ग्लोबल रुग्णालयावर पालिकेच्या कोट्यवधींच्या नुकसानीचा आरोप; हरिष भांदिर्गेंची कठोर कारवाईची मागणी

    13-Aug-2026
Global Hospital BMC Loss
 
मुंबई : (Global Hospital BMC Loss) परळ येथील नामांकित ग्लोबल रुग्णालयाने गेल्या १२ वर्षांत महानगरपालिकेची मोठी फसवणूक करत १५ टक्के आरक्षित खाटांचा स्वतःच आर्थिक फायदा लाटल्याचा आणि महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून, मागील १२ वर्षांच्या आर्थिक नुकसानीची पूर्ण वसुली केल्याशिवाय रुग्णालयासोबत कोणताही नवीन करार करू नये आणि त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये, अशी मागणी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केली आहे.(Global Hospital BMC Loss)
 
ग्लोबल रुग्णालयासोबत सन २०१२ मध्ये महापालिकेने करार केला होता. या करारानुसार रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १५ टक्के खाटा महापालिकेच्या गरजू रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक होते. मात्र, २०१२ ते २०२६ या प्रदीर्घ १२ वर्षांच्या काळात रुग्णालयाने या आरक्षित खाटांवर आपलाच मालकी हक्क दाखवून त्याचा पूर्ण आर्थिक फायदा स्वतः उठवला. महापालिकेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नोटीस बजावली असता, रुग्णालयाने २०२१-२२ मध्ये न्यायालयात धाव घेतली आणि दरवर्षी न्यायालयात जाऊन पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला.(Global Hospital BMC Loss)
शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी आयोजित एका उच्चस्तरीय संयुक्त सभेत हा प्रकार उघडकीस आला. या बैठकीस महापालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये), के. ई. एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेदरम्यानच रुग्णालयाच्या या मनमानी कारभाराची पोलखोल झाली. सध्या न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत महापालिकेला रुग्णालयासोबत पुन्हा करार करण्याचे निर्देश दिले असल्याचे समजते.(Global Hospital BMC Loss)
 
हरीश भांदिर्गे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,न्यायालयाच्या आदेशानुसार १२ ऑगस्टपर्यंत नवीन करार करताना, महापालिकेच्या १५ टक्के आरक्षित खाटांचे गेल्या १२ वर्षांत झालेले कोट्यवधींचे आर्थिक नुकसान रुग्णालयाकडून वसूल करण्याबाबत करारात स्पष्ट उल्लेख करावा.जोपर्यंत रुग्णालय मागील आर्थिक नुकसानीची भरपाई करत नाही, तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही वैद्यकीय किंवा प्रशासकीय परवान्याच्या नूतनीकरणास महापालिकेने मंजुरी देऊ नये.(Global Hospital BMC Loss)
 
"महापालिकेने या प्रकरणात कठोर निर्णय घेतल्यास मुंबईतील सर्वच खाजगी रुग्णालयांना एक योग्य आणि कडक संदेश जाईल. रुग्णालयांच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येईल आणि पालिकेच्या हक्काच्या खाटा खरोखरच सर्वसामान्य व गरजू रुग्णांना उपचारासाठी उपलब्ध होतील," असा विश्वास हरिष भांदिर्गे यांनी पत्रात व्यक्त केला आहे. आता यावर महापालिका आयुक्त काय कठोर पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.(Global Hospital BMC Loss)
 
 




संबंधित मजकूर