मुंबई (kon honaar marathi crorepati 2026) : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरूवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony Live ने प्रेक्षकांचा लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची घोषणा केली असून या पर्वातून महाराष्ट्राची ‘लाडकी लेक’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या निमित्ताने या लोकप्रिय कार्यक्रमाला पहिल्यांदाच महिला सूत्रसंचालक मिळाली आहे.
महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर आता अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचलिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत 'कोण होणार करोडपती?'च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत.
या नव्या प्रवासाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाल्या, ‘कोण होणार करोडपती?' हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होण्याची संधी मला मिळते आहे याचा मला विशेष आनंद आहे.