पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी स्त्रीशक्तीचा आदर्श घालून दिला, प्रजेला आपले कुटुंब मानले. धर्म, संस्कृती आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित ठेवला. कर्तृत्व, करुणा आणि न्यायाची ज्यांची अमर गाथा, अशा महान लोकमातेचे उद्या दि. १३ ऑगस्ट रेाजी पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने या राजमातेच्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि समाजशीलतेची महती शब्दबद्ध करणारा हा लेख...
मल्हाराव होळकर या महापराक्रमी सरदाराच्या घराण्यात पर्यायाने राज घराण्यात सून म्हणून पदार्पण केले व नंतर सरदारकीची वस्त्रे परिधान केल्यावर सर्व सत्ता, संपत्ती, वैभव यांचा वारसा लाभलेला असला, तरीदेखील लौकिक अर्थाने विचार करता, अहिल्यादेवी होळकर यांच्याएवढं दुर्दैव भारताच्या इतिहासातील क्वचितच महिलांच्या वाट्याला आले असेल. पण असे असतानाही, अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर आहेच आणि अनेक शतकं ती तशीच राहील. अपमृत्यूने अहिल्याबाईंवर सातत्याने फास टाकले, त्यात यथानुक्रमे पती, सासरे, मुलगा, जावई, मुलगी या सार्याभोवती हे फासे करकचून आवळले गेले होते व भौतिक जीवनात उरल्या होत्या, एकाकी अहिल्यादेवीच. कोणासाठी जगायचे, हा प्रश्न मल्हाररावांनी पतीनिधनासमयी सती जायला निघालेल्या अहिल्येला परावृत्त करून सोडवला होता. जनतेच्या कल्याणासाठी जीवन जगण्याचा निर्णय घेऊन तो अखेरच्या श्वासापर्यंत समर्पितपणे पूर्ण केला. मराठेशाहीत राजमाता जिजाबाई व कोल्हापूरच्या राणी ताराबाई यांनी ज्याप्रमाणे संकटसमयी मराठी राज्याची धुरा स्वकर्तृत्वावर स्त्री असूनही समर्थपणे वाहिली, त्याचप्रमाणे अहिल्यादेवींनी होळकरशाहीचा राज्यकारभार आपल्या उच्च राजनीतीच्या तत्त्वांवर आलेल्या संकटांची तमा न बाळगता, अत्यंत मुत्सद्दीपणाने व कुशलतेने चालविला, हे तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांवरून सिद्ध होते. महेश्वर दरबारची पत्रे त्यांच्या मुत्सद्दीपणाची व राजकीय चातुर्याची साक्ष देतात. त्यांची राजनीति शिवछत्रपतींनी घालून दिलेल्या व पुढे पेशव्यांनी चालविलेल्या राजनीतीच्या तत्त्वांवर आधारभूत असल्याने पुणे दरबारात त्यांच्या शब्दाला खूप महत्त्व दिले जात असे.
अहिल्यादेवींच्या काळातील नाणी दोन प्रकारांत विभागली जातात. माहेश्वर येथील टंकसाळातली ज्यावर शिवलिंग, बिल्वपत्र, प्राणी अशी चित्रे असत, जी केवळ दानधर्म, पुण्यकर्म आणि धार्मिक कार्यांतच वापरली जात असत. मल्हारनगर येथील टंकसाळातली नाणी ज्यांच्यावर सूर्य आणि चंद्र मुद्रित असत. सोन्याची नाणी नव्हती, मात्र तांबे आणि चांदीची नाणीच होती. चांदीची नाणी एक आणे, दोन आणे, चार आणे, आठ आणे आणि एक रुपया मूल्याची होती, जी माहेश्वर आणि मल्हारनगर या दोन्ही ठिकाणांच्या टंकसाळातील होती. त्यांचे साहसी राजकारण, सत्यप्रियता व अन्यायाची चीड यांमुळे प्रजेचा विश्वास त्यांनी सहज संपादन केला. त्यांनी आपल्या मुलखाचा विस्तार करण्यासाठी परराज्यावर डोळा ठेवला नाही. त्यामुळे होळकरशाहीत, इतर संस्थानात धुमसत असलेली वितुष्टे व अमानुष लढाया असले प्रकार अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत फार क्वचितच घडले, हेच त्यांच्या उत्तम राजनीतीचे व राज्यकारभाराचे द्योतक समजावयास हवे. अहिल्यादेवी माणसांची पारख फार चोखंदळपणे करत असत. एखाद्या पदावर एकदा नेमलेला अधिकारी बदलण्याचा प्रसंग सहसा त्यांच्यावर आला नाही.
अहिल्यादेवींचे त्या काळातल्या परराज्यातील राजांशी, ज्यातील काही जे त्यांचे मांडलिक होते, तर काही स्वतंत्र असून ही त्यांच्याशी व्यवहार ठेवून होते, त्यासर्वांशी संबंध सलोख्याचे, तसेच प्रसंगानुरूप कठोर व सोबतच शिकवण देणारे असे होते. रजपूत लोकांची व नर्मदेच्या काठावर वास्तव्य करणारी गोंड लोकांची पुष्कळ संस्थाने तेव्हा होळकरांना खंडणी देत असत. आपल्या सामर्थ्याच्या दुरुपयोग करत त्यांनी ठरलेल्या खंडणीपेक्षा अधिक खंडणी कधीच कोणाकडून मागितली नाही, अहिल्याबाईंच्या या धोरणामुळे खंडणी देण्यास सहसा कोणीच विलंब करतच नसे. आणि चुकून कोणी तसा कधी प्रयत्न केलाच, तर लगेच त्या त्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करत की खंडणी चुकवणार्याची बुद्धी जागेवर येऊन ते क्षमा मागत व त्वरित खंडणी पाठवत असत. अहिल्याबाईसाहेबांची मनापासूनची इच्छाही असे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळी खबरदारी घेत असत की, आपल्याप्रमाणेच इतर ही राज्यांची भरभराट व्हावी.
आपली राज्यव्यवस्था सुधारण्यासाठी, तसेच आपल्या रयतेस सर्व सुखे देता यावीत, यासाठी वेळोवेळी सल्लामसलत करण्याकरिता प्रत्येकांच्या दरबारी त्यांनी आपला एकेक हुशार वकील नेमलेला होता. शिवाय, त्या सर्वांनी आनंदी राहावे व आपल्या राज्यास कधी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, म्हणून आपल्या कारकिर्दीत त्यांनी त्यांना काही विशेष प्रकारचे हक्कही दिले होते. अहिल्याबाईसाहेबांच्या अशा उदार स्वभावामुळे व त्यांच्या विलक्षण अशा जरबेमुळे त्यांचे सर्व मांडलिक त्यांच्याशी इतक्या नम्रतेने वागत असत की, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कोणीही आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस केले नाही; उलट त्या सर्वांना वाटे की, अहिल्याबाईंनीच त्यांच्यावर सतत कृपा ठेवावी. त्यावेळी हिंदुस्थानात पुणे, म्हैसूर, हैदराबाद, नागपूर, बडोदा, ग्वाल्हेर, भरतपूर, दिल्ली, लखनौ व कोलकाता इतकी स्वतंत्र राज्ये होती. या सर्वांशी बाईसाहेबांचा वेळोवेळी पत्रव्यवहार होत असे. आपल्या सासर्यांच्या वेळी त्यांच्याशी जे तहनामे झालेले होते, तेच त्यांनी पुढेही पाळले व ते कायम राखण्याकरिता प्रत्येक ठिकाणच्या राजदरबारी नेहमी त्यांचा वकील नेमलेला असे. तथापि, झालेल्या तहनाम्यांचे कोणी उल्लंघन करून आपल्या राज्याविषयी वाईट विचार करू नये, त्यांच्यावर वचक राहावा, म्हणून व आपल्या प्रजेस आणि स्वातंत्र्यास धक्का पोहोचू नये, म्हणून आपल्या पूर्ण विश्वासाच्या अशा दोन जंगी फौजा एक उत्तर हिंदुस्थानात व एक दक्षिणेत तैनात केलेल्या असत, पण सुदैवाने त्यांचा उपयोग करण्याचा कधी प्रसंगच उद्भवला नाही. भूतदया, औदार्य व नीतीने प्रजापालन इत्यादी लोकोत्तर सद्गुणांविषयी बाईसाहेबांची कीर्ती सर्वदूर पसरलेली असल्यामुळे त्यांच्या अधिकाराचा अपहार करण्याचे कोणी कधी धाडसही करीत नसे.
श्रीमंत पेशव्यांना तर अहिल्याबाईंच्या एक कणखर महिला म्हणून व त्यांच्या राज्यव्यवस्थेचा, परोपकार-बुद्धीचा मोठा अभिमान सतत वाटत असे व ते त्यांचा योग्य सन्मानसुद्ध करत असत आणि केवळ पेशवेच नव्हे, तर म्हैसूरचा टिपू सुल्तान, हैदराबादी निजाम, कोलकात्याचा गव्हर्नर व लखनौचा नवाब हेही आदर करत असत व त्यांची निरंतर भरभराट होण्याची इच्छा व्यक्त करीत असत, यावरून मुसलमान, तसेच परकीय राजांची जर त्यांच्याविषयी इतकी पूज्यबुद्धी होती, तर स्वकीय हिंदूराजांची किती चांगली राहिली असावी, याचा अंदाज सहज लावता येऊ शकतो.
कोणीही हिंदूराजा त्यांच्याशी वैर करत नसे अथवा त्यांच्यावर कोणी आक्रमण केल्यास त्यांना मदत न करणे, हे गोहत्येसारखे पातक समजत असत; पण संकटप्रसंगी अहिल्याबाईंच्या उपयोगी पडण्याला भाग्याचेच समजत असत. परकीय राजांच्या अंतःकरणात अहिल्याबाईसाहेबांविषयी जी पूज्यबुद्धी, आदर होता, त्याला त्यांची राज्यकारभार करण्याची पद्धत, केवळ आपल्याच राज्यांतील प्रजेविषयी नव्हे, तर इतर राज्यांतील प्रजेचे, सर्वच ठिकाणची मंदिरे, धर्मशाळा, विहिरी, तळे, मोठे ग्रंथागार, अन्नछत्र अशा कित्येक गोष्टींवर जातीने लक्ष ठेवले होते, तसेच त्यांचा ठायी नसलेला आप-परभाव हाही एक विशेष उल्लेख करावा असा गुण होता, ज्यामुळे इतर राजे त्यांच्याविषयी आदरभाव ठेवून होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण हयातीत तरी होळकरांच्या स्वातंत्र्याचा नाश करण्यास परकीय राज्यांतून कोणालाही धैर्य झाले नाही. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या सासर्यांचे सामर्थ्य, त्यांची शिकवण कायम ठेवले होते. श्रीमंत पेशव्यांशी मल्हाररावांचे जे सेव्यसेवकपणाचे नाते होते, ते त्यांनीही अबाधितच ठेवले होते. मल्हारराव होळकरांएवढाच एकनिष्ठ स्वामीभक्तीचा वारसा अहिल्याबाईंनीही पुढे नेला होता. राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो, याच नीतितत्त्वाने अहिल्याबाईंनी आपले आचरण हयातभर सिद्ध केले व लोककल्याणकारी राज्य केले. "ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे, ते पार पाडणे, हे माझे कर्तव्य आहे. रयतेला सुखी ठेवणे, हे माझे काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करीत आहे, त्याचा मला परमेश्वरापुढे अखेरीस जाब द्यावा लागेल,’ हे अहिल्याबाईंचे वाक्य म्हणजे राज्यकर्त्यांची सनदच होय!
(लेखिका हिंदू वीरशैव-लिंगायत अभ्यासक आहेत.)
-शिल्पा स्वामी निंबाळकर