‘असद’चा अध्याय संपला!

    12-Aug-2026   

Bashar al-Assad Death Sentence

सीरियामध्ये सुमारे पाच दशकांपासून सुरू असलेल्या असद घराण्याच्या अनियंत्रित, क्रूर आणि दडपशाहीच्या राजवटीचा अखेर औपचारिक न्यायालयीन अंत झाला आहे. सीरियाच्या एका न्यायालयाने देशाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचा मामेभाऊ आतिफ नजीब यांना युद्ध-गुन्ह्यांसाठी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. रशियात पळून गेलेल्या असद बंधूंना ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीत सुनावण्यात आली असली, तर पिंजर्‍यात उभ्या असलेल्या आतिफ नजीबला सुनावलेली फाशी ही सीरियाच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची नांदी मानली जात आहे.

१९७० मध्ये लष्करी सत्तापालट करून सत्तेवर आलेले हाफिज अल-असद यांनी सीरियात ‘बाथ पार्टी’च्या आडून स्वतःच्या अलावी पंथाचे वर्चस्व प्रस्थापित केले. सुन्नीबहुल सीरियात केवळ १२ ते १५ टक्के लोकसंख्या असलेल्या अलावी समुदायाचा वापर करून त्यांनी लष्कर, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांवर कब्जा मिळवला. १९८२ मध्ये ‘हमा’ शहरातील आंदोलन दडपण्यासाठी हाफिज यांनी घडवून आणलेला नरसंहार हा आधुनिक इतिहासातील सर्वांत भीषण लष्करी अत्याचार मानला जातो, ज्यामध्ये तब्बल १० ते ४० हजार निष्पापांना जीव गमवावा लागला होता. १९९४ मध्ये बासिल अल-असद याच्या अपघाती मृत्यूनंतर, लंडनमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून काम करणार्‍या बशर अल-असद यांना राजकारणात आणले गेले. २००० मध्ये पित्याच्या निधनानंतर सत्ता हाती घेणार्‍या बशर यांनी सुरुवातीला काही सुधारणांचे गाजर दाखवले. परंतु, लवकरच त्यांचा खरा क्रूर चेहरा जगासमोर आला.

२०११ मध्ये ‘अरब स्प्रिंग’च्या लाटेत जेव्हा दक्षिण सीरियातील दारा प्रांतात चिमुकल्या मुलांनी आणि नागरिकांनी लोकशाही आणि स्वातंत्र्याची मागणी केली, तेव्हा तत्कालीन राजकीय सुरक्षाप्रमुख आतिफ नजीब आणि असद सरकारने त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. या दडपशाहीने सीरियाला १३ ते १४ वर्षे चाललेल्या भीषण गृहयुद्धात लोटले. बशर अल-असद यांनी स्वकीयांवरच केलेले अमानुष अत्याचार मानवतेला काळिमा फासणारे होते. जसे की, स्वतःच्याच नागरिकांवर, लहान मुलांवर आणि महिलांवर विषारी रासायनिक वायूचा वापर करून हजारो लोकांना गुदमरून मारले; रुग्णालये, शाळा आणि मानवी वस्त्यांवर बेछूट बॉम्ब फेकून शहरेच्या शहरे उद्ध्वस्त केली. ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स’नुसार, या संघर्षात पाच लाख नागरिक मरण पावले, तर एक कोटींहून अधिक लोक निर्वासित झाले. सत्ता टिकवण्यासाठी रशिया आणि इराणच्या आधाराने आपल्याच देशाची राखरांगोळी करणारा बशर अल-असद हा २१व्या शतकातील सर्वांत निर्दयी हुकूमशाह ठरला.

डिसेंबर २०२४ मध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर कब्जा मिळवताच, २४ वर्षे अढळ सत्तेचा उपभोग घेणारे बशर अल-असद आणि माहेर अल-असद भेकडासारखे रशियात पळून गेले. परंतु, भूतकाळातील पापे कधीही पाठ सोडत नाहीत. सीरियात स्थापन झालेल्या अहमद अल-शरा यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने या नरसंहाराची चौकशी सुरू केली आणि न्यायालयाने असद बंधूंसह आतिफ नजीब यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

न्यायालयाच्या पिंजर्‍यात उभा असलेला ब्रिगेडियर जनरल आतिफ नजीब याच्याविरोधात झालेली कारवाई हा एक धडा आहे. सैन्याच्या जोरावर स्वतःच्याच जनतेचे शोषण करणारे आणि लाखो निष्पापांचा बळी घेणारे कितीही शक्तिशाली असले, तरी त्यांना न्यायाच्या कोर्टात उभे राहावेच लागते. असद यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा ही केवळ एका व्यक्तीला दिलेली शिक्षा नसून, ती सीरियातील त्या पाच लाख मृत आत्म्यांना आणि बेघर झालेल्या कोट्यवधी लोकांना मिळालेला नैतिक न्याय आहे. इतिहासाच्या पानावरील असद कुटुंबाच्या क्रूर अध्यायावर अखेर पूर्णविराम लागला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बशर अल-असद यांच्यावर चालवला गेलेला खटला आणि सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हे केवळ एका राजवटीचे पतन नसून, जगातील प्रत्येक हुकूमशाही, अन्यायकारक आणि अत्याचारी सत्तेला दिलेली गंभीर ताकीद आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेला संघर्ष आपण पाहतोच आहोत. त्यामुळे पाक सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करावा आणि वेळीच धडा घ्यावा!




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर