‘मुंबई वन’ची मोठी झेप! अवघ्या १० महिन्यांत १ कोटी ४ लाखांहून अधिक तिकिटांची नोंद

Mumbai One App Ticket Booking
 
मुंबई : (Mumbai One App Ticket Booking) मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीला एका डिजिटल व्यासपीठावर आणण्याच्या दिशेने ‘मुंबई वन’ने मोठी झेप घेतली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या एकात्मिक मोबिलिटी अ‍ॅपवर आतापर्यंत तब्बल १ कोटी ४ लाख ११ हजार ८२४ तिकिटांची नोंद झाली आहे. अवघ्या दहा महिन्यांत या अ‍ॅपने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘मुंबई वन’चे लोकार्पण करण्यात आले होते. विविध वाहतूक सेवांसाठी स्वतंत्र अ‍ॅपऐवजी एकाच प्लॅटफॉर्मवर तिकीट सुविधा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आतापर्यंत ८ लाख १६ हजार ४०२ डाउनलोड्स झाले असून, त्यापैकी ७४ टक्के Android तर २६ टक्के iOS वापरकर्ते आहेत. १.०४ कोटी तिकिटांचा टप्पा गाठत ‘मुंबई वन’ने मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीच्या डिजिटल एकत्रीकरणाला नवा वेग दिला आहे. (Mumbai One App Ticket Booking)
 
नवी मुंबई मेट्रो, BEST, TMT, NMMT, MBMT आणि KDMT बससेवाही या अ‍ॅपशी जोडल्या आहेत. त्यामुळे मेट्रो, लोकल आणि बस असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळ्या तिकीट प्रणालीऐवजी एका डिजिटल प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई वनच्या वापरात मेट्रोने आघाडी घेतली आहे. मेट्रो मार्गिका २ए, ७, २बी आणि ९ वरून ३० लाख १० हजार ५५४ तिकिटे बुक झाली आहेत. त्यानंतर मेट्रो मार्गिका १ वरून २८ लाख ४७ हजार ६८२, तर मेट्रो ३ वरून २४ लाख ३० हजार ३७० तिकिटांची नोंद झाली आहे. या तीन मेट्रो सेवांसह एकूण मेट्रो सेवांमधून ८२.८८ लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसाठीही १५ लाख ७० हजार ९०६ तिकिटे बुक झाली आहेत. (Mumbai One App Ticket Booking)
 
“एका अखंड डिजिटल मोबिलिटी व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण एमएमआरला अधिक जवळ आणण्याच्या उद्देशाने ‘मुंबई वन’ची संकल्पना साकारण्यात आली. अवघ्या १० महिन्यांत १ कोटी तिकीट बुकिंगचा टप्पा पार होणे म्हणजे प्रवाशांनी या एकात्मिक प्रवास पद्धतीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि बस सेवा एका ॲपद्वारे जोडून आपण अखंडपणे जोडलेल्या ‘वन एमएमआर’च्या आपल्या संकल्पनेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत.” (Mumbai One App Ticket Booking)
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
‘मुंबई वन’द्वारे बुक करण्यात आलेली वाहतूक सेवानिहाय तिकिटे
 
मेट्रो सेवा
मेट्रो मार्गिका २अ, ७, २ब आणि ९ – ३०,१०,५५४
मेट्रो मार्गिका १ – २८,४७,६८२
मेट्रो मार्गिका ३ – २४,३०,३७०
नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ – ३,३८,७१८
उपनगरीय रेल्वे सेवा
उपनगरीय रेल्वे – १५,७०,९०६
 
बस सेवा
 
BEST – १,५३,३२३
TMT – ३३,७०६
NMMT – १६,६९८
MBMT – ७,५५३
KDMT – २,३१४
 
‘मुंबई वन’द्वारे बुक करण्यात आलेली एकूण तिकिटे – १,०४,११,८२४
‘मुंबई वन’चे एकूण डाउनलोड्स : ८,१६,४०२
Android : ७४% | iOS : २६%
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर