मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जमिनीच्या पृष्ठभागाखाली अधिवास करणाऱ्या ‘वाम’ माशांच्या जगात भारतातून एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक नोंद झाली आहे (earthworm eels) . उत्तर भारतातील सिंधू-गंगा मैदानी प्रदेशातून संशोधकांनी वाम माशांचे नवे कुळ आणि या कुळातील नवी प्रजाती शोधून काढली आहे (earthworm eels). विशेष म्हणजे या महत्त्वपूर्ण शोधाची सुरुवात एका टिक टॉक व्हिडीओपासून झाली (earthworm eels). हातपंपातून पाण्यासोबत बाहेर आलेल्या विलक्षण माशाच्या व्हिडीओने संशोधकांचे लक्ष वेधले आणि त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेतून या नव्या माशाची ओळख पटली. (earthworm eels)
बिहारमधून शोधलेल्या या नव्या माशाच्या कुळाला ‘गंगायईक्तिस’ आणि त्यातील नव्या प्रजातीला ‘गंगायईक्तिस इंडोनेपालीकस' असे नाव देण्यात आले आहे. या संशोधनात ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अग्रवाल, चायनिज अकॅडमी आफ सायन्सचे यू हे आणि झूलॅजिकल सर्वे आफ इंडियाचे अनिल मोहोपात्रा यांचा समावेश आहे. गंगायईक्तिस या नावाची निर्मिती गंगा नदीचे संस्कृत नाव असलेल्या ‘गंगा’ आणि माशासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रीक ‘ichthys’ या शब्दापासून करण्यात आली आहे. त्यामुळे या नावाचा अर्थ साधारणतः ‘गंगेचा मासा’ असा होतो. या माशाची नवी प्रजाती भारत-नेपाळ सीमेच्या परिसरात, बिहारच्या नेपाळलगतच्या भागातून आढळून आली. या भौगोलिक आढळावरून प्रजातीचे नाव इंडोनेपालीकस ठेवण्यात आले आहे. सिंधू-गंगा मैदानी प्रदेशाच्या भूगर्भीय अधिवासातून अशा प्रकारच्या माशाची ही पहिली नोंद असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
नव्याने वर्णन केलेल्या या माशाची लांबी साधारण चार सेंटीमीटर आहे. मात्र आकाराने लहान असलेल्या या माशाची शरीररचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो जमिनीच्या पृष्ठभागाखालील अंधाऱ्या आणि मर्यादित वातावरणात वास्तव्य करत असल्यामुळे त्याच्या शरीरात त्यानुसार उत्क्रांतीजन्य बदल झालेले दिसतात. या माशाचे डोळे त्वचेखाली झाकलेले आणि अविकसित आहेत. त्याचे शरीर जवळपास रंगहीन असून, बरगड्यांचीही वाढ पूर्ण झालेली नसल्याचे आढळून आले. प्रकाशाचा अभाव असलेल्या भूगर्भातील अधिवासात दृष्टीची आवश्यकता कमी होत गेल्याने डोळ्यांच्या विकासात घट होणे, तसेच शरीराचा रंग कमी होणे यांसारखी वैशिष्ट्ये भूगर्भीय किंवा भूमिगत अधिवासाशी जुळवून घेण्याचे संकेत मानले जातात. या वैशिष्ट्यांमुळे हा मासा सामान्य नदी, तलाव किंवा प्रवाहात आढळणाऱ्या माशांपेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो.
प्रजातीच्या जमिनीखालच्या वास्तव्यामुळे त्यांना शोधून काढणे आव्हानात्मक होते. हातपंप शोधणे, परत त्या पंपाच्या मालकाला मासा शोधण्यासाठी पाणी उपसायचे आहे हे पटवून देणे, ही सगळी दिव्ये पार पाडल्यानंतर पाणी उपसायला सुरुवात व्हायची. या सगळ्यात हाताने पाणी उपसणे हे सर्वांत आव्हानात्मक होते. – अक्षय खांडेकर, संशोधक
टिक टॉक व्हिडीओमुळे शोध
या प्रजातीच्या संशोधनामागची कहाणीही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका टिक टॉक व्हिडीओमध्ये हातपंपातून पाण्यासोबत एक विचित्र दिसणारा मासा बाहेर येताना दिसला. रंगहीन शरीर, विलक्षण शरीररचना आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जमिनीखालून हातपंपाच्या पाण्यासोबत त्याचे बाहेर येणे यामुळे हा व्हिडीओ संशोधकांच्या नजरेत आला. यानंतर संशोधकांनी उपलब्ध वैज्ञानिक साहित्य आणि जुन्या संशोधन नोंदी तपासण्यास सुरुवात केली. सिंधू-गंगा मैदानी प्रदेशातून अशा प्रकारच्या भूमिगत अधिवास करणाऱ्या माशाची यापूर्वी अधिकृत नोंद नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा केवळ एखाद्या ज्ञात प्रजातीचा असामान्य आढळ नसून विज्ञानासाठी पूर्णपणे नवीन प्रजाती आणि कदाचित त्याहूनही मोठ्या वर्गीकरणीय गटाचा शोध असू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली. पहिला मासा मिळवण्यासाठी संशोधकांना तब्बल सुमारे दोन हजार लिटर पाणी हाताने पंप करून बाहेर काढावे लागले. त्यानंतर दुसरा नमुना मिळवण्यासाठी आणखी सुमारे ५०० लिटर पाणी उपसावे लागले. उपसलेले पाणी वाया न घालवता शेतीसाठी वापरण्यात आले.ो