मुंबई : (Lal Killa) दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' (एक्यूआयएस) चा हात असल्याचे सिद्ध झाले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटवरील निर्बंधांवर देखरेख करणाऱ्या पथकाने दि.१० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अहवालात या हल्ल्याचा अधिकृतपणे एक्यूआयएसशी संबंध जोडला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या या कार बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या स्फोटामुळे आसपासच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते.
यूएनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, एक्यूआयएस आता पूर्वीप्रमाणे विखुरलेली संघटना राहिलेली नाही. तिने स्वतःला एका प्रादेशिक दहशतवादी संघटनेच्या रूपात विकसित केले आहे. संघटनेने स्वतःसाठी रसद आणि आर्थिक नेटवर्क तयार केले असून, आता मोठ्या संघटित गटांऐवजी लहान आणि स्वतंत्र सेलच्या माध्यमातून काम केले जात आहे. एक्यूआयएस बांगलादेशचा वापर तेथे आपले दहशतवादी सेल स्थापन करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करू शकते, अशी चिंताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.(Lal Killa)
अहवालानुसार, एक्यूआयएसचे नेतृत्व अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून केले जाते. त्याच्या नेत्यांना तेथे ‘तजकीरा’ म्हणजेच राष्ट्रीय ओळखपत्रे जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे तालिबान आणि एक्यूआयएस यांच्यातील जवळीकतेचे संकेत मिळतात. भारतात लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने केला होता. मे २०२६ मध्ये एनआयएने या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध सुमारे ७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर तपास यंत्रणेने आणखी तीन आरोपींविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले.(Lal Killa)
एनआयएच्या माहितीनुसार, आरोपपत्रात समाविष्ट असलेले सर्व १० आरोपी, ज्यामध्ये मुख्य हल्लेखोर डॉ. उमर उन नबी याचाही समावेश होता, तो अन्सार गजवात-उल-हिंदशी संबंधित होता. अन्सार गजवात-उल-हिंद हा एक्यूआयएसचा एक गट असल्याचे सांगितले जाते. उमर उन नबीचा स्फोटात मृत्यू झाला होता. तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी होता आणि हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात मेडिसिनचा असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होता.(Lal Killa)
एनआयएने सांगितले की, एक्यूआयएस आणि त्याच्या सर्व स्वरूपांना जून २०१८ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित केले होते. या प्रकरणात आरोपपत्र बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७, भारतीय न्याय संहिता, २०२३, स्फोटक पदार्थ कायदा, १९०८, शस्त्रास्त्र कायदा, १९५९ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठीच्या कायद्यांतर्गत दाखल करण्यात आले. या प्रकरणात नामनिर्देशित इतर आरोपींमध्ये आमिर राशिद मीर, जसिर बिलाल वानी, डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. शाहीन सईद, मुफ्ती इरफान अहमद वागे, सोयाब, डॉ. बिलाल नसीर मल्ला आणि यासिर अहमद डार यांचा समावेश आहे. उमर उन नबीचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावरील आरोप संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.(Lal Killa)
एनआयएचा तपास जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली-एनसीआरपर्यंत विस्तारला होता. या तपासादरम्यान तपास यंत्रणेने ५८८ जणांचे जबाब नोंदवले, ३९५ हून अधिक कागदपत्रे गोळा केली आणि २०० हून अधिक जप्त वस्तू पुरावे म्हणून समाविष्ट केल्या. तपासात असे समोर आले की, या प्रकरणातील काही आरोपी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते आणि ते एक्यूआयए तसेच अन्सार गजवात-उल-हिंदशीच्या कट्टरतावादी विचारसरणीने प्रभावित झाले होते. एनआयएच्या माहितीनुसार, आरोपींनी २०२२मध्ये श्रीनगरमध्ये एक गुप्त बैठक घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी तुर्कीमार्गे अफगाणिस्तानात जाण्याचा आणि ‘हिजरत’ करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यांनी अन्सार गजवात-उल-हिंदशी ची पुनर्रचना करून त्याला ‘अन्सार गजवात-उल-हिंदशी अंतरिम’ असे नाव दिले.(Lal Killa)
एनआयएच्या मते, याच संघटनेच्या माध्यमातून ‘ऑपरेशन हेव्हनली हिंद’ सुरू करण्यात आले होते. भारतातील लोकशाही सरकार उलथवून शरिया आधारित शासन लागू करणे हा त्याचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत नव्या लोकांना संघटनेशी जोडणे, हिंसक जिहादी विचारसरणीचा प्रचार करणे, शस्त्रे आणि दारूगोळा जमा करणे तसेच बाजारात उपलब्ध रसायनांपासून स्फोटके तयार करणे यांचा समावेश होता, असे तपासात समोर आले. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी विविध प्रकारचे आयईडी तयार केले आणि त्यांची चाचणीही केली होती. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरण्यात आलेले स्फोटक ट्रायअॅसिटोन ट्रायपेरॉक्साइड (टीएटीपी) होते. एनआयएच्या मते, आरोपींनी यासाठी आवश्यक साहित्य गुप्तपणे मिळवले आणि स्फोटक मिश्रण तयार करण्यासाठी प्रयोग केले होते.(Lal Killa)
यूएनच्या नव्या अहवालात या प्रकरणाचा व्यापक दहशतवादी नेटवर्कच्या संदर्भातही उल्लेख करण्यात आला आहे. अहवालानुसार, एक्यूआयएसने पाकिस्तानमध्ये इत्तेहाद-उल-मुजाहिदीन पाकिस्तानचा कणा म्हणून काम केले आहे. या संघटनेला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे. यामध्ये ९ मे रोजी सुरक्षा चौकीजवळ झालेला आत्मघाती हल्ला आणि वाहनामध्ये बसवण्यात आलेल्या आयईडीचा स्फोट यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता.(Lal Killa)
यूएनच्या निरीक्षण पथकाने अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या रासायनिक आणि जैविक शस्त्रांमधील वाढत्या स्वारस्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही दहशतवादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारची शस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे त्यांना यश मिळालेले नाही. अहवालानुसार, या शस्त्रांच्या निर्मितीशी संबंधित माहिती ऑनलाइन दहशतवादी समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.(Lal Killa)