मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या आश्रमशाळेला कायमचे टाळे; तिघांवर गुन्हा - वाचा सविस्तर

Gadchiroli Ashram School Snakebite Incident
 
मुंबई : (Gadchiroli Ashram School Snakebite Incident) गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने संबंधित संस्थेविरोधात कठोर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर मुख्याध्यापकांसह अधीक्षक आणि महिला अधीक्षिकेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
विशेष म्हणजे, संबंधित आश्रमशाळेशी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे यांचा संबंध असल्याचे समोर येत असून, त्यांच्या लेटरहेडवरून प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवेदनही समोर आले आहे. या निवेदनात शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. ही शाळा एका ट्रस्टद्वारे चालवली जाते, ज्याचे सचिव स्थानिक काँग्रेस नेते विश्वजीत मारोतराव कोवासे आहेत.(Gadchiroli Ashram School Snakebite Incident)
 
आदिवासीबहुल जपतालाई येथील अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रम शाळेच्या आवारात ६५ मुली होत्या, तेव्हा सोमवारी पहाटे त्यापैकी सहा मुलींना सापाने दंश केला. त्यापैकी तिघींचा मृत्यू झाला. चौथी विद्यार्थिनी १२ वर्षीय दीपिका माडवी हिलाही सर्पदंश झाला होता, तिला विमानाने नागपूरला नेण्यात आले. सध्या तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (जीएमसीएच) बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.(Gadchiroli Ashram School Snakebite Incident)
 
चौकशी अहवालानंतर थेट फौजदारी कारवाई
 
या घटनेनंतर नियुक्त करण्यात आलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे प्रशासनाने कारवाई केली. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून धानोरा पोलिसांनी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनीही कठोर भूमिका घेतली असून संस्थाचालकावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी नागपूर येथे दिली.(Gadchiroli Ashram School Snakebite Incident)
 
‘राजकीय वजन’ बाजूला, विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोच्च
 
या कारवाईतून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारने संस्थेची राजकीय पार्श्वभूमी न पाहता कठोर भूमिका घेतल्याचा संदेश दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता रद्द करण्याचा घेतलेला निर्णय आणि पोलिसांकडून करण्यात आलेली फौजदारी कारवाई यामुळे आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता अधिक कडक नियंत्रणाची अपेक्षा निर्माण झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित प्रकरणात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, हा सरकारच्या कारवाईचा स्पष्ट संदेश मानला जात आहे.(Gadchiroli Ashram School Snakebite Incident)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर