बुद्धांचा वारसा : विश्वाशी जोडणारी भारताची ओळख!

    13-Aug-2026   

 Buddhist Circuit India

भारतासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचा वारसा ही एक अमूल्य सभ्यतागतसंपदा. ‘बौद्ध सर्किट’च्या माध्यमातून भारत आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे जतन करताना जगाशी शांतता, सहअस्तित्व, विश्वास आणि सांस्कृतिक सहकार्याचा नवा संवाद प्रस्थापित करीत आहे. त्यामुळे ‘बौद्ध सर्किट’ ही केवळ धार्मिक पर्यटनाची योजना नसून, भारताच्या सांस्कृतिक वारशाचा, कूटनीतीचा आणि जागतिक भूमिकेचा महत्त्वपूर्ण आधार ठरत आहे.
 
तथागत भगवान गौतम बुद्ध हे भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि तात्त्विक परंपरेतील सर्वाधिक प्रभावशाली दार्शनिक आहेत. इ.स.पूर्व सहाव्या शतकात त्यांनी करुणा, प्रज्ञा, अहिंसा, समता आणि मध्यम मार्गावर आधारित धम्माचा संदेश दिला. हा संदेश केवळ तत्कालीन समाजापुरता मर्यादित राहिला नाही, तर पुढील अनेक शतकांमध्ये आशियातील विविध देशांच्या संस्कृती, कला, स्थापत्य, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला. बुद्धांचा धम्म हा कोणत्याही एका समाजाचा किंवा राष्ट्राचा नसून, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे, ही त्यांची शिकवण आजही तितकीच समकालीन आणि प्रेरणादायी वाटते.
 
आज श्रीलंका, थायलंड, म्यानमार, जपान, व्हिएतनाम, भूतान, कंबोडिया, लाओस, मंगोलिया, दक्षिण कोरिया, तसेच इतर अनेक देशांमध्ये बुद्धांचे विचार समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या देशांतील कोट्यवधी नागरिकांसाठी भारत ही केवळ मैत्रीपूर्ण भूमी नाही, तर ‘बुद्धभूमी’ आहे. त्यामुळे भारताशी त्यांचे नाते केवळ राजनैतिक नसून सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक आहे. भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा हा प्रभावी पायादेखील मानला जातो.
 
याच महान वारशावर ‘बौद्ध सर्किट’ची संकल्पना उभी आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातील चार प्रमुख घटनांशी संबंधित लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर या पवित्र स्थळांना जोडणारा हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे. नेपाळमधील लुंबिनी येथे त्यांचा जन्म झाला, बिहारमधील बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली, उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे त्यांनी प्रथम ‘धर्मचक्र प्रवर्तन’ करून धम्माचा उपदेश केला आणि कुशीनगर येथे ‘महापरिनिर्वाण’ प्राप्त केले. याशिवाय, राजगीर, नालंदा, वैशाली, श्रावस्ती, संकिसा आणि पिप्रहवा ही स्थळेही बौद्ध इतिहासातील महत्त्वपूर्ण केंद्रे आहेत. या सर्व स्थळांचा एकत्रित विचार केला असता, ‘बौद्ध सर्किट’ हे भारताच्या सभ्यतागत सातत्याचे जिवंत प्रतीक असल्याचे स्पष्ट होते.
 
इतिहासात सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध विचारांना अभूतपूर्व राजाश्रय लाभला. मौर्य साम्राज्यात बुद्धांच्या विचारांचा प्रभाव यापूर्वीपासूनच अस्तित्वात होता. ‘कलिंग’ युद्धानंतर झालेल्या प्रचंड मानवी जीवितहानीने सम्राट अशोकांना अधिक अंतर्मुख केले आणि त्यांनी राज्यकारभारात धम्म, अहिंसा, करुणा, लोककल्याण आणि नैतिक मूल्यांना अधिक प्राधान्य दिले. भविष्यात संघर्ष आणि युद्धाऐवजी शांतता व सहअस्तित्वाचा मार्ग स्वीकारण्यावर त्यांनी भर दिला. सांची, सारनाथ, धम्मस्तंभ, स्तूप आणि शिलालेखांच्या माध्यमातून त्यांनी बुद्धांचा संदेश भारताबरोबरच श्रीलंका आणि आशियातील अनेक प्रदेशांपर्यंत पोहोचविला. त्यांचे पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेत बुद्ध धम्माचा प्रसार करून भारताचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ केले. त्यामुळे भारताची ओळख केवळ राजकीय शक्ती म्हणून नव्हे; तर शांतता, करुणा आणि नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारे राष्ट्र म्हणून अधिक दृढ झाली.
 
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिकवणीचा प्रसार विविध परंपरांमधून झाला. ‘थेरवाद’ परंपरा श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस आणि कंबोडियात विकसित झाली; तर ‘महायान’ परंपरेने चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम आणि मंगोलियात व्यापक प्रभाव निर्माण केला. ‘महायान’ परंपरेमुळे बौद्ध तत्त्वज्ञानाबरोबरच कला, चित्रकला, शिल्पकला, साहित्य आणि स्थापत्यालाही नवे आयाम मिळाले. या दोन्ही परंपरांचे मूळ भारताच्या भूमीत असल्यामुळे भारत आजही जागतिक बौद्ध वारशाचा नैसर्गिक केंद्रबिंदू मानला जातो.
 
‘नालंदा’, ‘विक्रमशिला’ आणि ‘तक्षशिला’ यांसारख्या प्राचीन विद्यापीठांनी भारतीय ज्ञानपरंपरेला जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. जगभरातील भिक्खू, अभ्यासक आणि विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. पाली, संस्कृत, तत्त्वज्ञान, वैद्यक, गणित, खगोलशास्त्र आणि बौद्ध अध्ययनाची ही महत्त्वाची केंद्रे होती. चीनचे प्रवासी फाहियान आणि ह्युएनत्सांग यांनी भारतातील बौद्ध केंद्रांचे केलेले वर्णन आजही इतिहासाचे विश्वसनीय दस्तऐवज मानले जाते.आधुनिक भारतात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्धांच्या समता, विवेक, बंधुता आणि मानवमुक्तीच्या विचारांची सामाजिक परिवर्तनासाठी चिकित्सा केली. दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी ‘धम्मदीक्षा’ स्वीकारत लाखो अनुयायांसह सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यांच्या ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथातून बुद्धांच्या विचारांचे आधुनिक संदर्भात सखोल विश्लेषण करण्यात आले. त्यामुळे बुद्धांचा वारसा आधुनिक भारतात सामाजिक समतेच्या आणि घटनात्मक मूल्यांच्या संदर्भात नव्या आशयाने समाजापर्यंत पोहोचला.
 
गेल्या काही वर्षांत भारताने या सांस्कृतिक वारशाला आधुनिक विकास आणि जागतिक कूटनीतीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संयुक्त राष्ट्र महासभा’, ‘जी-२० परिषद’, ‘ग्लोबल बुद्धिस्ट समिट’, तसेच विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भगवान बुद्धांच्या शांतता, करुणा आणि मानवकल्याणाच्या संदेशाचा सातत्याने उल्लेख केला आहे. ‘भारताने जगाला युद्ध नव्हे, बुद्ध दिले’ हा त्यांचा संदेश भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. २०२४ मध्ये ‘नालंदा’ विद्यापीठाच्या नव्या परिसराचे उद्घाटन करताना त्यांनी भारताच्या ज्ञानपरंपरेचा जागतिक संदर्भ अधोरेखित केला. ‘पाली’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णयही बुद्धसाहित्य आणि प्राचीन ज्ञानपरंपरेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
 
‘बौद्ध सर्किट’च्या विकासासाठी केंद्र सरकारने पर्यटन मंत्रालयामार्फत ‘स्वदेशदर्शन’ आणि ‘प्रशाद’ (PRASHAD) योजनांतर्गत विविध उपक्रम राबविले आहेत. बोधगया, सारनाथ, कुशीनगर, राजगीर, वैशाली, श्रावस्ती आणि इतर वारसास्थळांवर रस्ते, पर्यटक सुविधा, माहिती केंद्रे, स्वच्छता, प्रकाशयोजना, डिजिटल माहिती प्रणाली आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. यामुळे देशी-विदेशी पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित झाला आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे श्रीलंका, थायलंड, जपान, व्हिएतनाम आणि म्यानमारसारख्या देशांतील भाविकांना थेट बुद्धांच्या महापरिनिर्वाणस्थळी पोहोचणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, हस्तकला आणि लघुउद्योगांनाही चालना मिळाली. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने 'IRCTC Buddhist Circuit Tourist Train' ही विशेष पर्यटन रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेमार्फत बोधगया, राजगीर, नालंदा, वाराणसी, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, आग्रा आणि दिल्लीसह प्रमुख स्थळांचा नियोजित प्रवास उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटकांना एका नियोजनबद्ध प्रवासातून बौद्ध वारशाचा अनुभव घेणे अधिक सोयीचे झाले आहे.
 
भारताच्या ‘अ‍ॅट ईस्ट’ धोरणातही बौद्ध वारशाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. थायलंड, व्हिएतनाम, भूतान, श्रीलंका आणि इतर बौद्धबहुल देशांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र धातूंची प्रदर्शने आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनांना लाखो भाविकांनी भेट दिली. भारतात आयोजित ‘ग्लोबल बुद्धिस्ट समिट’मध्ये जगभरातील भिक्खू, संशोधक, अभ्यासक आणि विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या उपक्रमांमुळे भारताला ‘जागतिक बौद्धविचारांचे नैसर्गिक केंद्र’ म्हणून अधिक बळकटी मिळत आहे. ‘बौद्ध सर्किट’चा सर्वाधिक सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होताना दिसतो. तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यामुळे पर्यटन, निवासव्यवस्था, स्थानिक वाहतूक, मार्गदर्शक सेवा, हस्तकला, खाद्यव्यवसाय आणि लघुउद्योगांना नवे बळ मिळत आहे. बोधगया, सारनाथ, कुशीनगर, राजगीर आणि श्रावस्ती येथे वाढलेल्या पर्यटनामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळत आहे.
 
तथापि, वारसास्थळांचे वैज्ञानिक संवर्धन, बहुभाषिक माहिती केंद्रे, प्रशिक्षित पर्यटन मार्गदर्शक, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक संस्कृतीचे जतन या क्षेत्रांत सातत्याने सुधारणा आवश्यक आहे. तसेच भारत आणि नेपाळ यांनी लुंबिनीसह संबंधित स्थळांचा संयुक्त पर्यटन आराखडा अधिक प्रभावीपणे विकसित केल्यास संपूर्ण ‘बौद्ध सर्किट’ अधिक आकर्षक ठरू शकते. ‘बौद्ध सर्किट’चा विकास या व्यापक दृष्टीने झाला; तर तो भारताच्या सांस्कृतिक अस्मितेला अधिक बळ देईल, स्थानिक विकासाला गती देईल आणि जगाशी शांतता, सहकार्य व विश्वासाचा संवाद अधिक दृढ करेल. भारताच्या सभ्यतागत वारशाचे आधुनिक जगाशी नाते जोडणारा हा उपक्रम आगामी काळात सांस्कृतिक कूटनीतीचा अधिक प्रभावी आधार ठरेल.
 
९९६७०२०३६४




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर
404 - Page Not Found

404

Page not found

Sorry, we couldn't find the page you're looking for.

Return to homepage