निसर्गातले बदल अंतरंगातही एक सूक्ष्म स्पंदन निर्माण करतात. श्रावणाचा काळही तसाच. पर्जन्यधारांनी न्हाहून निघालेली सृष्टी नवचैतन्याने बहरून निघते आणि त्याच वेळी मनालाही अंतर्मुखतेची ओढ लागते. भारतीय चिंतनाने या ऋतूला म्हणूनच केवळ धार्मिक आचारांचे बंधन दिले नाही; त्याला साधना, संयम आणि आत्मचिंतनाची अनुभूती जोडली. काळाच्या प्रवाहात अनेक गोष्टी बदलल्या, परंपरांचे स्वरूप बदलले; तरी स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची माणसाची आकांक्षा तशीच राहिली. श्रावण कदाचित त्याच शाश्वत शोधाची आठवण करून देतो. आजपासून सुरु झालेल्या श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर श्रावणाच्या महत्त्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
भारतीय कालगणनेतील प्रत्येक महिन्याचे स्वतःचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. चैत्र म्हटला की नववर्षाची चाहूल लागते, वैशाखात अक्षय पुण्याची संकल्पना येते, आश्विनात आदिशक्तीची उपासना सुरू होते आणि कार्तिक दीपोत्सवाने उजळून निघतो. परंतु व्रत, उपवास, संयम, पूजा, जप, अभिषेक, दान आणि उत्सव या सर्वांचा इतका सुंदर समन्वय ज्या एकाच महिन्यात दिसतो, तो म्हणजे श्रावण! म्हणूनच भारतीय जनमानसात श्रावण शरीरशुद्धीपासून चित्तशुद्धीपर्यंत आणि निसर्गाच्या उत्सवापासून ईश्वरोपासनेपर्यंत नेणारा एक संपूर्ण सांस्कृतिक अनुभवच आहे. आषाढातील मुसळधार पावसानंतर श्रावणात निसर्गाचे रूप पालटते. रखरखीत धरती हिरवा शालू पांघरते. नद्या, ओढे, तलाव पाण्याने भरतात. वृक्षवेली नवजीवनाने बहरतात. वातावरणातील हा बदल पाहूनच भारतीय ऋषीपरंपरेने निसर्गातील नवसृजन आणि मनुष्याच्या अंतर्मनातील नवचैतन्याची सांगड घातली. म्हणूनच श्रावण हा अंतःसृष्टीला प्रसन्न आणि जागृत करण्याचा कालखंड मानला गेला.
श्रावण म्हटले की स्मरण होते, ते भगवान शिवाचे. सोमवारचे व्रत, शिवलिंगावर जलाभिषेक, बिल्वपत्र अर्पण, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवमहिम्नः स्तोत्र, रुद्राध्याय यांचे पठण या महिन्यात श्रद्धेने होते. पुराणपरंपरेत समुद्रमंथनाशी श्रावणातील शिवोपासनेचा संबंध जोडला आहे. देव आणि दानवांच्या समुद्रमंथनातून हलाहल प्रकट झाल्यावर, विश्वरक्षणासाठी महादेवांनी ते प्राशन केले आणि नीलकंठ झाले. शिवाचा दाह शांत करण्यासाठी, देवतांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला होता. त्यामुळेच श्रावणातील जलाभिषेकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कथेमागील आध्यात्मिक अर्थही समजून घेतला पाहिजे. संसारमंथनातूनही अमृताबरोबर विष बाहेर पडते. जीवनात सुखाबरोबर दुःख, यशाबरोबर अपयश आणि सन्मानाबरोबर अपमानही येतो. विष पचवूनही जगासाठी कल्याणकारी राहणारा शिव, हा भारतीय संस्कृतीतील स्थितप्रज्ञतेचा आदर्श आहे. म्हणूनच श्रावणातील शिवोपासना माणसाला जीवनातील विषारी अनुभवांनी विषारी न होता, शांत आणि कल्याणकारी राहण्याचा संदेश देते.
श्रावणाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, या महिन्यातील व्रतांची विपुलता. श्रावणी सोमवार, मंगळागौर, शुक्रवारची व्रते, नागपंचमीशी निगडित उपासना, जिवतीपूजन अशा अनेक परंपरा महाराष्ट्रात आजही प्रचलित आहेत. भारताच्या विविध प्रांतांत त्यांची नावे आणि पद्धती बदलतात; परंतु त्यामागील मूलभूत सूत्र संयम, संकल्प आणि उपासना हेच आहे.
‘उपवास’ या शब्दाचा मूळ भाव अधिक व्यापक आहे. ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे राहणे; अर्थात ईश्वराच्या सान्निध्यात राहणे. त्यामुळे उपवासाचा उद्देश केवळ पोट रिकामे ठेवणे नसून, इंद्रियांच्या अनिर्बंध मागण्यांवर नियंत्रण ठेवून मनाला ईश्वराभिमुख करण्याचा आहे. पावसाळ्यात वातावरण, पाणी आणि पचनशक्ती बदलते. आयुर्वेदात वर्षाऋतूमध्ये पचनशक्ती तुलनेने दुर्बल असल्याचे मानले आहे. म्हणूनच हलका, सात्त्विक आणि नियंत्रित आहार घेण्याची परंपरा विकसित झाली. धार्मिक व्रत आणि ऋतूनुरूप जीवनशैली अशा दोन प्रवाहांचा येथे सुंदर संगम दिसतो.
श्रावण शुल पंचमीला नागपंचमी साजरी होते. भारतीय संस्कृतीतील नागपूजा ही अत्यंत प्राचीन परंपराच. शिवाच्या गळ्यातील वासुकी असो, भगवान विष्णूंचा शेष असो किंवा विविध पुराणांतील नागवंशाला, भारतीय प्रतीकविश्वात महत्त्वाचेच स्थान. कृषिप्रधान समाजाच्या दृष्टीनेही सर्पाचे स्थान महत्त्वाचेच होते. शेतातील उंदीर आणि इतर जीवांचे प्रमाण नियंत्रित करण्यात, सर्पांची भूमिका असते. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा आदर करण्याची भावना नागपंचमीने संस्कारात आणली. आधुनिक पर्यावरणशास्त्राच्या भाषेत प्रत्येक जीव पर्यावरणीय साखळीचा भाग आहे, हाच संदेश आपल्या पूर्वजांनी रुजवला.
आषाढ अमावस्येला महाराष्ट्रात ‘दिव्याची आवस’ किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते; ती श्रावणाच्या पूर्वसंध्येची महत्त्वाची परंपरा. घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि दीप प्रज्वलित केले जातात. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची आकांक्षा यात आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे, निराशेतून आशेकडे आणि जडत्वातून चैतन्याकडे जाण्याचे दीप हे प्रतीक.
श्रावण पौर्णिमेला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी होते. कोळी समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित जीवन आणि समृद्ध मासेमारीची प्रार्थना होते. ज्या निसर्गशक्तीवर आपले जीवन अवलंबून आहे, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा प्रयत्न. याच दिवसेही रक्षाबंधनाचाहे सण येतो. आज तो प्रामुख्याने भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा होतो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचा संकल्प करतो. परंतु ‘रक्षासूत्र’ ही संकल्पना याहून व्यापक आणि प्राचीन आहे. धार्मिक विधींमध्ये संरक्षण, मंगल आणि संकल्प यांचे प्रतीक म्हणून, सूत्र बांधण्याची परंपरा दीर्घकाळापासून आहे.
श्रावणी पौर्णिमेचा संबंध वैदिक अध्ययनपरंपरेशीही आहे. ‘उपाकर्म’ किंवा ‘श्रावणी’ या विधीला वैदिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. अध्ययनाचा पुनःसंकल्प, ऋषींचे स्मरण आणि ज्ञानपरंपरेप्रति कृतज्ञता या विधीत व्यक्त होते. गुरू-शिष्य परंपरा, वेदाध्ययन, ऋषींचे स्मरण आणि आत्मचिंतन यामुळे श्रावणाला एक बौद्धिक-आध्यात्मिक आयामही आहे.
महाराष्ट्रातील श्रावणाची आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे मंगळागौर. विशेषतः नवविवाहित स्त्रियांसाठी मंगळागौरीचे व्रत, देवीची पूजा आणि रात्री खेळले जाणारे पारंपरिक खेळ हा एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव आहे. फुगड्या, झिम्मा आणि विविध पारंपरिक खेळ यांतून स्त्रियांचे सामाजिक संमेलन घडते. पारंपरिक समाजरचनेत घरगुती जबाबदार्यांनी बांधलेल्या स्त्रियांना अशा सणांनी एकत्र येण्याची, गाण्याची, खेळण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची सामाजिक जागा दिली.
भारतीय धार्मिक परंपरेत श्रावणाचे माहात्म्य विविध पुराणकथा, शिवोपासना, व्रतपरंपरा आणि वैदिक उपाकर्म अशा अनेक स्तरांवर विकसित झाले आहे. त्यामुळे आज आपण पाहतो, तो श्रावणोत्सव एखाद्या एका काळात किंवा एका ग्रंथातून निर्माण झालेला नाही. हजारो वर्षांच्या सांस्कृतिक प्रवासात वैदिक परंपरा, पुराणपरंपरा, लोकसंस्कृती, कृषिजीवन आणि प्रादेशिक रूढी यांचा संगम होत गेला आणि त्यातूनच आजचा श्रावण आकाराला आला. भारतीय संस्कृतीने धर्माला जीवनापासून वेगळे केले नाही. पाऊस पडतो, शेती सुरू होते, नद्या भरतात, सर्प बाहेर पडतात, समुद्राचे स्वरूप बदलते, पचनशक्तीवर ऋतूचा परिणाम होतो, या सर्व नैसर्गिक घटनांच्या भोवती धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार निर्माण झाले. त्यामुळेच निसर्गचक्र आणि धर्मचक्र परस्परांशी जोडले गेले.
श्रावण आपल्याला थोडे अंतर्मुख होण्यास सांगतो. आहारावर नियंत्रण ठेवा, वाणीवर नियंत्रण ठेवा, क्रोध कमी करा, देवाचे स्मरण करा, निसर्गाप्रति कृतज्ञ राहा, नाती जपा आणि आपल्या अंतःकरणातील कलुष दूर करण्याचा प्रयत्न करा; हाच श्रावणाचा व्यापक संदेश आहे. श्रावण हा केवळ ‘व्रतवैकल्याचा महिना’ नाही; ती भारतीय संस्कृतीने विकसित केलेली एक विलक्षण जीवनपद्धती आहे. शरीराला संयम, मनाला प्रसन्नता, बुद्धीला विवेक, नात्यांना ओलावा, निसर्गाला कृतज्ञता आणि आत्म्याला ईश्वराभिमुखता देण्याचा हा काळ. बाहेर बरसणार्या श्रावणसरी धरतीवरील धूळ धुवून टाकतात; श्रद्धा, उपासना, व्रत आणि आत्मचिंतनाच्या श्रावणसरी आपल्या अंतःकरणावरील विकारांची धूळ धुवून टाकावीत, हीच या पवित्र मासामागील खरी आध्यात्मिक भावना म्हणता येईल.
ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज