आंदोलनाचा उद्रेक हा अनेकदा प्रशासनाच्या अपयशाचा अंतिम टप्पा असतो. वैफल्य-आक्रमकता सिद्धांत, प्रशासकीय गैरव्यवस्थापन आणि जनविश्वास यांचा परस्परसंबंध जाणून घ्या.
आंदोलने किंवा निदर्शने कधीच लोक रस्त्यावर उतरल्यावर सुरू होत नाहीत. फलक हातात येण्यापूर्वी, लोकांची जुळवाजुळव होण्यापूर्वी, डिजिटल हॅशटॅग सुरू होण्यापूर्वी किंवा ‘जंतरमंतर’सारख्या ठिकाणी घोषणांचा निनाद गुंजण्यापूर्वी, कित्येक महिने, किंबहुना कित्येक वर्षे एक शांत आणि अदृश्य प्रक्रिया घडतच असते. ही प्रक्रिया अभ्यासाच्या शांत खोल्यांमध्ये, रात्री उशिरापर्यंत चालणार्या कौटुंबिक चर्चांमध्ये आणि परीक्षेसाठी शिस्तबद्ध तयारीच्या शेकडो तासांमध्ये घडते. ‘नीट’सारख्या परीक्षांचे पेपर फुटणे, अचानक बदललेली धोरणे किंवा प्रशासकीय गैरव्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवरून, सार्वजनिक असंतोष उफाळतो, तेव्हा प्रशासकीय अधिकारी आणि नेते बहुधा याच परिस्थितीचा ‘कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या’ असा अंदाज लावतात.विरोधी पक्षनेते पोलिसांच्या ‘जंतरमंतर’ येथील युवा जमावाला हाताळण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेताना दिसतात.
सार्वजनिक असंतोषाला केवळ पोलीस बंदोबस्ताने हाताळायची समस्या मानणे, म्हणजे मानवी मानसशास्त्र न समजणेच होय. मूलतः, आधुनिक काळातील सार्वजनिक असंतोष हा एका प्रसिद्ध मानसशास्त्रीय नियमाने संचलित होतो, तो म्हणजे वैफल्य-आक्रमकता सिद्धांत (Frustration-Aggression Hypothesis)
ध्येयपूर्तीत येणार्या अडथळ्यांचे मानसशास्त्र
१९३९ मध्ये मानसशास्त्रज्ञ जॉन डोलार्ड आणि त्यांच्या सहकार्यांनी, मानवी वर्तनाचा एक मूलभूत सिद्धांत मांडला. आक्रमकता ही नेहमीच वैफल्यातून निर्माण होते. जेव्हा एखाद्या ध्येयाकडे जाणार्या मार्गात अडथळा येतो, तेव्हा वैफल्य निर्माण होते. काही दशकांनंतर मानसशास्त्रज्ञ लिओनार्ड बर्कोंवित्झ यांनी या सिद्धांतात सुधारणा करताना स्पष्ट केले की, ध्येयातील अडथळ्यांमुळे भावनिक ताण निर्माण होतो; पण या ताणाचे बाहेर पडणार्या सामूहिक आक्रोशात रूपांतर होण्यासाठी ‘नीट’सारख्या एका विशिष्ट ठिणगीची गरज असते. प्रशासकीय व्यवस्थेतील अपयशांना जसे की, वारंवार स्पर्धा-परीक्षांचे पेपर फुटण्यामध्ये जेव्हा हा सिद्धांत लागू होतो, तेव्हा त्यामागील मानसशास्त्रीय रचना उघडपणे स्पष्ट होते.
१.ध्येयप्रेरित वर्तन (Goal-Directed Behaviour): वर्षांची कठोर शिस्त, कुटुंबाचा त्याग, आर्थिक नुकसान आणि गुणवत्तेवर आधारित निकालाशी जोडलेली आत्मसन्मानाचीही वैयक्तिक ओळख यामागे असते.
२.व्यवस्थेचा अडथळा (Systemic Blockage): पेपर फुटणे, भ्रष्टाचार किंवा अनियंत्रित विलंबांसारख्या गुणवत्तानिरपेक्ष, अवाजवी घटनांमुळे ध्येयाचा मार्ग रोखला जातो.
३.साचलेली अस्तित्वाची हताशा (Accumulated Existential Frustration): केवळ क्षणिक रागच नाही, तर फुकट गेलेले अथक प्रयत्न, वाया गेलेला वेळ आणि धोयात आलेले आर्थिक भवितव्यामुळे घोर निराशा येते.
४.आक्रमक संकेत (Berkowitz's Cue Theory): एखाद्या जबाबदार अधिकार्याची असंवेदनशील टिप्पणी, तुच्छतादर्शक भाषा किंवा व्यवस्थेने केलेले ‘नन्नाचे पाढे’ हे साचलेल्या असंतोषासाठी ठिणगीचे काम करतात.
५.बाह्य सामूहिक एकजूट (Outward Collective Mobilization)): धगधगणार्या अंतर्गत असंतोषाचे रूपांतर, एका विशिष्ट ध्येयासाठी केलेल्या सार्वजनिक आंदोलनात होते.
परीक्षांचे पेपर फुटणे ‘अस्तित्वाची हताशा’ का निर्माण करतात? तर, एखाद्या प्रशासकासाठी पेपर फुटणे, ही केवळ एक तांत्रिक अडचण किंवा उपसमितीने हाताळायचा प्रशासकीय घोळ वाटूच शकतो. परंतु, तरुण परीक्षार्थींसाठी तो त्यांच्या अस्तित्वाचाच रोखलेला मार्ग असतो.
जेव्हा एखादा तरुण तीन वर्षांपर्यंत दररोज १२ तास अभ्यास करतो, तेव्हा त्याचे ते ध्येयप्रेरित वर्तन केवळ एक परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरते मर्यादित नसते; तो त्याचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्याचा, आत्मसन्मानाचा आणि कुटुंबाला सुरक्षितता देण्याचा एकमेव मार्ग असतो. जेव्हा हा मार्ग भ्रष्टाचार किंवा निष्काळजीपणामुळे रोखला जातो, तेव्हा अन्यायाची जाणीव होते - व्यक्ती आणि शासन यांच्याकडून, गुणवत्तेच्या आधारावर न्याय मिळण्याचा मार्ग दिसत नाही.
प्रयत्न अर्थहीन ठरतात - व्यक्तीला पूर्णपणे असाहाय्य वाटते; कारण कोणतीही कठोर मेहनत भ्रष्ट व्यवस्थेला हरवू शकत नाहीत, अशी मानसिकता निर्माण होते.
वेळ वाया जातो - व्यक्तीचा गुंतवलेला वेळ आणि वयोमर्यादेच्या संधी पुन्हा मिळवता येत नाहीत.यामुळेच एक अत्यंत असंतोषाचे मानसिक वातावरण तयार होते. ही हताशा क्षणिक नसते, ती रोज साचते आणि बाहेर पडण्यासाठीचा मार्गही शोधते.
चुकीच्या निदानाचा सापळा - लक्षण विरुद्ध कारण : संकट व्यवस्थापनात एखादा प्रशासक सर्वांत मोठी चूक कोणती करू शकतो, तर ती म्हणजे मूळ अडथळ्याकडे दुर्लक्ष करून केवळ लक्षणांना म्हणजे आंदोलनांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा हताश नागरिक उत्तरदायित्वाची मागणीसाठी एकत्र येतात, तेव्हा पारंपरिक प्रशासन बहुधा नेहमीच्या ताठर पद्धतींचा अवलंब करते :
आंदोलकांना पीडित घटक न मानता, विरोधी किंवा शत्रू म्हणून वागवणे.
कायदेशीर धमक्या, संचारबंदी, पोलिसांची मदत किंवा आंदोलनाची जागा बळाचा वापर करून रिकामी करणे.
गार्हाणी ऐकून घेण्यापूर्वी आंदोलकांनी शिस्त आणि सभ्यता पाळावी, अशी अट घालणे.
हा दृष्टिकोन अधिकच तीव्र असंतोषाचे एक धोकादायक दुष्टचक्र तयार करतो. जेव्हा अधिकारी अत्यंत हताश झालेल्या लोकांना सांगतात की, तुमची बोलण्याची पद्धत किंवा आंदोलनाचा मार्ग हीच खरी समस्या आहे, तेव्हा जनतेच्या मनातल्या सर्वांत मोठ्या भीतीवरच शिक्कामोर्तब होते. ती भीती म्हणजे या व्यवस्थेलाच मूळ अन्यायाशी काहीही देणेघेणे नाही!
‘प्रेशर कुकर’च्या वाफेला वाट करून द्या : ‘प्रेशर कुकर’ची समस्या, त्याचे झाकण अधिक घट्ट आवळून सुटत नसते. वाफ बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधणारच. संघटित चर्चेतून नाही मिळाली, तर स्फोटक सार्वजनिक असंतोषातून किंवा व्यवस्थेबद्दलच्या तीव्र अनास्थेतून ती बाहेर पडेल.
हताशा-आक्रमकता याचे दुष्टचक्र उलटे फिरवण्यासाठी, प्रभावी प्रशासकीय नेतृत्वाला भावनाविवशतेवर नियंत्रण आणि बुद्धिमत्ता वापरण्याची गरज असते.
अडथळा त्वरित मान्य करा - अपयश घडताच नेत्यांनी जनतेच्या हताशेला तत्काळ मान्यता दिली पाहिजे. आज व्यवस्था तुमच्या बाबतीत अपयशी ठरली असून, तुमचा राग पूर्णपणे रास्त आहे आणि हीच चूक सुधारण्याची जबाबदारी आमची आहे, असे स्पष्टपणे सांगितल्यास भावनिक दाब तत्काळ कमी होतो.
प्रत्यक्ष उपायांचे आश्वासन द्या - ध्येयाचा मार्ग पुन्हा एकदा न्याय्य पद्धतीने सुरू होतो. मग तो पारदर्शक फेरपरीक्षेतून असो, दोषींवर कडक कारवाई करून असो किंवा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करून असो. तेव्हाच जनविश्वास पुन्हा प्रस्थापित होतो.
आक्रमक ठिणग्या टाळा - उच्च अधिकार्यांनी आपली भाषा नेहमी सहानुभूतीपूर्वक आणि संयमित राहील, याचीच खबरदारी घेतली पाहिजे. सत्तेच्या पदावरून केलेले एक तुच्छतादर्शक विधान, साचलेल्या शांत असंतोषाचे रूपांतर सक्रिय आंदोलनात करू शकते.
प्रशासन हे शेवटी मानवी संबंधांवर आधारित असते. जेव्हा प्रशासक आंदोलनाच्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन त्यामागचा मानसिक अडथळा समजून घेतात, तेव्हा ते केवळ ‘असंतोष नियंत्रक’न राहता, ’जनविश्वास प्रस्थापित करणारे’ होतात.