गुणी बाळ असा, जागसि का रे वाया?

    11-Aug-2026
Healthy Results Of Eating Midnight Snack
 
रात्र ही माणसाच्या आयुष्यातील शांततेची वेळ होती, ती आता संधीची झाली आहे. शहरांची चाके थांबत नाहीत, कार्यालयांचे दिवे विझत नाहीत आणि मनोरंजनाला दिवस-रात्रीचे बंधन उरलेले नाही. या बदललेल्या जगण्याने माणसाला अधिक वेळ दिला की त्याच्याकडून विश्रांतीचा वेळ हिरावून घेतला, हाच प्रश्न आहे. विशेषतः जेव्हा दिवसाचा शेवट जेवणाच्या ताटात होतो आणि रात्रीची सुरुवात त्यानंतर होते, तेव्हा ही केवळ सवय न राहता, ती शरीराच्या व्यवस्थेशी संबंधितच बाब ठरते. आधुनिक जीवनशैलीच्या या नव्या वेळापत्रकाचा आरोग्यावर नेमका परिणाम काय होतो, याचा आढावा घेणारा लेख...
 
पुर्वी दिवस मावळला की घरातील दिवे लागायचे आणि मनुष्य दिवसभराचा व्याप हळूहळू आवरता घ्यायचा. आता रात्र कधी संपते आणि दिवस कधी सुरू होतो, याचे भानच मनुष्याला असलेले दिसत नाही. त्यात मुंबईसारखी शहरे कधी झोपतच नाहीत. पूर्वी सूर्य मावळला की दिवसाचा पसारा आवरला जात असे, रात्रीचे जेवण उरकले जाई आणि शरीराला विश्रांती देण्याची तयारी सुरू होत असे. आज सूर्य मावळल्यानंतरच अनेकांचा दिवस खर्‍या अर्थाने सुरू होतो. काम, बैठका, पार्ट्या, स्क्रीन आणि मग मध्यरात्रीचे जेवण. काळ बदलला, त्याने मानवाची जीवनशैली आधुनिक झाली खरी; पण या काळाबरोबरच शरीराचे घड्याळ आधुनिक झालेले नाही.
 
वैद्यकीय विज्ञान यालाच ‘सर्केडियन रिदम’ म्हणते. झोप आणि जागरणापुरतेच हे जैविक घड्याळ मर्यादित नाही. पचनसंस्था, हार्मोन्स, रक्तातील साखरेचे नियंत्रण, चयापचय आणि आतड्यांतील सूक्ष्मजीव यांच्याही कामाची एक निश्चित वेळ असते. त्यामुळे अन्नाचे स्वरूप जितके महत्त्वाचे, तितकीच त्याची वेळही ठरते. रात्री उशिरा जेवताना शरीर विश्रांतीकडे जाते आणि पचनसंस्थेला मात्र कामाला लावले जाते. मात्र, अशा वेळी पोटभर जेवण करून लगेच झोपल्यास, पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शयता अधिक वाढते. आम्ल-पित्त, छातीत जळजळ, पोट फुगणे, अपचन यांसारख्या तक्रारी त्यामुळे वाढू शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासूनच आम्ल-पित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी उशिराचे जेवण अधिकच त्रासदायक ठरू शकते.
 
इथे प्रश्न केवळ पचनाचाच नाही; रात्री शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता दिवसाच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे पोटभर जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजचे नियमन तुलनेने कमी कार्यक्षम होऊ शकते. ही सवय दीर्घकाळ कायम राहिली, तर वजन वाढणे आणि इन्सुलिन प्रतिरोधासारख्या चयापचयविषयक समस्यांचा धोकाही वाढू शकतो. रात्रीचे खाणे अनेकदा तणावाशीही जोडलेले असते. दिवसभराच्या धावपळीनंतर काहीतरी खाल्ले की मन शांत होते, याच भावनेतून गोड, तळलेले किंवा अति खारट पदार्थ खाल्ले जातात. येथे वास्तविक भूक नसते; तर मेंदूला आरामाची गरज असते. ताण, अपुरी झोप आणि रात्रीचे खाणे असे एक दुष्टचक्रच यातून आकारास येते. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर आणि आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या संतुलनावर होऊ शकतो.
 
म्हणूनच रात्री उशिरा खाणे चुकीचे ठरते. तरीही प्रत्येकाची कामाची वेळ, झोपेची वेळ, आहार आणि आरोग्यस्थिती वेगळी असते; त्यानुसारही काही सवयी बदलतात. पण रोज उशिरा, पोटभर आणि झोपण्याच्या अगदी आधी खाणे, ही शरीराच्या जैविक लयीशी विसंगत सवय आहे, एवढे निश्चित. पूर्वी भारतीय जीवनपद्धतीत रात्री लवकर आणि तुलनेने हलके जेवण्याची पद्धत होती. त्यामागे अनुभवातून तयार झालेली शरीराच्या लयीची जाण होती. आज आपण ती लय सोडून दिली आहे. आता पुन्हा जुन्याकडे नव्याने बघण्याची गरज आहे. भारतीय परंपरेतील लवकर आणि तुलनेने हलके रात्रीचे जेवण हे त्यामुळे केवळ संस्कृतीचे प्रतीक म्हणून पाहण्यापेक्षा, त्यामागील व्यवहार्य आरोग्यविषयक शहाणपण म्हणूनही पाहता येते. काळानुसार यापुढेही जीवनशैली बदलतच राहणार; परंतु शरीराचे घड्याळ आपल्या सोयीने बदलतेच असे नाही, याचे भान बाळगण्याची वेळ आज आली आहे.




संबंधित मजकूर