_202608121214471885_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
अवघे जग म्हणते की, ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप!’ मात्र, त्याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या ससाणेनगरच्या त्या विकृत महिलेने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. ती कोण होती? तिने असे का केले? याचा मागोवा घेतल्यावर वाटते की, ती कुणीही असू दे; पण ती विकृत आणि महामूर्ख होती. महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचे मोठेपण समजून घेण्याची तिची लायकीही नाही. तिने असे का केले असेल? तिला हे कृत्य करण्यासाठी कुणी भडकावले का? कुणी सांगितले होते का? किंवा ही घटना घडण्याआधी तिच्या संपर्कात कोण होते? याचा छडा लावणे गरजेचे आहे. अर्थात, ती खूप नासमझ किंवा भोळीभाबडी होती म्हणून तिला कुणी फूस लावली, हे म्हणायचे नाहीच. कारण, ती भूक लागली तर अन्नच खायची, विष्ठा नाही. त्यामुळे तिच्या कृत्याचा निषेध आहे आणि तिला सजा व्हायलाच हवी.
तसेही दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा महापुरुषांना समाजाने वाटून घेतले आहे. त्यांच्या विचारांना आचाराचे रूप देणार्यांची संख्या त्यामानाने कमीच. हे वातावरण समाजविघातक शक्तींसाठी अत्यंत सुपीक! त्यामुळेच महापुरुषांच्या नावाने राजकारण करायचे, समाजात तेढ निर्माण करायची संधी आणि शक्ती समाजविघातक शक्तींना मिळते. महापुरुषांच्या विचारांचा अपप्रचार करायचा किंवा त्यांच्या विचारांना तोडून-मोडून मांडायचे, हाच समाजविघातकांचा अजेंडा. या पार्श्वभूमीवर या मूर्ख महिलेने ते निंदनीय कृत्य का केले, याचा पद्धतशीरपणे मागोवा घेणे आवश्यक आहे. कारण, एखादी व्यक्ती असे घाणेरडे कृत्य करते आणि त्याची फळे समाजाला भोगावी लागतात. याआधीही देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात महापुरुषांच्या प्रतिमेचा आणि पुतळ्याचा अपमान समाजकंटकांनी केला आणि त्यानंतर समाजात अशांतता निर्माण झाली. पुण्यातल्या या घटनेमध्येही असाच प्रयत्न आहे का? कृत्य करणारे हात जरी तिचे असले, तरीसुद्धा ती अमंगळ उत्तेजना देणारे आणखी कुणी आहे का, याचा शोध घ्यायला हवा. असो. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, या घटनेने महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सगळ्या अनुषंगाने या विकृत कृत्याला माफी नाहीच!
कुणी सत्ता देते का सत्ता?
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे मी दि. ८ तारखेला लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होतो. किती स्वप्ने पाहिली की, लाखो विद्यार्थी येतील. मग मी पेपरफुटी, बेरोजगारी, बोलता-बोलता ‘देखो भैया’ म्हणत थेट भाजप सरकार, मोदी, संघावर टीका करणार, मग ते विद्यार्थी संतप्त होऊन योगी-मोदींच्या विरोधात आंदोलन करतील. उत्तर प्रदेशचे आणि मोदींचे सरकार पडेल. पण, कार्यक्रमाला लाखोंच्या तुलनेत मोजकेच विद्यार्थी? पण, हे आम्ही अजिबात कबूल करणार नाही. त्यामुळेच तर आम्ही म्हणालो की, पाऊस होता, चिखल होता, तरीही विद्यार्थी भाषण ऐकण्यास उभे होते. काय म्हणता? ते विद्यार्थी स्वतः आले होते की, त्यांना कुणी आणले होते? या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही, तसेही मी कसलेच उत्तर देत नसतो.
आमची माणसे संसदेत गोंधळ घालतात ते काय उगीच? संसद चालू दिली, तर संसदेमध्ये उत्तर द्यावे लागेल, ते पण अगदी सत्य आणि वास्तव उत्तर. तेवढे कुठे मला जमणार? ‘झाकली मूठ सव्वालाखाची‘ तसेच आहे हे! तर काय म्हणत होतो की, माझ्या संवाद कार्यक्रमाला जे विद्यार्थी जमले होते, त्यांच्यासमोर मी माझे विचार मांडले. काय म्हणता? मी अशा किती ‘भारत जोडो’ वगैरे यात्रा काढल्या. दक्षिणेपासून अगदी काश्मीरपर्यंत वातानुकूलित वाहनांमधून, वातानुकूलित निवासस्थानात राहून यात्रा काढल्या. पण, त्यानंतरही देशात भाजपचेच सरकार आले. येऊ दे; पण महाराष्ट्रात उबाठा-दादांमुळे आम्हाला जरा बरे दिवस आले. केरळम्-कर्नाटकमध्ये आमच्या हक्काच्या मतदारांवर आम्ही जिंकलो. त्यांना अल्पसंख्य म्हटले जाते; पण त्यांच्यामुळे आम्ही बहुमताने जिंकलो. कारण, आम्ही सेक्युलर आहोत. काय म्हणता, मी स्वतःला ब्राह्मण आहोत असे सांगायचो? अरे समजून घ्या. देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि त्यांची मते मिळावी म्हणून मी स्वतःला ब्राह्मण म्हणत असतो. पण, तरीही भारताच्या लोकांचे समाधान होत नाही. युवानेता म्हणता-म्हणता आता मी ज्येष्ठपर्वाकडे वळत आहे. पण, तरीही देशात सत्ता मिळत नाही. ‘कुणी सत्ता देते का रे सत्ता?’ अरे, हा आवाजाचा ‘इको साऊंड’ कुठून आला? काय म्हणता, मुंबईच्या वांद्रे आणि राजगडावरून ‘कुणी सत्ता देते का सत्ता?’ या माझ्या विधानाचा ‘इको साऊंड’ आला?
९५९४९६९६३८