नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा बदल म्हणजे, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या तथ्यावर आणि मूल्यावर आधारित सर्वंकष शिक्षण! भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश; परंतु अनादिकालापासून सांस्कृतिक एकत्वाच्या धाग्यात बांधला गेला आहे. दुर्दैवाने आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. याच एकात्मतेची जाणीव भारतीयांना करून देण्याच्या उद्देशाने शिक्षण पद्धतीत याचा समावेश केला गेला. त्याची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी आणि त्या माध्यमातून हा एकत्वाचा धागा पुनर्प्रस्थापित करण्यासाठी सुरू केलेला उपक्रम म्हणजे ‘काशी तामिळ संगमम्’ काय आहे, याची पार्श्वभूमी ही आपण जाणून घेऊया...
काशी नगरीचे माहात्म्य
काशीला सनातन नगरी आणि जगातील सर्वांत जुने शहर म्हणून संबोधले जाते. काशीला तीन हजारांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे, अशी मान्यता आहे. वेद, उपनिषद, महाभारत, पुराणांमध्ये याला ‘काशिका’ म्हणले आहे.
वाराणसी हे पुरातन काळापासून ज्ञानाचे आणि मोक्षाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निरनिराळ्या ऋषींनी आणि संतांनी वेद, उपनिषद आणि अनेक स्तराच्या ज्ञानाची मांडणी येथे केली. पाणिनी, पातंजली इथे शिकले आणि त्यांनी इथे शिकवले. १६ विद्या- तर्क, न्याय, मीमांसा, खगोलशास्त्र, आयुर्वेद सगळे इथे शिकवले जायचे.
बौद्ध आणि जैन धर्म यांचेही हे पवित्र स्थान मानले जाते. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश सारनाथ, काशी जवळच दिला. २४वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा जन्मपण काशीमध्येच. काशीला ‘मोक्षदायिनी नगरी’ म्हणून मान्यता आहे. भगवान शिवाच्या आराधनेचे केंद्र म्हणून काशी प्रस्थापित झाले. काशी विश्वनाथ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. काशी विश्वनाथ मंदिर हे शिवाचे सर्वांत महत्त्वाचे धाम आहे. पौराणिक कथेनुसार ब्रह्मा-विष्णूच्या वादात शिवाने ज्योतिर्लिंग रूपात पहिल्यांदा दर्शन इथेच दिले. म्हणून, काशीला ‘शिवाची राजधानी’ म्हणतात.
काशी म्हणजे संस्कृतीचा संगम. गंगा आणि अदृश्य अस्सी नदीच्या संगमावर वसलेली, म्हणून ‘वाराणसी’ असे नाव प्राप्त झाले. इथे ८४ घाट आहेत. प्रत्येक घाटाला एक कथा आहे. इथल्याच दशाश्वमेध घाटावर ब्रह्माने दहा अश्वमेध यज्ञ केले होते, अशी मान्यता आहे. तसेच कला क्षेत्रातील शास्त्रीय संगीत, ठुमरी, बनारसी साडी, लाकडी खेळणी इत्यादींची सुरुवात इथूनच झाली.
तामिळची प्राचीन संस्कृती
तामिळनाडूला दक्षिणेची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हटले जाते. त्यामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे.
१. तामिळ भाषा : तामिळ ही तीन हजारांहून अधिक वर्षांपासूनची जगातील सर्वांत जुनी भाषा असून, ती आजही मोठ्या संख्येने रोज बोलली जाते. तामिळला भारत सरकारने ‘शास्त्रीय भाषा’ असा दर्जा दिला आहे.
भाषेमुळे संस्कृती जिवंत राहिली. उत्तरेकडे भाषा बदलल्या; पण तामिळ तशीच राहिली. ‘संगम साहित्य’ हे इसवी सन ३०० पूर्वीचे तामिळ काव्य असून, ते जगातल्या सर्वांत जुन्या साहित्यांपैकी एक गणले जाते.
२. मंदिर संस्कृती : तामिळनाडूतील मंदिरे म्हणजे फक्त पूजा नाही, ती संपूर्ण संस्कृती आहेत. यामध्ये
चिदंबरम् नटराज मंदिर : नृत्य आणि विज्ञान
मदुराई मीनाक्षी मंदिर : शिल्प आणि सण
तंजावर बृहदेश्वर मंदिर : चोल राजांची स्थापत्य कला. या मंदिराला आता ‘युनेस्को’ वारसासुद्धा प्राप्त झाला आहे.
महाबलीपुरम् : पल्लव काळातील रॉक-कट शिल्प
या मंदिरांमध्ये नृत्य, संगीत, शिल्प, गणित, खगोलशास्त्र सगळे एकत्र आहे.
३. कला - भरतनाट्यम् आणि कर्नाटक संगीत
जगभरातील सर्वांत प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य असलेल्या भरतनाट्यम्चा उगमही तामिळनाडूतील मंदिरांमध्येच झाला. त्यागराज, मुत्तुस्वामी दीक्षित, श्यामा शास्त्री हे ‘कर्नाटक संगीता’तील संगीत त्रिमूर्तीही तामिळनाडूतीलच. त्याचबरोबर पोंगल, तैपूसम यांसारखे सण आजही पारंपरिक पद्धतीने साजरे होतात.
४. तत्त्वज्ञान आणि भक्ती चळवळ : अलवार आणि नयनार संत : सातव्या ते नवव्या शतकात याच भूमीतून भक्ती चळवळ सुरू झाली. ज्याचा प्रभाव नंतर पूर्ण भारतावर झाला. रामानुजाचार्य, रामलिंग स्वामीगल यांसारखे संत इथेच झाले. तामिळ भक्ती साहित्य ‘तेवरम्’, ‘नालयिर दिव्य प्रबंधम्’ हे आजही घराघरांत गायले जातात.
५. व्यापार आणि जगाशी दुवा : चोल आणि पल्लव राजांच्या काळात तामिळनाडूचे व्यापारी श्रीलंका, आग्नेय आशिया, रोमपर्यंत गेले होते. म्हणून, तामिळ संस्कृती फक्त भारतापुरती मर्यादित राहिली नाही, ती जगभर पसरली.
म्हणूनच तामिळनाडूला ‘दक्षिणेची सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते. कारण, दक्षिण भारतातल्या इतर राज्यांमध्ये जरी वेगवेगळ्या भाषा असल्या, तरी संस्कृतीचा पाया तामिळ आहे. तामिळ भाषा दक्षिणेच्या चार द्रविड भाषांचा मूळ स्रोत मानली जाते. ‘भरतनाट्यम्’ हे नृत्य संपूर्ण दक्षिणेचे प्रतिनिधित्व करते. कर्नाटक संगीताचे केंद्र चेन्नई हेच आहे. द्रविड मंदिर स्थापत्य शैलीचा उगम येथेच झाला. थोडयात केरळम्, कर्नाटक, आंध्र, तेलंगण यांची संस्कृती वेगळी आहे; पण त्यांचा आत्मा एकच आहे आणि तो आत्मा तामिळनाडूत सर्वांत जास्त जिवंत आहे.
वरवर पाहता, उत्तर आणि दक्षिणेतील वेगवेगळ्या संस्कृती, असे याचे स्वरूप दिसते. आपल्यालासुद्धा या दोन भिन्न संस्कृती आहेत आणि त्याचा परस्पर संबंध नाही, असेच शिकवले गेले. वस्तुतः काशी, वाराणसी आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक दुवा खूप जुना आहे. दोन-अडीच हजार वर्षांपासूनची घट्ट वीण असलेला दोन्ही प्रदेशांचा संबंध आहे. संपूर्ण भारतवर्ष एक आहे, याची अनुभूती देण्याचा आपल्या ऋषिमुनींनी, राजे-महाराजे, तत्त्वज्ञ आणि व्यापारी मंडळी यांनी योजनाबद्ध प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्याचा थोडा मागोवा घेऊ.
महर्षी अगस्त्य हे काशी आणि तामिळ यांच्यातील सर्वांत मोठे पूल मानले जातात. त्यांना दक्षिणेचे जनक आणि तामिळचे गुरू दोन्ही म्हटले जाते.
अगस्त्य मुनी मूळ काशी-उत्तरेतील. एका पौराणिक कथेनुसार, अगस्त्य ऋषींचा शिष्य असलेल्या विंध्य पर्वताने सूर्याचा मार्ग अडवला. अगस्त्य ऋषींनी "खाली बस,” असे सांगितले. त्यानिमित्त ते दक्षिणेत आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यांनी काशीतील ज्ञान, वेद, शिवउपासना दक्षिणेत नेली. त्यामुळे त्यांना ‘दक्षिण दिशेचे कुलगुरू’ म्हणतात. त्यांना तामिळ व्याकरणाचे जनकही मानले जाते. त्यांनी ‘अगत्तियम’ नावाचे पहिले तामिळ व्याकरण लिहिले, असे मानले जाते. दुर्दैवाने तो ग्रंथ आता उपलब्ध नाही. ‘तामिळ संगम साहित्य’ सुरू करण्यामागे त्यांची प्रेरणा होती. त्यांच्या १२ शिष्यांनी पहिला ‘संगम’ स्थापन केला. म्हणून, तामिळनाडूत त्यांना ‘तामिळ थाईचे वडील’ म्हणतात.
अगस्त्य ऋषी शिवाचे मोठे भक्त होते. त्यांनी काशीतील शैवपरंपरा तामिळनाडूत नेली. रामेश्वरम् येथे रामाने जेव्हा शिवलिंग स्थापन केले, तेव्हा अगस्त्यांनीच पूजाविधी सांगितले, अशी कथा आहे. तामिळनाडूत अगस्त्यांनी अनेक शिव मंदिरे आणि तीर्थे स्थापन केली. उत्तरेतील औषधी आणि विज्ञान त्यांनी दक्षिणेत नेले. ‘अगस्त्य संहिता’मध्ये आयुर्वेद, खगोल, जलशुद्धीकरण याबद्दल लिहिले आहे. दक्षिणेत त्यांनी शेती, जलसंधारण आणि औषधी वनस्पतींचे ज्ञान दिले.
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, जर काशी म्हणजे शिवाचे घर आहे आणि तामिळनाडू म्हणजे तामिळचे घर आहे; तर अगस्त्य ऋषी हे त्या दोन घरांना जोडणारे द्वार आहे. ते उत्तरेकडून दक्षिणेत ज्ञान घेऊन गेले आणि दक्षिणेकडून उत्तरेला भक्ती घेऊन आले.
आदि शंकराचार्य यांचा काशी आणि तामिळ यांच्यातील दुव्यात खूप मोठा वाटा आहे. त्यांना ‘भारताला एका सूत्रात बांधणारे आचार्य’ म्हटले जाते. त्यांचा जन्म ७८८ साली 'केरळम्'मधील कालडी गावात झाला. हे तामिळ सांस्कृतिक प्रदेशातच येते. वयाच्या ३२व्या वर्षी काशीमध्येच त्यांनी देह ठेवला, असे मानले जाते. त्यांचे संपूर्ण आयुष्यच दक्षिण ते उत्तर या दुव्याचे प्रतीक आहे. शंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतभर चारधामांची यात्रा केली. तामिळनाडूतील कांची कामकोटी पीठ हे त्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक आहे. त्यांनी तामिळ प्रदेशात शैव आणि वैष्णव मंदिरांमध्ये जाऊन प्रवचने दिली. मीनाक्षी मंदिर, मदुराईमधील त्यांची चर्चा प्रसिद्ध आहे. काशीला येऊन त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथे अद्वैताची शिकवण दिली. ‘निर्वाण शतकम्’ आणि ‘काशी पंचकम्’सारखी स्तोत्रे काशीमध्येच लिहिली. त्यांनी काशीला ‘मोक्षाची भूमी’ म्हणून पुन्हा प्रस्थापित केले. शंकराचार्यांनी तीन मोठी कामे केली, ज्यामुळे उत्तर-दक्षिण जोडले गेले :
१. भाषा : त्यांनी संस्कृतमध्ये भाष्य लिहिले; पण तामिळ प्रदेशात जाऊन स्थानिक भाषेतही उपदेश दिला.
२. मठ व्यवस्था : भारताच्या चार कोपर्यांत चार मठ - उत्तरेला बद्रीनाथ, दक्षिणेला शृंगेरी/कांची, पूर्वेला पुरी, पश्चिमेला द्वारका. यामुळे एकाच परंपरेचा धागा सगळीकडे गेला.
३. स्तोत्र आणि भक्ती : त्यांनी लिहिलेली ‘भज गोविंदम्’, ‘सौंदर्य लहरी’ ही स्तोत्रे आजही तामिळ आणि हिंदी दोन्ही भागांत गायली जातात.
आदि शंकराचार्य यांनी दक्षिणेचे भक्ती आणि तत्त्वज्ञान उत्तरेकडे आणले आणि दोन्हीला अद्वैताच्या सूत्रात बांधले. म्हणूनच, त्यांना ‘काशीचा संन्यासी’ पण ‘तामिळचा सुपुत्र’ म्हणतात.
या दोघांशिवाय अनेक संत आणि ऋषींनी काशी आणि तामिळनाडूला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येकाचे कार्य फार मोठे आहे. विस्तारभयास्तव त्यांचा फक्त उल्लेख करत आहे.
१. नयनार संत : ६३ शैव संत. हे सर्व तामिळनाडूचे आहेत. यांपैकी तिरुज्ञानसंबंधर, अप्पर, सुंदरर; ज्यांना ‘तेवरम् त्रिमूर्ती’ म्हणतात, यांचा मोठा वाटा आहे.
२. रामानुजाचार्य : जन्म तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर. वैष्णव भक्तीचा प्रसार केला. त्यांनी काशीला येऊन काहीकाळ वास्तव्य केले आणि तिथे शिष्य बनवले. काशीतील अनेक मठ आजही रामानुज संप्रदायाशी जोडलेले आहेत.
३. स्वामी विवेकानंद : जन्म कोलकात्यात; पण त्यांनी भारतभर यात्रा करताना काशी आणि तामिळनाडू दोन्ही ठिकाणी भाषणे दिली. त्यांनी काशीला भारताची ‘आध्यात्मिक राजधानी’ म्हटले आणि तामिळनाडूला ‘भक्तीची भूमी’ म्हटले.
४. राघवेन्द्र स्वामी : मध्व संप्रदायाचे संत. कर्नाटकात जन्म; पण त्यांनी काशी आणि तामिळनाडू दोन्ही ठिकाणी प्रवास केला. त्यांच्या अनुयायांमध्ये आजही काशीतील ब्राह्मण आणि तामिळ माध्व ब्राह्मण यांचा जवळचा संबंध आहे.
५. सिद्ध परंपरा : तामिळनाडूतील १८ सिद्धांपैकी बरेच जण काशीला आले होते. यांपैकी सिद्ध भोगर यांनी पलानी येथे नवपाषाण मूर्ती बनवली. ते काशीमध्ये रसायनशास्त्र शिकले, अशी मान्यता आहे.
६. आधुनिक संत : श्री चंद्रमौलिश्वर. काशीतील काशी अय्यर समुदाय - हे गेल्या ३००-४०० वर्षांपासून वाराणसीत राहणारे तामिळ ब्राह्मण आहेत. ते काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करतात आणि तामिळ पद्धतीने सण साजरे करतात. हे स्वतःच जिवंत दुवा आहेत.
७. महाकवी चिन्नास्वामी सुब्रमण्यम् भारती यांचाही या दुव्यात महत्त्वाचा वाटा आहे.
यांच्या बरोबरीने १५व्या शतकात मदुराई आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य करणारे पांड्य वंशाचे राजे जटिलवर्मा पराक्रम पंड्या हे काशी आणि तामिळनाडूमधील धार्मिक संबंधांचे मुख्य दुवे मानले जातात. त्यांनी तामिळनाडूमध्ये ‘काशी विश्वनाथर मंदिर’ बांधले. या परिसराला ‘तेनकासी’ म्हणजेच, ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते. त्यांनी उत्तर आणि दक्षिण भारतातील शैवपरंपरेला आणि संस्कृतीला एकाच धाग्यात गुंफण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य केले.
या पार्श्वभूमीवर काशी आणि तामिळ यांच्यातील समान दुव्यांचा मागोवा घेतल्यास खालील बाबींचा उल्लेख करावा लागेल :
१. आध्यात्मिक आणि धार्मिक दुवा -
शैवपरंपरा : काशी विश्वनाथ आणि तामिळनाडूतील चिदंबरम्, रामेश्वरम् ही शिवाची प्रमुख १२ ज्योतिर्लिंगे आहेत.
नयनार संत - ६३ तामिळ शैव संतांनी काशीला ‘काशीपती’ म्हणून गाणी लिहिली आहेत.
अगस्त्य ऋषी हा दुवा मानला जातो. ते तामिळ भाषेचे जनक मानले जातात आणि काशीमध्येही त्यांचे तपोस्थान आहे.
रामेश्वरम् कथा : रामाने रावणवध केल्यानंतर शिवलिंगाची स्थापना रामेश्वरम्ला केली आणि त्यानंतर मुक्तीसाठी काशीला येणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे तामिळ भाविकांसाठी रामेश्वरम् ते काशी यात्रा परंपरा आहे.
२. भाषा आणि साहित्याचा दुवा
महर्षी अगस्त्य : तामिळ व्याकरण ‘अगत्तियम’चे लेखक. ते काशीहून दक्षिणेत आले, अशी मान्यता.
सुब्रमण्यम् भारती : प्रसिद्ध तामिळ कवी. काहीकाळ वाराणसीत राहिले. इकण मध्ये तामिळ विभाग आहे. १९२१ पासून इकण मध्ये तामिळ शिकवले जाते.
३. इतिहास आणि व्यापार
व्यापार मार्ग : प्राचीन काळात दक्षिणेकडून व्यापारी गंगामार्गे काशीला येत असत. काशीतील तामिळ संगम भागात आजही तामिळ ब्राह्मण कुटुंबे राहतात. त्यांना ‘काशी अय्यर’ म्हणतात.
काशी मंडपम् : वाराणसीत तामिळनाडू सरकारने बांधलेला धर्मशाळा/मंडप आहे. इथे तामिळ यात्रेकरू राहतात.
४. सण आणि परंपरा
कार्तिक दीपम् : तामिळनाडू आणि काशी दोन्ही ठिकाणी कार्तिक महिन्यात दिव्यांचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. ‘काशी तामिळ संगम’ची चौथी आवृत्ती पण ‘कार्तिक दीपम्’च्या वेळीच घेण्यात आली होती.
गंगा आरती आणि तेवरम् : काशीतील संध्याकाळच्या आरतीत ‘तामिळ तेवरम्’ पठण केले जाते.
काशी अय्यर यांची कहाणी म्हणजे काशी-तामिळ एकत्वाचा जिवंत पुरावा आहे. अय्यर म्हणजे तामिळ ब्राह्मण. जे गेल्या कित्येक पिढ्यांपासून वाराणसीमध्येच राहात आहेत. त्यांची संख्या आज सुमारे पाच ते दहा हजार आहे.
१६व्या शतकात विजयनगरचे राजे आणि नंतर मराठ्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हा पूजेसाठी, वेदपठणासाठी आणि मंदिर सांभाळण्यासाठी तामिळनाडूमधून विद्वान ब्राह्मणांना बोलावले गेले. त्यानंतर १८व्या शतकात पेशव्यांनी काशीमध्ये खूप मंदिरे बांधली. तेव्हा तंजावर, मदुराईमधून पुजारी, पंडित, शास्त्री काशीला आले.
त्यांना काशीमध्ये जमीन आणि मान दिला गेला. हळूहळू ते इथेच स्थायिक झाले. हे घरी तामिळ बोलतात; पण बाहेर हिंदी. मुले दोन्ही भाषा अस्खलित बोलतात. यातील ८० टक्के लोक काशी विश्वनाथ मंदिरात पुजारी आहेत. बाकीचे संस्कृतचे शिक्षक, ज्योतिषी, पुरोहित आहेत. दिवाळी, शिवरात्री यासोबतच पोंगल, तामिळ नववर्षसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरे करतात. ते स्वतःला, ‘आम्ही काशीवासी आहोत; पण मूळ तामिळ आहे’ असे म्हणतात. काशी अय्यरांच्या घरी तुम्हाला एकाच वेळी शिवलिंग आणि मीनाक्षीचा फोटो दिसेल. ‘काशी तामिळ संगमम्’मध्ये काशी अय्यर हेच मुख्य समन्वयक असतात. ते दोन्ही बाजूंची भाषा, रीत समजतात.
‘काशी तामिळ संगमम्’
अशा सर्व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दुव्यांचे महत्त्व अधोरेखित करून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’अंतर्गत उत्तर आणि दक्षिण यांना जोडणारा धागा फक्त राजकीय नाही, तो आध्यात्मिक आणि भाषिक आहे, हे प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २०२२ मध्ये ‘काशी तामिळ संगमम्’ सुरू केले. हा उत्तर भारतातील वाराणसी (काशी) आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक, भाषिक आणि ऐतिहासिक संबंध पुन्हा जोडणारा व साजरा करणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा समन्वय ‘आयआयटी मद्रास’ आणि ‘बीएचयू वाराणसी’ करत असून; याला संस्कृती मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय; सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन, तसेच उत्तर प्रदेश सरकार यांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे :
सांस्कृतिक जवळीक : काशी आणि तामिळनाडू या दोन्ही प्राचीन संस्कृतींमधील समान वारसा आणि आपुलकीचे संबंध नव्याने समजून घेणे.
विद्यार्थ्यांचा सहभाग : दोन्ही प्रदेशांमधील विद्यार्थी, शिक्षक, कलाकार आणि अभ्यासक यांना परस्परांच्या परंपरा जवळून अनुभवण्याची संधी देणे.
भाषिक आदान-प्रदान : तामिळ भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करणे. २०२५च्या चौथ्या आवृत्तीत ‘तमिल करकलम्’ (तामिळ शिका) ही मुख्य थीम होती.
आयोजन व स्वरूप -
सहभागी घटक : या महोत्सवात तामिळनाडूवरून आलेले हजारो प्रतिनिधी, विद्यार्थी, हस्तकलाकार आणि विद्वान वाराणसीला भेट देतात.
विशेष सत्रे : काशी विश्वनाथ मंदिर दर्शन, परिसंवाद, पारंपरिक कला सादरीकरण आणि शैक्षणिक अभ्यास दौरे आयोजित केले जातात. आतापर्यंत या कार्यक्रमाच्या चार आवृत्या झाल्या आहेत.
पहिली आवृत्ती - २०२२ : ही एक महिना चालली. विद्वान, विद्यार्थी, कलाकार आले होते.
दुसरी आवृत्ती - २०२३ : दि. १७ ते ३० डिसेंबर. बौद्धिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करणे.
तिसरी आवृत्ती - २०२५ : दि. १५ ते २४ फेब्रुवारी. यावेळी ‘महाकुंभा’च्या पार्श्वभूमीवर झाली. थीम होती- महर्षी अगस्त्य यांची शिकवण.
चौथी आवृत्ती KTS ४.० - २०२५ : दि. २ डिसेंबर २०२५ रोजी वाराणसीत सुरू झाली आणि दि. १५ डिसेंबरला रामेश्वरम् येथे समारोप झाला. याची थीम- Let Us Learn Tamil - Tamil Karkalam म्हणजे, ‘चला तामिळ शिकूया.’
तामिळनाडूतून १ हजार, ४००हून अधिक प्रतिनिधी विद्यार्थी, शिक्षक, लेखक, शेतकरी, कारागीर, महिला, आध्यात्मिक लोक अशा सात गटांत सहभागी झाले होते. यामध्ये वाराणसी, प्रयागराज, अयोध्या-काशी विश्वनाथ मंदिर, बीएचयू, सारनाथ येथे भेटीचा आठ दिवसांचा दौरा आयोजित केला होता.
या आवृत्तीत काही नवीन उपक्रम केले गेले :
१. Tamil Karpom : काशी भागातील ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तामिळनाडूत जाऊन तामिळ शिकण्याची संधी.
२. Tamil Karkalam : ५० तामिळ शिक्षक वाराणसीच्या शाळांमध्ये बोलकी तामिळ शिकवायला आले.
४. Sage Agastya Vehicle Expedition : तेनकासी ते काशी असा प्राचीन सांस्कृतिक मार्ग दाखवणारी वाहन यात्रा.
या सर्व प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रत्यक्ष कृती आणि अनुभूतीमधून भारताच्या एकत्वाचा सकारात्मक संदेश देण्याचा उपक्रम भारत सरकारने सुरू केला आहे. त्याला आपणही सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.
९९३०३०९४५१