केरळम्मध्ये ‘वन्दे मातरम्’ला कात्री लावण्याचा काँग्रेसचा डाव, तामिळनाडूतील ‘द्रविडी’ राजकारणातून सनातनी धर्माचा करण्यात आलेला अवमान आणि राष्ट्रगीताला डावलण्याची वृत्ती, हे राष्ट्रीयत्वावरील मोठे संकट आहे. त्यातच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाचा अवमान करत केरळम् काँग्रेसने त्यांची दिवाळखोरीच पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वन्दे मातरम्’ या एकाच मंत्राने, कोट्यवधी भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. हसतहसत फासावर जाणार्या अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या ओठांवरही, अखेरच्या श्वासापर्यंत हेच गीत होते. मात्र, दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात, याच सर्वोच्च राष्ट्रगीताला राजकीय तुष्टीकरणाच्या बळी पडावे लागले. आता केरळम्मध्ये पुन्हा एकदा असाच संतापजनक प्रकार घडला आहे. केंद्र सरकारने संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गायले जावे, अशी ठाम भूमिका घेतली असताना, केरळम्मधील काँग्रेसप्रणीत सरकारने त्याला विरोध करत, केवळ पहिली दोनच कडवी म्हणण्याचा निर्णय घेतला. मुळात ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणे, ही काही काँग्रेससाठी नवीन गोष्ट नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातही १९३७ मध्ये ‘मुस्लीम लीग’च्या दबावाखाली येऊन, काँग्रेसने या गीताचे तुकडे करण्याचे पातक केलेच होते. आज इतया दशकांनंतरही काँग्रेसची तुष्टीकरणाची तीच मानसिकता कायम आहे, हेच या ताज्या घटनेवरून सिद्ध होते. संपूर्ण गीत गायल्याने विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावतील या भीतिपोटी राष्ट्रीय अस्मितेशी थेट तडजोड करणे, हा त्या गीताचाच नव्हे; तर स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांचाही घोर अपमान आहे.
केरळम्च नव्हे, तर तामिळनाडूमध्येही प्रादेशिक अस्मिता आणि ‘द्रविडी’ राजकारणाच्या नावाखाली, राष्ट्रीय प्रतीकांना आणि बहुसंख्याकांच्या श्रद्धांना पायदळी तुडवण्याचाच प्रकार सुरू आहे. तामिळनाडूमध्ये सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत आणि ‘वन्दे मातरम्’ऐवजी, राज्यगीताला प्रथम प्राधान्य देण्याची भूमिका तिथल्या विजय सरकारने घेतली आहे. स्वतःच्या राज्याविषयी, भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी अभिमान बाळगणे यात काहीही गैर नाहीच; परंतु हा प्रादेशिक अभिमान राष्ट्रीय अभिमानाच्या वरचढ ठरू पाहतो, तेव्हा तो देशाच्या एकात्मतेसाठीचा मोठाच धोका ठरतो. वस्तुतः तामिळनाडूतील ‘द्रविडी’ राजकारणाचा मूळ पायाच, हिंदुद्वेष आणि ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ असा कृत्रिम भेद निर्माण करण्यावर आधारलेला आहे. याच ‘द्रविडी’ राजकारणाच्या मग्रुरीतून एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही काळापूर्वी, सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत, तो समूळ नष्ट करण्याची अत्यंत विषारी आणि अवमानकारक भाषा वापरली होती. स्वतःला बुद्धिवादी म्हणवणार्या या द्रविडी पक्षांच्या बुरख्याखालचा, हा सनातनद्वेष लपलेला नाही.
प्रादेशिक अस्मितांच्या आडून फुटीरतावादी मानसिकतेला खतपाणी घालण्याचे आणि हिंदू श्रद्धांची खिल्ली उडवण्याचे हे मोठेच षड्यंत्र आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या राष्ट्रगीताला डावलून, प्रादेशिक गीताचा दुराग्रह धरणे आणि बहुसंख्याकांच्या धर्माला शिव्या घालणे, हीच घटना भारताच्या संघराज्य व्यवस्थेला आणि संविधानाच्या मूळ आत्म्यालाच नख लावणारी.
राष्ट्रीय चिन्हे आणि प्रतीकांबद्दलच्या या द्वेषाइतकाच भयंकर आणि चीड आणणारा प्रकार, केरळम्मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीतही घडला आहे. केरळम्मधील एका शालेय प्रश्नमंजूषेत ब्रिटिशांकडून सर्वांत कठोर शिक्षा मिळालेले स्वातंत्र्यसैनिक कोण? असा एक अतिशय साधा, वस्तुनिष्ठ आणि ऐतिहासिक सत्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर हेच. दोन जन्मठेपांची, म्हणजे तब्बल पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगणारे, ते देशातील एकमेव क्रांतिकारक. मात्र, हे वास्तववादी उत्तर समोर येताच केरळम्मधील डाव्या आणि काँग्रेसच्या ‘इकोसिस्टम’ला मिरच्या झोंबल्या. सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक संबोधले गेल्याने, तिथे राजकीय वाद उभा करण्यात आला आणि केरळम्चे शिक्षणमंत्री एन. शमसुद्दीन यांनी या प्रकाराच्या चौकशीचेही आदेश दिले. ऐतिहासिक सत्य नाकारून आणि एका महान क्रांतिकारकाच्या त्यागाची विटंबना करून, ही मंडळी कोणता इतिहास शाळकरी मुलांना शिकवू पाहात आहेत?
सावरकरांबद्दलचा हा द्वेष अज्ञानातून आलेला नाही, तर तो एका विशिष्ट वैचारिक अंधत्वातून निर्माण झाला आहे. ब्रिटिशांच्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी कोलू ओढण्यापासून ते काथ्या कुटण्यापर्यंत जो अनन्वित छळ सोसला, त्याची तुलना या देशातील इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या तथाकथित त्यागाशी होऊ शकत नाही. तरीही, केवळ आपल्या राजकीय विचारधारेशी सावरकर सहमत नव्हते, म्हणून त्यांच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उभे करणे, हा तर कृतघ्नपणाचा कळसच ठरावा. केरळम् सरकारने या प्रश्नाची चौकशी करण्याचे आदेश देऊन ऐतिहासिक सत्याची गळचेपी करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो अत्यंत निंदनीयच. शालेय विद्यार्थ्यांसमोर जाणीवपूर्वक खोटा इतिहास मांडून, त्यांच्या कोवळ्या मनात राष्ट्रीय नायकांबद्दल विष कालवण्याचे हे अत्यंत सुनियोजित कटकारस्थान आहे, असे खेदाने नमूद करावे लागेल.
परिस्थितीचे बारकाईने अवलोकन केल्यास दक्षिण भारतात सुरू असलेले हे राजकारण, देशाच्या अखंडतेसाठी अत्यंत धोकादायक वळण घेत असल्याचेच स्पष्ट होते. केरळम्मधील काँग्रेसचे धार्मिक तुष्टीकरणाचे राजकारण असो, तामिळनाडूमधील सनातनी धर्माला शिव्या घालणारे आणि फुटीरतावादी ‘द्रविडी’ राजकारण असो वा सावरकरांसारख्या महापुरुषांचा अवमान असो; या सर्व घटना एकाच प्रकारात मोडतात. ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशांच्या नीतीचेच हे आधुनिक स्वरूप आहे. कधी भाषेच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, तर कधी प्रादेशिक अस्मितेच्या नावावर देशात फूट पाडण्याचे काम, ही मंडळी अत्यंत नियोजनबद्धरीत्या करत आहेत. राष्ट्रीयत्व हीच या देशाची सर्वांत मोठी ताकद आहे आणि ती कमकुवत केल्याशिवाय आपले राजकीय दुकान चालणार नाही, हे या पक्षांनी पक्के ओळखले आहे. म्हणूनच, ‘वन्दे मातरम्’, राष्ट्रगीत, सनातन धर्म आणि सावरकर यांसारख्या राष्ट्राला जोडणार्या प्रतीकांवर, जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत.
आजचा तरुण आणि सुजाण नागरिक या संकुचित राजकारणाच्या पलीकडे पाहू लागला आहे. भारताला आपण जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहात आहोत, तेव्हा अशा फुटीरतावादी आणि द्वेषपूर्ण राजकारणाला देशात कोणतेही स्थान असू नये. सांस्कृतिक विविधता ही आपली खरी ताकद असली, तरी ती राष्ट्रीय एकात्मतेच्या भक्कम पायावरच उभी राहू शकते, हे या प्रादेशिक पक्षांनी आणि तुष्टीकरण करणार्या काँग्रेसने आता तरी समजून घेतले पाहिजे. महापुरुषांचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा जाणीवपूर्वक अवमान करणार्या या विषवल्लीला मुळातून उपटून काढण्यासाठी, संपूर्ण समाजाने एकजुटीने उभे राहण्याची वेळ आता आली आहे. लोकशाहीच्या आणि मतदानाच्या मार्गाने या प्रवृत्तींना सडेतोड उत्तर देणे, हीच आता काळाची सर्वांत मोठी गरज आहे.