डोंबिवली : (Dombivli) देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ, देशाच्या गौरवाचा झेंडा महाराष्ट्रात उंचावण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीत एका ऐतिहासिक आणि 'भव्य तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. 'तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया!' अशी साद घालत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीतून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. यापूर्वीचा तिरंगा रॅलीचा विश्वविक्रम २१ हजार चौरस फुटांचा होता, मात्र यंदा कल्याण लोकसभेत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा (स्क्वेअर फूट) भव्य तिरंगा फडकवून तो जुना विक्रम मोडीत काढला जाणार आहे. या नव्या भव्य तिरंग्याची विश्वविक्रम म्हणून अधिकृत नोंद होणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित ही भव्य आणि विश्वविक्रमी रॅली शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. रॅलीचा प्रत्यक्ष प्रारंभ सकाळी ७:३० वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील कॅप्टन विजय कुमार सचान स्मारक येथून होईल. येथे हजारो नागरिक एकत्र येऊन ३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा हाती घेत अभिमानाने मार्गस्थ होतील. घारडा सर्कल येथून सुरू झालेली ही रॅली पुढे दत्तनगर चौकाकडे प्रस्थान करेल. या भव्य रॅलीचा दिमाखदार समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ होणार आहे. (Dombivli)
यंदाचा स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि देशाभिमानाचा एक नवा उच्चांक गाठण्यासाठी आयोजित केलेल्या या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा एक अनोखा संदेश संपूर्ण जगाला दिला जाणार आहे. हातात ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा घेऊन चालणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा नवा विश्वविक्रम रचला जाईल. त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण लोकसभा परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि देशप्रेमी बांधवांनी या जागतिक विक्रमाचा अभिमानास्पद भाग होण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी घारडा सर्कल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. (Dombivli)