मुंबई : (Vadhavan Bandar Project) राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या सागरी नकाशावर महाराष्ट्राची ओळख ठळक करणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामांना राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत गती मिळत असतानाच डहाणू तालुक्यात आदिवासी समाजासह आजूबाजूच्या विविध गावांमध्ये प्रकल्पविरोधी आंदोलनांची धार कायम आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांमध्ये प्रकल्पाबाबत गैरसमज निर्माण केले जात असल्याची खंत प्रकल्प समर्थक मच्छीमार संघटना, स्थानिक गट आणि आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. स्थानिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी शक्य तेवढा थेट संवाद साधावा, अशी मागणीही त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली. (Vadhavan Bandar Project)
वाढवण बंदर प्रकल्पावरून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वरोरा आणि चिंचणी गावांच्या मध्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दै.‘मुंबई तरुण भारत’ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये स्थानिक आदिवासी आणि मच्छीमारांपर्यंत प्रकल्पाची पुरेशी माहिती पोहोचली नसल्याचे चित्र समोर आले. वाढवण बंदराआडून आता मोरबे बंदर रद्द करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. (Vadhavan Bandar Project)
प्रकल्पामुळे नेमका कोणता परिसर प्रभावित होणार, मासेमारीवर त्याचा किती परिणाम होईल, तसेच स्थानिकांना कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून आले. या माहितीच्या पोकळीचा फायदा घेत बाह्य घटकांकडून स्थानिकांमध्ये गैरसमज निर्माण केले जात असल्याचेही नमूद करण्यात आले. (Vadhavan Bandar Project)
संवादाच्या अभावामुळे गैरसमज वाढले
‘जनसुनावणी’ची औपचारिक प्रक्रिया न राहता स्थानिक नागरिक, मच्छीमार, आदिवासी प्रतिनिधी आणि शासन यांच्यात सातत्याने प्रत्यक्ष संवाद होणे आवश्यक आहे. प्रकल्पाची व्याप्ती, बांधकामाचा परिसर, मासेमारी क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम आणि पुनर्वसनाबाबतची माहिती स्थानिकांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. माहितीच्या अभावामुळे डाव्या संघटना आणि बाह्य घटकांकडून स्थानिकांची दिशाभूल केली जाते आहे. (Vadhavan Bandar Project)
रोजगाराच्या संधींबाबतही संभ्रम
वाढवण बंदरामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष स्थानिक युवकांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचा दावा करण्यात आला. बंदरासाठी डंपर, जेसीबी, फोर्कलिफ्ट, क्रेन, यंत्रसामग्री देखभाल यांसह विविध तांत्रिक कामांसाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बाधित गावांतील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारात प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास स्थानिकांमध्ये रोजगाराविषयी शाश्वती निर्माण होऊ शकते आणि त्यातून प्रकल्पाबाबतचा विरोधही कमी होऊ शकतो, असे प्रकल्प समर्थक गटांचे म्हणणे आहे. (Vadhavan Bandar Project)
विरोधकांचे म्हणणेही ऐकण्याची गरज
प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांचा नेमका आक्षेप कोणत्या मुद्द्यांवर आहे, हे शासनाने समजून घेणे आवश्यक आहे. जमीन, मासेमारी, रोजगार, पुनर्वसन किंवा पर्यावरण यापैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे विरोध होत आहे, याचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे. स्थानिक प्रतिनिधी आणि प्रकल्प प्रशासन यांच्यात नियमित बैठका घेऊन प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता आहे. स्थानिकांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्यात थेट चर्चा घडवून आणल्यास गैरसमज दूर करण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले. (Vadhavan Bandar Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.