मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बळकटी; गारगाई प्रकल्पासाठी ‘आयेसा-चॉईस’ची सल्लागार म्हणून निवड

    11-Aug-2026

Gargai Project Mumbai
 
 
मुंबई (Gargai Project Mumbai): मुंबई शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचे सक्षमीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या ‘पाणी पुरवठा प्रकल्प’ विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील प्रस्तावित गारगाई नदीवरील ‘आरसीसी’ धरण, जलवहन बोगदा व अनुषंगिक कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. आयेसा इंडिया प्रा. लि. व मे. चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. या संयुक्त उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. या कंत्राटासाठी सादिलवारासह एकूण २४ कोटी १४ लाख ७९ हजार इतक्या खर्चाला प्रशासकीय व स्थायी समितीची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (Gargai Project Mumbai)
 
​डॉ. एम. ए. चितळे समितीच्या शिफारशीनुसार पालिकेने गारगाई प्रकल्प प्राधान्याने हाती घेतला आहे. वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर ६९ मीटर उंच व ९७९.४ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान १.६ किमी लांबीचा जलवहन बोगदा उभारला जाईल. या प्रकल्पाद्वारे मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. (Gargai Project Mumbai)
 
​भारतात आरसीसी तंत्रज्ञानावर आधारित मर्यादित धरणे असल्याने पालिकेने आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली पद्धतीद्वारे सल्लागार नियुक्तीसाठी ई-निविदा मागविल्या होत्या. यामध्ये प्राप्त झालेल्या तीन तांत्रिकदृष्ट्या पात्र निविदांपैकी ८०:२० (तांत्रिक व आर्थिक) गुणदान पद्धतीनुसार ‘मे. आयेसा-चॉईस’ संयुक्त उपक्रमाने सर्वाधिक ९४.४० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
​या संस्थेने कार्यालयीन अंदाजापेक्षा ५.६२ टक्के कमी म्हणजेच २२ कोटी ९९ लाख ८० हजार इतका देकार दिला होता. ५ टक्के सादिलवारासह एकूण २४.१४ कोटींच्या खर्चास मंजुरी मागण्यात आली आहे. या कामाचा कालावधी पावसाळ्यासह ४८ महिने (४ वर्षे) राहणार आहे.(Gargai Project Mumbai)
 
​सल्लागार संस्था बांधकामपूर्व टप्प्यापासून ते थेट बांधकाम पूर्ण होईपर्यंत (डीझाईन, गुणवत्ता नियंत्रण, बोगदा निर्मिती, पर्यावरण व एमआयएस देखभाल) पूर्णवेळ तांत्रिक पर्यवेक्षण करणार आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीबाहेर हा प्रकल्प होत असल्याने पालिका अधिनियम १८८८ च्या संबंधित कलमांनुसार स्थायी समिती व महापालिकेची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.(Gargai Project Mumbai)
 
 




संबंधित मजकूर