दि. ५ ऑगस्ट रोजी मुंबईतील सचिवालय जिमखाना येथे ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे संयोजक इंद्रेशकुमार होते. कार्यक्रमाला बौद्ध आध्यात्मिक गुरू पाल्गा रिंपोचे आणि महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती हेाती. ‘देशहित सर्वतोपरि’ असा आशय निर्माण करत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचा मागोवा...
लडाखमध्ये सिंधू महाकुंभ मेळ्यात जाण्याचं निमित्त झालं. त्यानिमित्ताने देशाच्या दुर्गम भागांत, कुडकुडत्या थंडीत, सिंधू नदीच्या घाटावर झालेल्या या कुंभमेळ्यात सर्व पंथांच्या सहभागाने राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यास भाग पाडलं. इंद्रेशकुमार यांनी गेल्या ३० वर्षांच्या अखंड तपस्येतून साकारलेला हा कार्यक्रम केवळ धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीयत्वाच्या एकात्मिक साधनेला वृद्धिंगत करणारा ठरेल, यात शंकाच नाही. विशेषतः बौद्ध लामा आध्यात्मिक धर्मगुरू श्री पाल्गा रिंपोचे यांच्या हस्ते झालेले सिंधूपूजन जनमनात रुंजी घालण्यास सुरुवात करेल.
सिंधू महाकुंभ लेखाचं निमित्त आणि महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी इंद्रेशकुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान करण्याचा विचार राज्यपालांच्या हस्ते घडून येणं, हा दुग्धशर्करा योग जुळून आला. अंतिम टप्प्यात स्वतः महामहीम जिष्णू देव वर्मा उपस्थित राहणार म्हटल्यावर, आम्हा सर्वांच्या जबाबदार्या खूप वाढल्या. राजशिष्टाचार सांभाळणे, निमंत्रण वेळेत पोहोचणे, प्रत्येक निमंत्रिताचा मानसन्मान सांभाळणे एक वेगळेच आव्हान होते. अण्णा बनसोडे आणि त्यांचे प्रशासकीय सहकारी, खासगी सहकारी यांनी अगदी कमी अवधीतच केलेल्या व्यवस्था ही एक जणू जादूई यंत्रणाच वाटत होती.
विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच इतर व्यवस्था करताना सर्वश्री आप्पा निंबरे, मनोज रानडे, मिलिंद कदम, हेमंत पाटील, यतीश टेंगसाळ, संजय पराडकर, शिवराम राजापूरकर, अमोल पेडणेकर, योगिता साळवी, राजेश सावंत अशा अनेकजणांनी क्षमतेच्या पलीकडे जाऊन दिलेल्या योगदानामुळेच कार्यक्रम यशस्वी करता आला. प्रत्येक नावाचा उल्लेख अशयच. अनेक नावांचा उल्लेख राहूनही गेलाय. त्याबद्दल दिलगीर असेनच.
दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या
मूर्तीला पुष्पहार घालून, सचिवालय जिमखान्यात कार्यक्रमाची सुरुवात झाली. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे स्वागत करून, इंद्रेशकुमार आणि पाल्गा रिंपोचे यांना मंचावर आमंत्रित केलं. यावेळी विविध पंथांचे धर्मगुरू, मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, "इंद्रेशकुमार आणि पाल्गा रिंपोचे हे समाजात आशा, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रेरणादायी स्रोत आहेत. भारत ही, भगवान गौतम बुद्धांची पावनभूमी असून, महात्मा गांधी यांच्या सत्य अहिंसेच्या विचारांमध्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची स्पष्ट छाप दिसून येते. भारतीय संविधानात समता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूल्यांचा समावेश झाला असून हीच भारताच्या लोकशाहीची खरी ताकद आहे,” असे त्यांनी सांगितले. "हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही भारताची शाश्वत सांस्कृतिक मूल्ये अबाधित राहिली असून, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भारतीय संस्कृतीची ओळख आजही जगाला दिशा देत आहे. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची एकात्मता आणि विविधतेतील ऐय जगासाठी आदर्श ठरते,” असे सांगत "आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी परमात्मा एकच आहे, या भावनेतून समाजाने परस्पर सन्मान आणि संवाद वाढविण्याची गरज आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं अभिनंदन केले. "भारतीय सभ्यता, समरसता आणि समतेची मूल्ये पुढे नेण्यासाठी अशा राष्ट्रीय एकात्मिक कार्यक्रमांची आज अत्यंत आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. अण्णा बनसोडे म्हणाले की, "अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिळणे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. समरसता, सामाजिक ऐय आणि राष्ट्रभावनेच्या जपणुकीसाठी कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान समाजाला सकारात्मक दिशा देणारा आहे.” अण्णा बनसोडे यांनी २५ भंतेंना चिवरदान केले. कार्यक्रमात इंद्रेशकुमार आणि पाल्गा रिंपोचे यांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, सामाजिक समरसता, अध्यात्म आणि मानवतेच्या मूल्यांवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रसाद राजापूरकर यांनी केले. कार्यक्रमास यशस्वी करणार्या सर्वांचे, श्रोत्यांचे आभार प्रदर्शन झाल्यावर संपूर्ण ‘वन्दे मातरम्’, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
- दयानंद सावंत