मंदिरे जरी आध्यात्मिक श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असली, तरी त्यांचे सुयोग्य व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे. याच दृष्टिकोनातून मंदिर व्यवस्थापन क्षेत्रातील प्रशिक्षण, करिअरच्या संधी यासंबंधीची माहिती देणारा हा लेख...
'संस्कृती मंदिराश्रितः|’ अर्थात, संस्कृती मंदिरांच्या आश्रयाने विकसित होते. गेल्या शेकडो वर्षांपासून भारतवर्षात मंदिरांच्या आश्रयाने सनातन वैदिक हिंदू संस्कृतीची वृद्धी आणि विकास होत आला. मंदिरे ही लोकशिक्षण आणि समाजसंस्काराची केंद्रे राहिली. व्यापक समाजाच्या मनावर सनातन वैदिक ज्ञानपरंपरांची अमिट छाप निर्माण करण्याचे कार्यही मंदिरे सातत्याने करत आहेत. आधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक उन्नतीच्या संधी प्रत्येक व्यक्तीला मंदिरांच्या माध्यमातून मिळत आल्या आहेत.
आजही प्राचीन मंदिरांमध्ये गेल्यावर तेथे १४ विद्या आणि ६४ कलांचा ज्या प्रकारे संगम झालेला होता, तो पाहायला मिळतो. मंदिरसंस्था ही सनातन संस्कृतीचा अविभाज्य घटक. मंदिरांना ‘देवालय’ असे म्हटले जाते. याचा अर्थ मंदिरांमध्ये प्रत्यक्ष देवतांचा निवास असतो. म्हणूनच मंदिरांमध्ये देवतांच्या चैतन्यपूर्ण अनुभूतीचा प्रत्यय येतो.
मंदिरांची रचना, त्यांचे स्थापत्य, तेथील व्यवस्था, दैनंदिन पूजा-अर्चना, उपासना आणि मंदिरांच्या माध्यमातून चालविले जाणारे विविध उपक्रम यांचा अभ्यास केला असता, आपल्याला आश्चर्य वाटते. सध्याच्या भारताच्या भौगोलिक सीमांपुरतेच नव्हे, तर दक्षिण-पूर्व आशिया, चीन, तिबेट, इंडोनेशिया, बाली, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस आदी देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर मंदिरसंस्था आणि त्यांच्या व्यवस्थापन व्यवस्था कार्यरत होत्या.
मंदिरसंस्थेचा समाजजीवनाशी आणि प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाशी प्रत्यक्ष संबंध होता. मंदिरे ही केवळ पूजा आणि उपासनेसाठी एकत्र येण्याची केंद्रे नव्हती. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मंदिरांची व्यापक आणि महत्त्वपूर्ण भूमिका होती. याचबरोबर मंदिरसंस्था विविध प्रकारच्या सेवा आणि उपक्रम चालविणारी संस्था होती. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक व्यवहार होत असत. ज्ञानदानासाठी पाठशाळा मंदिरांशी जोडलेल्या असत. पूजा आणि उपासनेसाठी आवश्यक सामग्रीचा पुरवठा करणारी एक संपूर्ण व्यवस्था होती. प्रवाशांच्या विश्रांतीसाठी धर्मशाळा म्हणजेच आजच्या भाषेत भक्तनिवासाची व्यवस्था होती. मंदिरांची संपत्ती, मंदिरांचा खजिना आणि त्यातून मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन चालत असे.
अनेक ठिकाणी असे दिसून येते की, मंदिर हे संपूर्ण नगराचे केंद्रीय संस्थान होते आणि त्याच्या संरक्षण व साहाय्यामुळे समाजजीवन सुरळीतपणे चालत असे. मंदिरसंस्थांच्या व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर कुशल, अर्धकुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असायची. त्यांच्या सहकार्यानेच मंदिरांची संपूर्ण व्यवस्था सुरळीतपणे चालत असे.
दुर्दैवाने, दहाव्या शतकानंतर झालेल्या क्रूर इस्लामी आक्रमणांमुळे मंदिरसंस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हजारो मंदिरांचा विद्ध्वंस करण्यात आला. मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लूटमार करण्यात आली. केवळ द्वेष आणि मूर्तिपूजेच्या विरोधातून शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. वास्तविक पाहता, हा आघात सनातन वैदिक हिंदू धर्मावरच होता.
याचा सर्वांत मोठा फटका मंदिरसंस्थांना बसला. मंदिरांशी जोडलेल्या सनातन संस्कृतीची आणि हिंदू सभ्यतेची परंपरा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. आक्रमकांना असे वाटत होते की, मंदिरे नष्ट झाली की हिंदू संस्कृतीही नष्ट होईल. मात्र, त्यानंतरही टिकून राहिलेली शेकडो मंदिरे आजही प्रगत आणि वर्धिष्णू मंदिरसंस्थांची साक्ष देत आहेत.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात हिंदूंची मंदिरे शासनाच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली. त्यांच्यावर सरकारी व्यवस्था लादण्यात आली. मंदिरांच्या संपत्तीचा अपव्यय आणि तिचा अमर्याद वापर सुरूच राहिला. आज काळ बदलत आहे. संपूर्ण जगभर भारत आणि भारतीय ज्ञानपरंपरा पुनरुज्जीवित होत असून त्या आत्मविश्वासाने पुन्हा उभ्या राहात आहेत. आज हिंदूंची मंदिरे पुन्हा हिंदू समाजाच्या नियंत्रणाखाली देण्यात यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण होण्याचे संकेतही मिळत आहेत.
सध्या संपूर्ण देशात साडेसहा लाखांहून अधिक मंदिरे आहेत. सध्या त्यांचे कार्य आणि व्यवस्थापन सरकारी प्रणालीद्वारे किंवा काही प्रमाणात विस्कळीत पद्धतीने चालत आहे. मात्र, ही मंदिरे हिंदू समाजाच्या नियंत्रणाखाली आली, तर या मंदिरांसाठी मोठ्या संख्येने प्रशिक्षित कर्मचारी आणि व्यवस्थापकांची आवश्यकता भासेल. जर प्रत्येक मंदिरात किमान २० ते ५० व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर अंदाजे एक कोटी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय, मंदिरांशी संबंधित विविध साहाय्यक व्यवसाय आणि उद्योगांच्या माध्यमातून आणखी तीन ते चार कोटी लोकांसाठी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतो. यासोबतच, मंदिर पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारताबाहेरील अनेक देशांमध्येही मंदिरे आहेत. त्याचबरोबर स्वामीनारायण, ‘इस्कॉन’, रामकृष्ण मठ आदी संस्थांच्या माध्यमातून नवीन मंदिरांची उभारणी होत आहे. त्यामुळे भविष्यात मंदिरसंस्थांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण होणार आहे. भारतामधील विविध विद्यापीठे आणि सामाजिक संस्थांनी मंदिरसंस्थांसाठी उपयुक्त अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, काशी हिंदू विद्यापीठ (बनारस) आणि ‘भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम’ यांसारख्या संस्थांनी या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.
या अभ्यासक्रमांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :
१. मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम, २. मंदिर स्थापत्य अभ्यासक्रम, ३. मंदिर पर्यटन विकास अभ्यासक्रम, ४. पौरोहित्य आणि धार्मिक विधींचे प्रशिक्षण, ५. संस्कार आणि संस्कृतीविषयक अभ्यासक्रम, ६. हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षण, ७. भाविकांसाठी विविध सेवा देण्याचे प्रशिक्षण, ८. मंदिरांशी संबंधित विशेष अभ्यासक्रम, जसे की यज्ञविधी, गोशाळा व्यवस्थापन, क्रियाकर्म आदी.
अभ्यासक्रमांचे प्रकार असे आहेत मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम
१. मंदिरांचे अर्थशास्त्र, २. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा, ३. सेवांचे व्यवस्थापन, ४. धार्मिक समुदाय आणि त्यांचे व्यवस्थापन, ५. आर्थिक व्यवस्थापन, ६. प्रशासकीय व्यवस्थापन, ७. संभाषण कला आणि परस्पर संबंध, ८. तंत्रज्ञान व्यवस्थापन, ९. वेळेचे व्यवस्थापन, १०. नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता
मंदिर स्थापत्य अभ्यासक्रम
यामध्ये १. मूर्तिशास्त्र, २. मंदिर स्थापत्यशैली, ३. मंदिर संस्कृती आणि परंपरा, ४. मंदिर रचना, ५. मंदिर शिल्प अभ्यास, ६. मंदिर व्यवस्थापन
मंदिर पर्यटन विकास अभ्यासक्रम
१. मंदिर पर्यटनाचे क्षेत्र आणि संधी, २. धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन ३. ग्राहक सेवा, ४. सॉफ्ट स्किल्सचा विकास, ५. संभाषण कला आणि परस्पर संबंध, ६. सोशल मीडिया आणि वेब-आधारित सेवा
पौरोहित्य आणि धार्मिक विधी प्रशिक्षण
१. पौरोहित्याची व्याख्या आणि कार्य, २. षोडशोपचार पूजा विधी, ३. संस्कृत भाषेचा परिचय, ४. मंत्रोच्चार आणि स्तोत्रपठण, ५. नवविधा भक्ती, ६. वैदिक आणि धार्मिक ग्रंथांचा परिचय
संस्कार आणि संस्कृतीसंबंधी अभ्यासक्रम
१. षोडश संस्कार, २. वैयक्तिक आणि सामाजिक संस्कार, ३. शिष्टाचार आणि संभाषण कला, ४. संस्कृतीची व्याख्या आणि विकास, ५. संस्कृती आणि परंपरा, ६. सण, यात्रा, मेळे आणि कुंभ इत्यादी
मंदिरांच्या संबंधातील विशेष अभ्यासक्रम
१. वैदिक कर्मकांड, २. गोशाळा व्यवस्थापन, ३. देववन देवराई- संरक्षित वनाचे व्यवस्थापन, ४. विशेष उपक्रमांचे आयोजन, ५. देवक्रिया आणि पितृक्रिया इत्यादी धार्मिक व क्रियाकर्मांचे आयोजन
या अभ्यासक्रमांचा कालावधी वेगवेगळा असून त्यामध्ये प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संदर्भातील विविध अभ्यासक्रमांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’अंतर्गत भारत सरकार भारतीय ज्ञानपरंपरेच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. युवा पिढीने काळाची गरज ओळखून मंदिर क्षेत्रातील विविध कला, कौशल्ये आणि प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्या करिअरचा विकास करायला हवा.
(लेखक संस्थापक, भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी अमेरिका आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम, पुणे आहेत.)
९८२२८४६९१८