मुंबई (विशेष प्रतिनिधी) - खारफुटीचे संवर्धन आणि स्थानिक समुदायांसाठी शाश्वत उपजीविकेची साधने निर्माण करण्याचा प्रभावी नमुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी येथे पाहायला मिळत आहे (harvesting Jitada). कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्मिती योजनेअंतर्गत हडी येथील श्री स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता गटाने जिताडा मत्स्यपालन प्रकल्पातून माशांची यशस्वी पैदास केली (harvesting Jitada). यातून गेल्या सहा महिन्यात जन्माला आलेल्या माशांना विकून गटाला सुमारे २.४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (harvesting Jitada)
राज्यात कांदळवन संरक्षणाबरोबरच त्यातून रोजगार निर्माण होण्याच्या अनुषंगाने २०१७ साली 'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका' निर्माण योजना सुरू करण्यात आली. या माध्यमातून 'कांदळवन कक्षा'च्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'अंतर्गत राज्यातील किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये गावकऱ्यांच्या 'कांदळवन सह-व्यवस्थापन समित्या' स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमधील लोकांना जिताडा ,खेकडा,कालवे, शिंपले पालन आणि शोभिवंत मत्स्यशेतीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. याच योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील मालवण येथील या प्रकल्पामध्ये जिताडा माशांचे पिंजरा पद्धतीने संगोपन करण्यात आले. प्रकल्पातील एकूण साठ्यापैकी सुमारे ५० टक्के माशांची काढणी करण्यात आली. त्यातून तब्बल ५३३ किलो जिताडा मासे मिळाले. बाजारात या माशांना सरासरी ४५० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने या काढणीतून सुमारे २.४० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे काढणीनंतर मासे थेट बाजारपेठेत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. जिताडा मासे जिवंत स्वरूपात गोवा येथील बाजारपेठेत वाहतूक करून विक्रीसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत झाली असून, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या मत्स्यसंपदेचे आर्थिक मूल्य वाढविण्याची संधी या उपक्रमातून निर्माण झाली आहे.खारफुटीचे संरक्षण केवळ पर्यावरणीय जबाबदारी न राहता त्यातून स्थानिकांना आर्थिक लाभ मिळू शकतो, हे हडी येथील जिताडा पालन प्रकल्पाने दाखवून दिले आहे. संवर्धन, मत्स्यव्यवसाय, बाजारपेठ आणि स्थानिक समुदाय यांची सांगड घातल्यास किनारी भागात शाश्वत उपजीविकेची नवी मॉडेल्स उभी राहू शकतात. सिंधुदुर्गातील हा प्रयोग त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण उदाहरण ठरत आहे.