‘रिकामे मन, सैतानाचे घर’ असे म्हणतात ते उगीच नव्हे. करण्यासाठी काही उद्योग नसला की, मनात वाटेल ते विचार येतात. राजकारणात कसलाही ठसा न उमटविलेल्या राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा, सध्या विधानसभेत एकही आमदार नाही. राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर त्यांनी नुकतीच केलेली टीका, त्यांच्या राजकीय वैफल्याचे द्योतक आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सध्या वेळच वेळ आहे आणि करण्यासाठीही काही काम नाही. त्यामुळे त्यांनी आपली एकतर्फी टीका सुरू ठेवली आहे. आपल्याकडे विरोधात असले की, एक बरे असते. सरकारवर कोणत्याही कारणासाठी टीका केलेली चालते. आपण केलेल्या टीकेत काही तथ्य आहे का, हे सिद्ध करण्याची कसलीच जबाबदारी विरोधकांवर नसते. त्यामुळे काहीही बेबंद टीका करणे, हे भारतातील विरोधी पक्षांचे लक्षण झाले आहे. राज ठाकरे हे त्याचे उत्तम उदाहरण.
राज ठाकरे नुकतेच रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर होते. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाला झालेल्या विलंबावर टीका केली. हा महामार्ग गेली १६-१७ वर्षे बांधला जात आहे; पण तो अजून पूर्ण झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा विलंब अक्षम्य आहे, हेही खरे. पण, यास फक्त केंद्र सरकार जबाबदार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार असल्यापासून, या महामार्गाचे नूतनीकरण सुरू आहे. ते सरकार १५ वर्षे सत्तेत होते. पण, त्या सरकारवर राज ठाकरे यांनी कधी टीका केली नव्हती. शिवाय, मधल्या काळात उद्धव ठाकरे हेही अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. तेव्हाही या महामार्गाच्या कामात काहीच प्रगती झाली नाही. त्याबद्दलही राज ठाकरे यांना काही म्हणावयाचे नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या महामार्गाच्या कामास वेग आला असून, बहुतांशी महामार्ग बांधला गेला आहे. आता फारच थोडे काम शिल्लक आहे. तरीही, राज ठाकरे यांनी त्यासाठी राज्य सरकारलाच जबाबदार धरले आहे.
राज ठाकरे यांची टीका इथपर्यंत ठीकच होती. पण, यापुढे जाऊन त्यांनी राज्यातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर जी बेछूट आणि बिनबुडाची टीका केली, त्यावरूनच त्यांच्या राजकीय समजशक्तीबद्दल मतदारांमध्ये असलेला-नसलेला सारा विश्वास संपुष्टात आला असेल. मुंबईतून जाणारी मेट्रो रेल्वे मराठी माणसाचा घात करील, या त्यांच्या टीकेचा काही आधार शोधू म्हटले, तरी शोधता येणार नाही. केवळ टीका करणे इतकाच त्यांचा उद्देश आहे, हे लक्षात येते.
राज्य सरकारने आता पनवेलजवळ तिसरी मुंबई वसविण्याची योजना हाती घेतली आहे. त्या प्रकल्पावरही राज ठाकरे यांनी टीका केली. या भागात आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आपली कार्यालये, म्हणजे विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये, तसेच रुग्णालये उभाणार आहेत. शिवाय, तेथे डाटा सेंटरही वसविली जातील. एकंदरीतच, नव्या शतकातील ही रोजगार क्षेत्रे आहेत. पण, राज ठाकरे यांनी या सगळ्याशी मराठी तरुणांचा काय संबंध? असा धक्कादायक प्रश्न उपस्थित केला. "या भागातील स्थानिक तरुणांना या नव्या युगातील रोजगारांची काय माहिती आहे?” असेही ते म्हणाले. आजच्या पिढीला रोजगाराची कोणती नवी क्षेत्रे खुणावीत आहेत, ते ठाऊक नाही, असेच राज ठाकरे यांना म्हणायचे आहे. यावरून त्यांचा नव्या पिढीच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास नसल्याचे दिसते. त्यांनी स्वत:वरून आजच्या तरुणांच्या समजशक्तीची परीक्षा करू नये. बेरोजगार मराठी तरुण हा केवळ वडापावचा ठेला चालविण्याच्या लायकीचा आहे, असेच ते सुचवीत आहेत.
ही टीका म्हणजे, राज ठाकरे यांच्या बौद्धिक क्षमतेचा घेर दाखविणारीच आहे. ‘स्थानिक विरुद्ध परकीय’ या आपल्या लाडया सिद्धान्ताला बळ देण्यासाठी, तिसरी मुंबई राज्याबाहेरील लोकांसाठी वसविली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील अनेक छोटे-मोठे व्यवसाय उत्तर भारतीयांच्या हाती गेले आहेत, हे खरेच आहे. पण, ते करण्यापासून राज्यातील बेरोजगार तरुणांना कोणी रोखले होते काय? कोकणात आंब्याच्या बागांची राखणदारी असो की, आंबे उतरवून ते पेट्यांमध्ये भरण्याचे काम असो, ही कामे करण्यापासून मराठी तरुणांना कोणी मनाई केली आहे काय? पण, मराठी तरुणांना ते बेरोजगार राहिले, तरी अशी कामे करण्याची लाज वाटते. राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी, अशा बेरोजगार तरुणांना काही कौशल्याची कामे करण्यासाठी प्रशिक्षण का सुरू केले नाही? या मराठी तरुणांनी ही कामे हाती घ्यावीत, यासाठी त्यांनी चळवळ का सुरू केली नाही? पण, ते करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि घाम गाळावा लागतो. ते करण्याची राज ठाकरे यांची तयारी नाही.
राजकारणात कसलाही ठसा उमटवू न शकलेले राज ठाकरे, हे राजकीय वैफल्यग्रस्ततेचे एक उदाहरण आहे. विधानसभेत त्यांना आपल्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणून दाखविता आलेला नाही. अगदी ते राहतात, त्या शिवाजी पार्क भागात त्यांचा मुलगा अमित निवडणूक लढवीत होता. पण, तेथेही तो पराभूत झाला. आता विरोधात असल्यामुळे आणि राज्यात येती तीन वर्षे कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे राज ठाकरे यांच्यापुढे (आणि अन्य विरोधी पक्षांपुढेही) हा वेळ कसा काढायचा, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या विषयावर काहीतरी मते व्यक्त करायची आणि जमेल तिथे राज्य किंवा केंद्र सरकारवर टीका करायची, इतकेच काम त्यांच्याकडे आहे. दिल्लीत जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात आंदोलन केले. मग काय, राज्यातील ठाकरे बंधूंना केंद्र सरकारवर टीका करण्याचे नवे निमित्त मिळाले. त्यांनीही काही हजार तरुणांना शिवाजी पार्क येथे गोळा करून आंदोलन केले. पण, या आंदोलनाचे नेतृत्व त्यांच्याकडे नव्हते. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अभिजित दीपके यांच्यात उद्धव ठाकरे यांना विष्णूच्या अवताराचा साक्षात्कार झाला. "यापुढे दीपके ठरवतील, तसे आपण आंदोलन करू,” असे वक्तव्य करण्याइतकी दुरवस्था, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर ओढवली. त्या वक्तव्याने आपल्या राजकारणाची दिवाळखोरीच त्यांनी उघड केली.
- राहुल बोरगांवकर