संस्कृत भाषा, भारतीय तत्त्वज्ञान, धर्माभ्यास आणि आंतरधर्मीय संवाद या क्षेत्रांत जागतिक दर्जाचे काम उभे करणार्या विदुषी प्रा. डॉ. कला आचार्य यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे संस्कृताच्या पठडीत न अडकता कोषाबाहेरचे संशोधन करुन, स्वतःची देदीप्यमान कारकीर्द उभ्या करणार्या प्रा. डॉ. कला आचार्य यांना वाहिलेली शब्दसुमनांजली...
संस्कृत भाषा, भारतीय तत्त्वज्ञान, धर्माभ्यास आणि आंतरधर्मीय संवाद या क्षेत्रांत जागतिक दर्जाचे काम उभे करणार्या आणि पायाभूत योगदान देणार्या विद्वानांची संख्या तशी फारच कमी. त्यातही विदुषी म्हणजे स्त्री-अभ्यासकांची संख्या त्याहून कमी. संस्कृत अभिजात साहित्य आणि तत्सम रसालंकार क्षेत्रात रमणारे विद्वानही अनेक; पण अशा पठडीत न अडकता संस्कृतातून धर्मतत्त्वे आणि धर्माभ्यास यांत मूलभूत संशोधन करून,या क्षेत्रात स्वतःची देदीप्यमान कारकीर्द उभ्या करणार्या प्रा. डॉ. कला आचार्य.
दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रा. डॉ. कला आचार्य यांच्या दुर्दैवी निधनाने या क्षेत्रात, विशेषतः संस्कृत आणि भारतविद्येच्या क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईतील सोमय्या विद्याविहार येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज’मध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. कला आचार्य, आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत संशोधनकार्यात मग्न होत्या. त्या केवळ अभ्यासक अथवा संशोधक नव्हत्या, तर भारतीय संस्कृतीच्या आणि सनातन मूल्यांच्या खर्या अर्थाने जागतिक दूतही होत्या. संस्कृत भाषा व दर्शने यांचे अध्यापन, जागतिक स्थैर्यासाठी धर्मा-धर्मांमधील समन्वय आणि धर्मविचारांचे सखोल संशोधन, या त्रिसूत्रीवर आधारित त्यांचे जीवन आगामी अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील.
१९६९ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून उत्कृष्ट गुणांसह संस्कृत विषयात ‘एमए’ पदवी संपादन करत, चार ‘सुवर्णपदके’ आणि एक विशेष पारितोषिक जिंकले. पुढील काळात मुंबई विद्यापीठातून त्यांनी ‘पीएचडी’ पदवी पूर्ण केली. यानंतरच त्यांच्या अध्यापन व संशोधन क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात झाली.
१९८९ मध्ये ‘पद्मभूषण’ करमशी जेठाभाई सोमय्या यांच्या प्रेरणेने, ‘के. जे. सोमय्या भारतीय संस्कृती पीठा’ची स्थापना झाली. स्थापनेपासून डॉ. कला आचार्य या संस्थेच्या संचालक म्हणून कार्यरत राहिल्या. त्यांच्या प्रदीर्घ नेतृत्वात संस्थेने केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वेगळेच स्थान निर्माण केले. त्या के. जे. सोमय्या विद्यापीठाच्या धर्म विद्याशाखेच्या ‘अधिष्ठाता’ म्हणूनही कार्यरत होत्या.
संस्थेची धुरा सांभाळताना डॉ. शांतिलाल के. सोमय्या यांच्या आंतरधर्मीय संवादाच्या संकल्पनेला, त्यांनी खर्या अर्थाने मूर्त स्वरूप दिले. ऑगस्ट २०२० ते २०२५ पर्यंत त्यांनी ‘संस्कृतीसंवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’, मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षा आणि संचालिका म्हणून, तसेच ‘विवेक गुरुकुल’च्या संचालिका म्हणूनही समर्थपणे जबाबदारी सांभाळली.
डॉ. कला आचार्य यांचे अध्ययन-अध्यापन आणि संशोधनकार्य संस्कृत साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा आहे. आपल्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी ६०हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, विशेष करून अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, कंबोडिया, तैवान, कझाकस्तान, इराण, व्हॅटिकन सिटी, स्पेन, कोरिया आणि इटली येथे सादर केले. सखोल संशोधनातून निर्मित त्यांची ग्रंथसंपदा मांडणीतील सखोलतेमुळे आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनामुळे, अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
उदाहरणार्थ, ‘सप्तभूमिकाविचारः’ हा त्यांचा ग्रंथ; कैवल्यधाम, लोणावळा येथून प्रकाशित या ग्रंथात, त्यांनी वेदांती आणि बौद्ध दृष्टिकोनातून मानवी व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकास विचाराचा साकल्याने वेध घेतला आहे. तसेच ‘नाग पब्लिशर्स, दिल्ली’द्वारा १९९३ मध्ये प्रकाशित ‘पुराणिक कन्सेप्ट ऑफ दान’ या ग्रंथात ‘वेद’, ‘स्मृती’, धर्मसूत्रे आणि पुराणांमधील ‘दान’ या संकल्पनेचा अतिशय सूक्ष्म आणि सर्वसमावेशक अभ्यास त्यांनी मांडला. भारतीय समाजव्यवस्थेत दानाचे असलेले धार्मिक आणि सामाजिक महत्त्व, तसेच संपत्ती पुनर्वितरणामागील भारतीय अर्थशास्त्र त्यांनी याच ग्रंथातून उलगडून दाखवले. असेच महत्त्वाचे योगदान म्हणजे, २००२ मध्ये प्रकाशित झालेला ‘बुद्धानुस्मृती : अ ग्लॉसरी ऑफ बुद्धिस्ट टर्म्स’ हा त्यांचा ग्रंथ. बौद्ध तत्त्वज्ञानातील पारिभाषिक शब्दांचा हा अत्यंत प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण कोश आहे. या कोशात केवळ शब्दांचे अर्थ दिलेले नसून धम्म, चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग आणि प्रतीत्यसमुत्पाद यांसारख्या लिष्ट संकल्पनांची उकल सामान्यांना समजेल अशाच भाषेत त्यांनी केली आहे.
त्यांनी १४हून अधिक शास्त्रीय व संशोधनपूर्ण ग्रंथांचे संपादन केलेले असून, त्यांत प्रामुख्याने धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि तौलनिक धर्माभ्यास या विषयांचा समावेश आहे. ‘इंडियन फिलॉसॉफिकल टर्म्स : ग्लॉसरी अॅण्ड सोर्सेस’ हा भारतीय तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांमधील संकल्पना स्पष्ट करणारा कोश, भारतीय ज्ञानपरंपरेचा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरतो. ‘हिंदू-ख्रिश्चन डिशनरी’ हा व्हॅटिकन सिटीच्या ‘पॉण्टिफिकल अर्बनियाना युनिव्हर्सिटी’ आणि ‘भारतीय संस्कृती पीठम्’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित कोश, आंतरधर्मीय संवाद व अभ्यासातील ऐतिहासिक टप्पा मानला जातो.
याव्यतिरिक्त ‘इसेन्शियल्स ऑफ योग’, ‘भक्ती : पाथवे टू गॉड’, ‘रायमोन पणिक्कर : हिज लिगसी अॅण्ड व्हिजन’, ‘त्रि-दल’ आणि ‘मिस्टिस इन वर्ल्ड रिलिजन्स’ यांसारख्या अनेक ग्रंथांमधून त्यांनी, वैश्विक धर्म-समन्वयाच्या विचारांची मांडणी केली. अलीकडील तीन वर्षांतील (२०२३-२०२६) त्यांचे संशोधन प्रकल्पदेखील, त्यांच्या प्रचंड बौद्धिक क्षमतेची साक्ष देतात. ‘सप्तर्षी : आवर अँसेस्टर्स’ या प्रकल्पावर त्यांनी सखोल संशोधन केले. तसेच ‘भागवत’ पुराणावरील निवडक अध्यायांच्या भाष्यांचे भाषांतर आणि ‘सप्तभूमी:’ या हस्तलिखिताचे संपादन आदी प्रकल्प, त्यांच्या संशोधनाची अखंड गती दर्शवितात.
डॉ. कला आचार्य यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे, आंतरधर्मीय संवादासाठी जागतिक पातळीवरील त्यांनी घेतलेले अथक परिश्रम. त्यांच्या या कार्याची दखल घेत २००९ मध्ये, त्यांची ‘पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजन्स’च्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कझाकस्तानमध्ये दरवर्षी होणार्या ‘काँग्रेस ऑफ द लीडर्स ऑफ वर्ल्ड अॅण्ड ट्रॅडिशनल रिलिजन्स’च्या मुख्य कार्यात हिंदू धर्माच्या प्रतिनिधी म्हणून, २००३ ते २०१८ अशा प्रदीर्घ काळात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. दि. १० ऑटोबर २०१८ रोजी अस्ताना (कझाकस्तान) येथे झालेल्या सहाव्या काँग्रेसमध्ये त्यांना, कझाकस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नूरसुलतान नजरबायेव यांच्या हस्ते ‘सुवर्णपदक’ आणि ‘स्पिरिच्युअल लाईट’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले.
संशोधक, प्रगाढ विदुषी आणि लेखिकेसोबतच डॉ. कला आचार्य आदर्श ‘गुरुमाऊली’ होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आपली ‘पीएचडी’ पदवी पूर्ण केली. त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध विद्यापीठांमध्ये, प्राध्यापक आणि गुणी संशोधक म्हणून भारतीय संस्कृती व दर्शन परंपरेचा वारसा पुढे चालवत आहेत. विद्यापीठीय अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची जीवनदृष्टी घडविण्यावरही त्यांचा भर असे.
डॉ. कला आचार्य यांच्या संशोधन क्षेत्रातील असामान्य योगदानाचा गौरव केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरही झाला. त्यांना केंद्रीय आणि राज्य शासनाने अनेकसर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
संस्कृत भाषा, शिक्षण आणि धर्माभ्यास क्षेत्रांतील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने १९९४ मध्ये, उत्कृष्ट संस्कृत अभ्यासक म्हणून त्यांचा ‘संस्कृत पंडिता’ या पुरस्काराने गौरव केला. पुढे शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी २०१०-११ या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट विद्यापीठ शिक्षक’ पुरस्कारदेखील त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे त्यांना, संस्कृत क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘महामहोपाध्याय’ सन्मानही देण्यात आला.
संस्कृत भाषाभ्यास, संस्कृत प्रचार व प्रसार या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, भारत सरकारतर्फे २०१९ मध्ये त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रपती’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार त्यांच्या अखंड आणि समर्पित ज्ञानसाधनेची पोचपावती ठरतात.
दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. कला आचार्य यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांनी मागे ठेवलेला ज्ञानाचा आणि ज्ञानपूर्ण सेवेचा वारसा कधीही नष्ट न होणारा आहे. एका मुलाखतीत त्या म्हणतात, "स्वतःच्या हितापेक्षा इतरांच्या हिताला प्राधान्य देण्यातच खरा आनंद आहे. माझ्याकडे भौतिक संपत्ती नसली, तरी माझ्या छोट्या मार्गाने इतरांना मदत करते, मार्गदर्शन करते. यातच मला जीवनाची सार्थकता वाटते.” आपले हे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या पूर्णपणे जगल्या. यश म्हणजे केवळ पैसा आणि पद नसून, समाजात सकारात्मक योगदान देणे, हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला.
त्यांचे कार्य हे विद्यापीठीय चौकटीत अडकलेले नव्हते. भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, अध्यात्म आणि धर्म-परंपरांचा तौलनिक अभ्यास, अशा अनेक क्षेत्रांची अभ्यासपूर्ण सांगड त्यांच्या कार्यात दिसते. व्यक्तीच्या सर्वांगीण म्हणजे भौतिक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही बाबतीतील विकासासोबतच धर्मविचार, धर्मा-धर्मांतील मूलभूत समन्वय व मानवकेंद्री विचार त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या संशोधन व अध्यापनातून उद्धृत केला. संस्कृत भाषेला प्राचीन ग्रंथांच्या भाषांतरापुरते मर्यादित न ठेवता, आधुनिक जगात त्या ज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकतो, याचा त्यांनी प्रत्यक्ष वस्तुपाठच घालून दिला.
संस्कृत भाषा व तत्त्वज्ञानाचा लोकोपयोगी प्रचार, भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर केलेले संवर्धन आणि विविध धर्मांमध्ये संवाद व समन्वय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेले अजोड योगदान आपण भारतीय कधीही विसरू शकत नाही. डॉ. कला आचार्य यांच्या जाण्याने भारताने खर्या अर्थाने आधुनिक ‘संस्कृत पंडिता’, संशोधक-विदुषी आणि सच्ची ‘महामहोपाध्याय’ गमावली आहे. या महान तपस्विनीला, त्यांच्या अखंड ज्ञानसाधनेला आणि अथांग कार्याला अत्यंत भावपूर्ण आणि विनम्र श्रद्धांजली!
-राजेश वैंशपायन