घाटकोपरमध्ये मध्यरात्री भीषण दुर्घटना; घरांवर दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू, अनेक जण मलब्याखाली अडकल्याची भीती

    12-Aug-2026   

Ghatkopar Landslide
मुंबई (Ghatkopar Landslide) : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दि. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३:४८ च्या दरम्यान का भीषण दुर्घटना घडली. घाटकोपर पश्चिम (कुर्ला परिसर सीमा) येथील चिराग नगर भागातील गौसिया चॉलवर अचानक डोंगराचा एक मोठा भाग आणि भलामोठा पाषाण कोसळला. या दुर्दैवी दुर्घटनेत २ ते ३ घरे पूर्णपणे मलब्याखाली गाडली गेली असून, आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्‍याखाली अद्याप ६ ते ८ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. . स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मध्यरात्री अचानक मोठा आवाज झाला, पत्रे तुटले आणि झाडे व मोठमोठे दगड थेट घरांवर येऊन कोसळले. सर्व रहिवासी गाढ झोपेत असल्याने कोणालाही सावध होण्याची संधी मिळाली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदत सुरू केली आणि प्रशासनाला माहिती दिली. (Ghatkopar Landslide)



मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या, ४ अग्निशमन इंजिन, २ रेस्क्यू व्हेईकल, मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी अत्याधुनिक ’व्हिक्टिम डिटेक्शन कॅमेरा’ वापरण्यात येत आहे. मात्र, घटनास्थळाचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने तिथे मोठी यंत्रसामग्री किंवा पोकलेन नेणे अशक्य झाले आहे .एका वेळी केवळ एकच व्यक्ती जाऊ शकेल एवढी जागा असल्याने जवानांना केवळ हाताने आणि लहान साधनांच्या मदतीने ढिगारा उपसावा लागत आहे. या दुर्घटनेतील दोन मृतांचे पार्थिव शोधून काढून ते राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.



याशिवाय, ढिगार्‍याखालून काढण्यात आलेल्या दोन तरुणांवर कुर्ल्यातील पालिका संचलित भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .  मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सकाळीच घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील डोंगराळ भागातील अनधिकृत झोपड्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. (Ghatkopar Landslide)





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर