मुंबई : (Ganeshotsav )यंदाच्या गणेशोत्सवात 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचा संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावा आणि सर्व गणेशोत्सव मंडळांनी देखावे व सजावटीतून समाजप्रबोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मंगळवारी नाना चौक येथील महापालिकेच्या 'डी' विभाग कार्यालयातील सभागृहात मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांची संयुक्त समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत ७० हून अधिक मंडळांचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, पोलीस, वाहतूक पोलीस, बेस्ट आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
'वन विंडो' परवानगीची मागणी आणि समन्वय
गणेशोत्सव मंडळांना महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी मिळवताना अडचण येऊ नये, यासाठी महापालिकेच्या 'वन विंडो' (एक खिडकी) प्रणालीमध्येच पोलीस व वाहतूक प्रशासनाच्या परवानग्यांचा समावेश करावा, अशी मागणी गणेश मंडळांनी केली. यावर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने तोडगा काढून कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री लोढा यांनी दिल्या. (Ganeshotsav)
ऑगस्ट क्रांती मैदानावर भव्य कृत्रिम तलाव
समुद्रातील विसर्जनाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असली, तरी भाविकांची भावना जपत ऑगस्ट क्रांती मैदानावर ५ ते ६ फूट उंचीचा विस्तृत कृत्रिम तलाव उभारण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. याशिवाय खेतवाडीत येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा, गिरगाव चौपाटीवर दिवसातून दोनदा निर्माल्य उचलणे, खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि रस्त्यावरील अनावश्यक केबल्स हटवण्याच्या सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या. (Ganeshotsav)
पार्किंग कारवाईतून सूट आणि आरोग्य सुविधा
गणेशोत्सवाच्या १० दिवसांत मंडळांच्या आवारातील वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच खेतवाडी परिसरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करणे, हिरकणी कक्ष सुरू करणे आणि 'बेस्ट'ने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. (Ganeshotsav)
गिरगाव चौपाटीवर महापालिकेची तयारी सुरु
गणेश विसर्जनासाठी 'डी' वॉर्डातर्फे गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी केली जात आहे. वाळूत वाहने रुतू नयेत म्हणून १,१९४ प्लेट्स बसवण्यात येणार असून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पोलिसांसाठी वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. चौपाटी परिसरात १३ कृत्रिम तलावांची सोय केली जाणार असून भाविकांच्या सुरक्षेसाठी लाईफगार्ड्सची संख्याही वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली. (Ganeshotsav)