलेली शैली, इथूनच ‘नीलाचलशैली’ म्हणून प्रसिद्ध झाली. कामाख्या मंदिर या शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मुख्य गर्भगृह, मध्य मंडप यांनाच लागून असलेले आयताकृती सभागृह आणि नृत्य मंडप अशा चार भागांत मुख्य मंदिर विभागले आहे. साधारण साडेअकरा एकर भागात पसरलेल्या कामाख्या मंदिर परिसरात दिवे लावण्यासाठी, नारळ फोडण्यासाठी, धूप जाळण्यासाठी, बळी देण्यासाठी स्वतंत्र जागा आहेत. अनेक शतके, कामाख्या मंदिरात पूजा करायचा अधिकार फक्त ‘बोरदेऊरी’ समाजालाच आहे. इथे ‘बुर्हा बोरदेऊरी’, ‘देका बोरदेऊरी’, ‘होटा’ आणि ‘बिधीपाठक’ या चार पुजारी परिवार व कुटुंबातूनच वयस्कर पुरुषांची निवड पुजारी म्हणून केली जाते. यांना ‘दोलोई’ म्हटले जाते. या सर्व दोलोईंना मुख्य पुजारी निवडायचा अधिकार असतो. यांनी निवडलेल्या मुख्य पुजारी व्यक्तीला ‘बोर दोलोई’ म्हटले जाते.
२०२२ साली ईशान्य भारताच्या विकासासाठी पंतप्रधानांनी ‘पीएम डीव्हाईन’ (PM-DevINE ) योजनेचा श्रीगणेशा केला. ’Prime Minister's Development Initiative for North East Region’ अर्थात ’PM-DevINE’ ही ईशान्य भारताचा विकास करणारी महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने राबवायला सुरुवात केली, २०२२ ते २०२६ कालावधी असलेल्या या योजनेसाठी ६ हजार, ६०० कोटी रुपयांची पूर्णत: जबाबदारी केंद्राने उचलून ईशान्य भारताच्या विकासाला चालना दिली. या योजनेद्वारे ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने थेट केंद्रीय अर्थसंकल्पांत विशेष तरतुदी केल्या. ईशान्य भारतात वाहतूक, वीज, ऊर्जा, दूरसंचार सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा नियमित करण्यासाठी ईशान्य भारतातल्या सर्व राज्यांत विविध योजनांद्वारे महिला व तरुणांचे सक्षमीकरण, पर्यटनाला चालना, रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू झाले. या ‘पीएम डीव्हाईन’चा आणि कामाख्याचा काय संबंध? असा प्रश्न इथे पडू शकतो. देशाच्या अमृतकाळात आसामसाठी २०२४ साली ११ हजार कोटींची ‘माँ कामाख्या दिव्य लोक परियोजना’ पंतप्रधानांनी लोकार्पण केली. वाराणसी व उज्जैन मंदिरांच्या धर्तीवर माँ कामाख्या मंदिराचा विकास याच ‘पीएम डीव्हाईन’ योजनेअंतर्गत केला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत कामाख्या मंदिर परिसराचा कायापालट करण्यात येणार असून, सध्याच्या सुविधा वाढवण्यात येणार आहेत. अंबुबाची मेळ्यादरम्यान लाखो भाविकांच्या गर्दीसाठी विशेष नियंत्रण कक्ष, दर्शनाच्या विविध रांगा यांच्या नियोजनासाठी विशेष तजवीज करण्यात येत आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी लोकरूम्स, निवासव्यवस्था, सार्वजनिक भोजनशाळा, वाचनालये, विश्रामगृहे, मोठे हॉल, वैद्यकीय सुविधा कक्ष, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, प्रसाद वितरण कक्ष यांची निर्मिती करण्यात येणार असून, स्थानिक महिला व युवकांसाठी रोजगाराची निर्मिती त्यातून केली जातेय. जुन्या मंदिरांना धक्का न लावता त्यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. याच जोडीला ‘कामाख्या’ योजनेअंतर्गत ‘कामाख्या रोपवे’ निर्मितीची आखणी केली गेली आहे. या रोपवेमुळे
कामाख्या रेल्वे स्थानकापासून थेट नीलाचल टेकड्यांतल्या मंदिर परिसरात केवळ सहा मिनिटांत पोहोचता येणार आहे. सव्वादोनशे कोटींच्या या योजनेमुळे गुवाहाटी शहरावरचा वाहतुकीचा ताण कमी होणार असून, प्रदूषणाला आळा घातला जाणार आहे. या कामासाठी राज्य सरकारवर आर्थिक ताण न टाकता केंद्र सरकारने संपूर्ण आर्थिक भार उचलला आहे. त्याआधी ईशान्य भारतासाठी योजलेल्या विविध योजनेची कामे योग्य गतीने होण्यासाठी २०२१ साली पंतप्रधानांनी पीएम गतिशक्तीची निर्मिती केली. विविध मंत्रालये, सरकारी विभाग यांच्या समन्वयात जाणारा वेळ या प्लॅटफॉर्मद्वारे कमी झाला. या सर्वांचा उत्तम परिणाम आज ईशान्य भारतात दिसतो आहे.
जाता-जाता सांगायचे म्हणजे, गुवाहाटी शहराजवळ असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी प्रवासाची विविध साधने सहज उपलब्ध आहेत. रेल्वे व हवाईमार्गाने देश-विदेशातून गुवाहाटीत सहज पोहोचता येते. रेल्वे स्टेशनपासून सहा किमी, तर विमानतळापासून अवघ्या १५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. अंबुबाची मेळ्यासाठी लाखो भक्त इथे येतातच; पण वर्षभर इथे वेगवेगळे उत्सव आणि पूजा सुरू असल्याने इथे कायम गर्दी असते. कामाख्या मंदिर ‘शाक्तपीठ’ असल्याने अमावस्या आणि पौर्णिमांना इथे दर्शनासाठी भरपूर गर्दी असते. बाकी ऑटोबर ते मार्च हा इथे येण्याचा उत्तम काळ. गडबडीत दर्शन घ्यायला न जाता, पुरेसा वेळ हातात घेऊन जाणे कधीही उत्तम! इथे दर्शनासाठी विनामूल्य आणि ‘व्हीआयपी’ दर्शनप्रकार उपलब्ध आहेत. विनामूल्य दर्शनासाठी काही तास लागतात. अर्थात, ‘व्हीआयपी’ दर्शनालाही वेळ लागतोच, या दर्शनासाठी मंदिराकडून ५०१/- शुल्क म्हणून घेतले जातात; ज्याचे बुकिंग ऑनलाईनच होते. कामाख्या मंदिर हे देशातले असे एकमेव मंदिर आहे; जिथे सैन्यदल, हवाईदल व नौसेनेतल्या कर्मचारीवर्गासाठी विशेष दर्शनाची सोय केली आहे.
आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार समजले जाते. ‘आपोनाक स्वागोतोम’ म्हणून हसतमुखाने स्वागत करणारा आसाम बघायला, जगत्जननी माँ कामाख्याकडून आशीर्वाद घ्यायला एकदा तरी इथे जायला हवे.
- आनंदकंदी रूपाली देशिंगकर