मुंबई : (Kurla Landslide Incident) कुर्ला पश्चिम येथील अशोकनगरमध्ये भल्या पहाटे काळाने घाला घातला. टेकडी क्रमांक ३ याठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, अन्य ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची, तर जखमींना उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली आहे.
बुधवारी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी अशोकनगरमधील दरड कोसळून डोंगरावरील माती आणि मलबा चाळीतील दोन-तीन खोल्यांवर कोसळला. पहाटेची वेळ असल्याने गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. मोहम्मद समीर अन्सारी (वय १४), साहिल हुसेन अब्दुल काझी (वय १९), अबान आरिफ शेख (वय २), मनत आरिफ शेख (वय ४), मरजिना आरिफ शेख (वय २७), रमेश यादव (वय २७) आणि अज्ञात व्यक्ती (वय ४५) अशा सातजणांचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातून देण्यात आली आहे. (Kurla Landslide Incident)
तर सात जखमींना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सोहेल अन्सारी (वय १८), मोहम्मद अन्सारी (वय १४), नईमुद्दीन इक्बाल खान (वय २८) आणि साजिद अन्सारी (वय १६) यांचा समावेश आहे. यापैकी चौघांची प्रकृती स्थिर आहे. तर फराना दिलबर खान (वय २८), दिलबर अमनुल्ला खान (वय ३८) आणि शमीन मुस्लिम खान (वय २६) या तिघा जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Kurla Landslide Incident)
महापौरांकडून आर्थिक मदत जाहीर
कुर्ला दरड दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची, तर जखमींना उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा महापौरांनी यावेळी केली आहे. (Kurla Landslide Incident)
मृतांची नावे
मोहम्मद समीर अन्सारी (वय १४)
साहिल हुसेन अब्दुल काझी (वय १९)
अबान आरिफ शेख (वय २)
मनत आरिफ शेख (वय ४)
मरजिना आरिफ शेख (वय २७)
रमेश यादव (वय २७)
अज्ञात व्यक्ती (वय ४५)
जखमींची नावे
सोहेल अन्सारी (वय १८)
मोहम्मद अन्सारी (वय १४)
नईमुद्दीन इक्बाल खान (वय २८)
साजिद अन्सारी (वय १६)
फराना दिलबर खान (वय २८)
दिलबर अमनुल्ला खान (वय ३८)
शमीन मुस्लिम खान (वय २६)
पालिकेने नोटीस दिली, पण...
ज्याठिकाणी दरड कोसळून ही दुर्घटना घडली, त्या अशोकनगर टेकडी क्रमांक ३ येथील स्थानिक नागरिकांना मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. पावसाळ्याआधी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती. मात्र त्या नोटिशीकडे रहिवाशांनी कानाडोळा केला. (Kurla Landslide Incident)