रांगोळीच्या माध्यमातून नश्वर रेषांना कलेचे चिरंतनपण देत आपली स्वतंत्र वाट निर्माण करणार्या श्रावणी रोशन पाटील यांच्याविषयी...
माणूस कला का निर्माण करतो, याचे उत्तर कदाचित त्याच्याकडेही नसते. जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा लागतो; पण जगण्याला अर्थ येण्यासाठी आणखी काहीतरी लागते. एखादी रेषा काढावीशी वाटते, एखादा रंग दुसर्या रंगाशेजारी ठेवावा वाटतो. ही ओढ कुठून येते, हे सांगता येत नाही. कदाचित, माणसाला जे शब्दांत सांगता येत नाही, तेच कलेतून व्यक्त होत असावे. म्हणूनच, कला हे केवळ कौशल्य नाही. कौशल्य हाताला आकार देते आणि त्यामागची दृष्टी कलाकृतीला अर्थ! इतरांच्या नजरेतून निसटणारा एखादाच क्षण, एखादा रंग, एखादी रेषा कलाकाराला थांबवते. तो त्याला आपल्या पद्धतीने ती पुन्हा घडवतो. कलेचे आयुष्य किती आहे, याची त्याला चिंता नसते. काही टिकते, काही नाहीसे होते; पण निर्माण करण्याची आस कायम असते. नश्वरतेची जाणीव असूनही सुंदर काहीतरी निर्माण करत राहणे, हेच कदाचित कलेचे खरे सौंदर्य. रांगोळीची कला तर या नश्वर सौंदर्याचेच एक रूप. जमिनीवर उमटणारी प्रत्येक रेषा, प्रत्येक रंग आणि प्रत्येक आकृती अल्पायुषीच असते; पण ती घडवणार्या कलाकाराची दृष्टी त्याकडे बघत नाही. अशीच एक रांगोळी कलाकार म्हणजे श्रावणी रोशन पाटील.
पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात, चित्रांच्या रंगांत रमणारी एक मुलगी मोठी होत होती. आई-वडील आणि भाऊ एवढेच तिचे विश्व. त्या विश्वात रंगांशी खेळण्याची मोकळीक तिला होती. कागद मिळाला की, त्यावर काहीतरी उमटवावे, एखादी आकृती पुन्हापुन्हा काढावी, रंगांच्या छटांमध्ये हरवून जावे, श्रावणींचे बालपण अशाच छोट्या आनंदांनी रंगत गेले. पालकांनी त्यांच्या हातातली ही गोष्ट ओळखली. मुला-मुलींच्या गुणाला केवळ छान आहे म्हणून थांबवायचे नसते; त्याला वाटही करून द्यायची असते. श्रावणींच्या पालकांनी नेमके तेच केले. शाळेची पुस्तके आणि चित्रकलेचे कागद, या दोन्हींची सांगड घालत श्रावणी मोठ्या होत गेल्या. पुढे कलेलाच शिक्षणाचा विषय करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. बारावीनंतर पुण्यातील भारती विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स’ची पदवी घेतली. चित्रकलेचा हा औपचारिक अभ्यास सुरू असतानाच, त्यांच्या आयुष्यात रांगोळीची एक वेगळीच वाट उघडत होती.
चित्रकलेबरोबर रांगोळी शिकावी, असा सल्ला पालकांनी त्यांना शालेय काळातच दिला होता. कदाचित, त्यावेळी तो एक साधा सल्ला वाटला असेल. पण, काही साध्या गोष्टींचे आयुष्यात पुढे मोठेच अर्थ निघतात. श्रावणींनी आईच्या मदतीने रांगोळीच्या काही शिबिरांत प्रशिक्षण घेतले. १५ दिवसांत बरीच तंत्रे आत्मसात झाली. मात्र, तंत्र शिकणे ही सुरुवात होती; खरी परीक्षा त्यानंतरच होती.
रांगोळीचा हात सफाईदार होण्यासाठी केवळ आवड पुरत नाही. रेषा कितीही वेळा वाकवली, तरी ती मनासारखी वळेपर्यंत तिच्याशी मैत्रीच करावी लागते. श्रावणींनी ती मैत्री सात-आठ वर्षे जपली. कार्यक्रम मिळाले म्हणून रांगोळी काढली असे नव्हे; रांगोळी काढण्यासाठी सराव केला आणि सरावातूनच कार्यक्रम आले. याकाळात पालकांच्या ओळखीतून काही रांगोळ्या काढल्याही गेल्या; पण त्यांचा मुख्य सोबती होता, तो सराव. रोजच्या सरावातून हात अधिक स्थिर होत गेला आणि त्यातूनच कल्पनांना अधिक मोकळे आकाश मिळत गेले.
पुढे रोशन पाटील त्यांच्या आयुष्यात आले. तंत्रज्ञान शाखेत शिक्षण घेतलेले, नामांकित कंपनीत नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम करणारे रोशन हे व्यावसायिकदृष्ट्या वेगळ्या जगातले; पण मनाने कलेच्या जगाशी त्यांचे नाते होतेच. ते स्वतः उत्तम चित्रकार आहेत आणि रांगोळीचीही त्यांना जाण आहे. लग्नानंतर श्रावणींच्या हातातील रंग थांबू नयेत, असेच त्यांना वाटले. त्या एका पाठिंब्याने ‘रंगछंद’चा जन्म झाला. आज ‘रंगछंद’शी चांद्यापासून बांद्यापर्यंतचे ३० पेक्षा अधिक रांगोळी कलाकार जोडले गेले आहेत. पारंपरिक रांगोळी असो, पोर्ट्रेट असो किंवा सामाजिक विषयाला भिडणारी रांगोळी, रंगांच्या साहाय्याने विचार मांडण्याचा हा प्रयत्न सुरूच आहे. श्रावणींच्या कलेला रोशन यांची समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीसाठीही अनमोल साथ मिळते; त्यांच्या सासर्यांचाही कामात तितकाच हातभार.
कलेचा हा प्रवास स्वतःपुरताच ठेवण्याची इच्छा श्रावणींना नाही. ‘आपणासी जे काही ठावे, ते इतरांसी सांगावे’ या भावनेतूनच, श्रावणी आणि रोशन यांनी ‘सहरंग’ची सुरुवात केली. आजवर ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी रांगोळीचे प्रशिक्षण दिले आहे. ‘ऑनलाईन’ माध्यमातून हे रंग आता भारताच्या पलीकडेही पोहोचले आहेत, अगदी अमेरिका, दुबई, युरोपपर्यंत. एका घरातील रंगांची मैफील, आता अनेक घरांत रंगत आहे. श्रावणींनी ‘रंगछंद’च्या माध्यमातून आजवर जवळपास ५०० रांगोळ्या साकारल्या आहेत. त्यांच्या रांगोळीची तीन प्रदर्शने भरली आहेत. पंढरपूर येथील राज्यस्तरीय अक्षर संमेलनात त्यांना ‘अक्षरगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, पुरस्कारापेक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे, त्यांच्या हातातील कला आता दुसर्यांकडेही जात आहे.
पुढे ‘सहरंग’चा विस्तार करून चित्रकलेतील विविध कलांचे सर्व वयोगटांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था उभी करण्याचे श्रावणींचे स्वप्न आहे. पोर्ट्रेट रांगोळीचे पुस्तक काढण्याचाही त्यांचा मानस आहे. रांगोळीचे अल्पायुषीपण श्रावणींना ज्ञात आहे. कदाचित, म्हणूनच त्या ती अधिक मनापासून काढतात. कारण, रंग टिकत नाहीत; रेषा टिकत नाहीत, टिकतो तो एका कलाकाराने कलेतून दिलेला निर्भेळ आनंद! श्रावणींच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
-कौस्तुभ वीरकर