पापाचा मुखवटा पांघरला तरी...

    12-Aug-2026

Manmohan Singh Clean Chit

कोळसा खाणवाटप प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेल्या ‘क्लीनचीट’चा आधार घेत, सोनिया गांधींनी त्यांना एका लेखातून ‘प्रभावशाली पंतप्रधान’ म्हणून गौरवले. मात्र, सिंग यांना मिळालेली ‘क्लीनचीट’ म्हणजे गांधी परिवाराला किंवा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या संपुआ सरकारला मिळालेली ‘क्लीनचीट’ नव्हे, हे समजून घ्यायला हवे.

एका प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आणि ‘सीबीआय’च्या सखोल तपासानंतर, दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने नुकतीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणात दोषमुक्त करत ‘क्लीनचीट’ दिली. या निर्णयाचे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळातून स्वागत होणे, हे स्वाभाविकच. मात्र, या निर्णयाचा फायदा घेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात भावनिक आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असा लेख लिहिला. "इतिहास मनमोहन सिंग यांना एक शांत, साधे; परंतु देशातील सर्वांत प्रभावशाली पंतप्रधानांपैकी एक म्हणून आदराने स्मरणात ठेवेल,” असे प्रशस्तिपत्र सोनियांनी या लेखात दिले. यासोबतच, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी जी मोहीम राबवण्यात आली, त्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा होता आणि आता या मंडळींनी मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. खरं तर सोनियांचा हा लेख म्हणजे एका माजी पंतप्रधानाचा गौरव नसून, त्यांच्या आडून काँग्रेसच्या काळातील महाघोटाळ्यांवर आणि गांधी घराण्याच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा एक अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे, हे सुजाण जनतेच्या लगेच लक्षात येईल.
सोनियांच्या पत्रातील सर्वांत मोठा आणि दिशाभूल करणारा दावा म्हणजे, मनमोहन सिंग हे स्वच्छ चारित्र्याचे होते, म्हणूनच संपूर्ण संपुआ सरकारचे आणि त्यातील मंत्रिमंडळाचे चारित्र्यच स्वच्छ होते, असा भासवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न. मनमोहन सिंग हे व्यक्ती म्हणून प्रामाणिक आणि सज्जन होते, याबाबत दुमत नसावे. त्यांच्या वैयक्तिक प्रामाणिकपणावर कधीही शंका घेतली गेली नाही. विशेष न्यायालयानेही त्यांना ‘क्लीनचीट’ देताना हेच निरीक्षण नोंदवले आहे की, कोळसा खाणींच्या वाटपातील काही फायलींवर त्यांनी स्वाक्षर्‍या केल्या असल्या, तरी त्यांना यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या कटकारस्थानाची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. याचा अर्थ असा होतो की, त्यांच्या हाताखालील भ्रष्ट मंत्री आणि अधिकार्‍यांनी त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून देशाच्या तिजोरीची मोठी लूट केली. मग प्रश्न असा आहे की, पंतप्रधान खरोखरच स्वच्छ चारित्र्याचे होते, तर त्यांच्या नाकाखाली देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे घोटाळे कसे घडले?
इथेच मुळात नैतिक आणि घटनात्मक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित होतो. संसदीय लोकशाहीत पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. देशाच्या तिजोरीचे रक्षण करणे, हे त्याचे आद्य कर्तव्य. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाने जे भलेमोठे घोटाळे पाहिले, ते कोणीही विसरू शकत नाही. १ लाख, ७६ हजार कोटी रुपयांचा ‘टू-जी स्पेट्रम’ घोटाळा; १ लाख, ८६ हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा, ‘आदर्श’ घोटाळा, ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर’ घोटाळा आणि ‘सबमरीन’ घोटाळा ही यादी न संपणारी अशीच. मनमोहन सिंग स्वतः भ्रष्ट नव्हते; पण या भ्रष्टाचार्‍यांवर त्यांनी कधीही कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. सत्तेत टिकून राहण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्याच्या नावाखाली त्यांनी या सर्व भ्रष्टाचाराला एकप्रकारे मूकसंमतीच दिली. गुन्हेगाराला शिक्षा न करणे किंवा त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, हेसुद्धा गुन्ह्यात सामील होण्यासारखेच. संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा अत्यंत मार्मिकपणे म्हटले होते की, "डॉ. मनमोहन सिंग यांना बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला अवगत आहे.” त्यामुळे एक सर्वोच्च नेता म्हणून हे त्यांचे सर्वांत मोठे प्रशासकीय आणि नैतिक अपयश होते.
सोनिया गांधी आज मनमोहन सिंगांबद्दल फुकाची सहानुभूती आणि आदर दाखवत आहेत. कारण, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा गांधी घराण्याने त्यांचा कसा सन्मान केला, याचा इतिहास खूप बोलका आहे. मनमोहन सिंग हे ‘रिमोट कंट्रोल’ पंतप्रधान होते, हे आता जगजाहीर सत्य. संपुआच्या दहा वर्षांच्या काळात सत्तेची सूत्रे ही सोनिया गांधींकडेच होती आणि जबाबदारी मात्र कठपुतळी असलेल्या मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर. सोनिया गांधी या ‘नॅशनल अ‍ॅडव्हायजरी कौन्सिल’च्या अध्यक्षा होत्या आणि संविधानाला डावलून थेट पंतप्रधानांपेक्षाही अधिक अधिकार त्या गाजवत होत्या, हे कदापि लपून राहिलेले नाहीच. सरकारच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयावर त्यांचाच अंमल असायचा. संजय बारू यांच्या ‘द अ‍ॅसिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकात आणि चित्रपटातही हेच वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेच. २०१३ मध्ये तर खुद्द काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग परदेश दौर्‍यावर असताना, पत्रकार परिषदेत त्यांच्याच मंत्रिमंडळाने संमत केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अध्यादेशाची प्रत ‘नॉनसेन्स’ असे म्हणत सर्वांसमक्ष फाडून फेकली होती. देशाच्या पंतप्रधानांचा आणि मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचा हा सर्वांत मोठा आणि जाहीर अपमान होता. त्यावेळी सोनियांचा हा आदर कुठे गेला होता? श्रेय घेण्याची वेळ यायची, तेव्हा ‘मनरेगा’ किंवा ‘माहिती अधिकारा’चे श्रेय गांधी घराण्याला दिले जायचे आणि घोटाळे उघडकीस यायचे, तेव्हा मनमोहन सिंगांना पुढे केले जायचे. आज गांधी घराण्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत, तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना अचानक मनमोहन सिंगांच्या प्रामाणिकपणाची आठवण झाली आहे, हा निव्वळ दुटप्पीपणाच!
संपुआ सरकारच्या काळात कोळसा खाणींचे वाटप पारदर्शक लिलावाविना मर्जीतील उद्योगपतींना फुकटात करण्यात आले होते, ज्यामुळे देशाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. याउलट, २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोळसा खाणींचे अत्यंत पारदर्शक पद्धतीने ‘ई-लिलाव’ केले, ज्यातून देशाच्या तिजोरीत लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. याला म्हणतात, राजकीय इच्छाशक्ती आणि स्वच्छ कारभार! मनमोहन सिंग यांच्या काळात जो ‘पॉलिसी पॅरालिसिस’ (धोरण लकवा) आला होता, त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले होते, हे सत्य नाकारुन चालणार नाही.
मनमोहन सिंगांना मिळालेली ‘क्लीनचीट’ ही केवळ कोळसा खाणवाटपाच्या एका ठरावीक खटल्यापुरती आणि त्यांच्या वैयक्तिक भूमिकेपुरती मर्यादित आहे. याचा अर्थ, संपूर्ण काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारमुक्त झाला, असा अजिबात होत नाही. गांधी घराण्याचे स्वतःचे ‘नॅशनल हेराल्ड’सारखे मोठे आर्थिक घोटाळे आजही न्यायप्रविष्ट आहेत आणि सोनिया व राहुल गांधी हे जामिनावर बाहेर आहेत, हे देशातील जनता विसरलेली नाही. रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त जमीन व्यवहार आजही चर्चेत आहेत. या सर्व भ्रष्टाचाराचे पाप मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला कधीच धुवून काढता येणार नाही. पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचे नेतृत्व कमकुवत होते आणि त्यांनी गांधी घराण्याच्या असंविधानिक हस्तक्षेपापुढे नेहमीच मान तुकवली, हे कटू सत्य इतिहासात नोंदवले गेले आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी लिहिलेला लेख हा स्वतःच्या पक्षाचे काळे उद्योग, पाप लपवण्यासाठी केलेला एक राजकीय बनावच. मनमोहन सिंग यांना न्यायालयाने ‘क्लीनचीट’ दिली असली, तरी जनमानसातील काँग्रेसची डागाळलेली प्रतिमा पुसण्यासाठी सोनिया गांधींनी लिहिलेले हे पत्र म्हणजे पापाचाच मुखवटा पांघरण्याचा प्रकार! शेवटी काय, तर एका व्यक्तीच्या स्वच्छ प्रतिमेमागे लपून संपूर्ण काँग्रेसचा भ्रष्ट चेहरा कधीच स्वच्छ होऊ शकत नाही, हेच खरे!




संबंधित मजकूर