निसर्गरम्य परिसर, शेजारील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने वाहणार्या नदीच्या कडेला वसलेल्या ‘शुभसरिता हाऊसिंग सोसायटी’च्या भूमीत यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्ताने ‘अभंगवारी शुभसरिता दारी’ हा आगळावेगळा सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा सारांश मांडणारा हा लेख...
आषाढी व कार्तिकी वारीच्या परंपरेत, वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. अभंग, भजन आणि संतवाणीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण होते. याच प्रेरणेतून ‘शुभसरिता सोसायटी’मध्ये ‘अभंगवारी शुभसरिता दारी’ या संकल्पनेचा जन्म झाला. संस्कृती, भक्ती, संगीत आणि सामुदायिक सहभाग यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवयास मिळाला.
आषाढी एकादशीच्या पावन दिवशी सोसायटीच्या आवारात सुमारे १ तास, २५ मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमात १५ कलाकारांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन व समन्वय प्रसाद आरोसकर यांनी केला, तर संगीत दिग्दर्शन व कलाकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संदीप बेलोसे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. मंचउभारणी, विठ्ठल-रुमिणीची मूर्ती, सजावट, ध्वनी व प्रकाशव्यवस्था, आसनव्यवस्था आदी सर्व तयारी सोसायटीतील सदस्यांच्या सहकार्याने साकारली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी लागणारा सर्व खर्च कलाकार व सोसायटीतील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे उचलला. संपूर्ण सोसायटीने एकजुटीने या कार्यक्रमात हातभार लावला.
कार्यक्रमाच्या तयारीसाठी १५-२० दिवस नियमित सराव करण्यात आला. गीतांची निवड, क्रमवारी, गायकांचे नियोजन यांसह सर्व बाबींचे बारकाईने नियोजन करण्यात आले. तबलावादनाची साथ विसपुते यांनी, तर पेटीवादनाची साथ सुर्वे यांनी दिली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व कलाकारांनी वेळेचे काटेकोर पालन करून मनापासून सराव केला.
सायंकाळी मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी काजल गावडे आणि मंजुषा बेलोसे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. प्रारंभी ‘वक्रतुण्ड महाकाय’, ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’, ‘ओंकारस्वरूपा’ या स्तोत्रांसह शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बालकलाकार आराध्य बेलोसे व अद्वैत नायर यांनी ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ हे गीत सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. सोसायटीचे सचिव सुनील भगत यांनी ‘यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी’ ही गवळण सादर केली, तर बाळकृष्ण शेंद्रे यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ या गीतातून विठ्ठलभक्तीची अनुभूती दिली. बालकलाकार ऋचा आरोसकर हिने ‘रखुमाई रुसली, कोपर्यात बसली’ हे गीत सादर करून आई-बाळाच्या नात्याचा भावस्पर्शी अविष्कार घडविला. आद्या राणे हिने ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हे गीत आपल्या मधुर आवाजात सादर केले. त्यानंतर स्मिता दळवी यांनी ‘देव माझा विठू सावळा’ हे गीत सादर करून विठ्ठलाचे सुंदर रूप शब्दांत उभे केले.
संदीप बेलोसे यांनी ‘अवघे गरजे पंढरपूर’ हे गीत सादर करताच, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. करुणा महाजन हिने ‘टाळ बोले चिपळीला’ या गीताने रसिकांची मने जिंकली, तर बालकलाकार मनस्वी बेलोसे हिने ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’ हे गीत इतया सुंदररीत्या सादर केले की श्रोत्यांनी तिला ‘वन्स मोअर’ची दाद दिली
.
यानंतर किशोर जव्हारकर यांनी ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी’ हे गीत दमदार आवाजात सादर केले. अक्षता मावळंकर यांनी ‘रखुमाई रखुमाई, तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालेना’ हे गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. ममता ठाकूर यांनी ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली. कार्यक्रमाची सांगता सार्थक बेलोसे यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’ या लोकप्रिय गीताने केली. त्यानंतर सर्व कलाकारांनी एकत्रित ‘हेचि दान देगा देवा’ ही आरती सादर करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमादरम्यान प्रसादाची व्यवस्था मनीषा जोशी व मंगेश दळवी यांनी केली, तर सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी निलेश गीते व कारंडे यांनी यशस्वीपणे सांभाळली. उपस्थित प्रेक्षकांनी हा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व अविस्मरणीय झाल्याची भावना व्यक्त केली. समाजातील सर्व वयोगटांतील सदस्यांनी एकत्र येऊन भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐयाचा सुंदर संगम घडवून आणला. पंढरपूर वारीची अनुभूती कार्यक्रमामूळे प्राप्त झाली. अन् खर्या अर्थाने ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगातील भावार्थ या कार्यक्रमातून साकार झाला आणि ‘अभंगवारी शुभसरिता दारी’ हा उपक्रम सर्वांच्या कायम स्मरणात राहील, असा अविस्मरणीय सोहळा ठरला.
- संतोष सुर्वे