झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी आता ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’; संस्थांना मिळणारे मासिक आर्थिक सहाय्य ६ हजारांवरून ११ हजार रुपये; वार्षिक खर्च १३६ कोटी रुपये
मुंबई : (Brihanmumbai Municipal Corporation) झोपडपट्टी परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी दरवर्षी १३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, स्वच्छता करणाऱ्या संस्थांना दरमहा ११ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. (Brihanmumbai Municipal Corporation)
मुंबईत २०१३ पासून ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ राबवले जात आहे. त्याच योजनेत बदल करून आता ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ राबवली जाणार आहे. नव्या योजनेत संस्थांकडून मुख्यतः घरोघरी कचरा संकलन आणि गल्ली स्वच्छतेची कामे करून घेतली जाणार आहेत. यासाठी सध्याच्या ६ हजार रुपयांऐवजी दरमहा ११ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे योजनेचा मासिक खर्च ६.२४ कोटी रुपयांवरून सुमारे ११.३४ कोटी रुपये, तर वार्षिक खर्च सुमारे ७५ कोटी रुपयांवरून १३६ कोटी रुपये होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी हा प्रस्ताव सभागृह नेते तथा गटनेते गणेश खणकर यांना दिला आहे. या प्रस्तावावर गटनेत्यांसमोर चर्चा करून मान्यता घेतली जाणार आहे.(Brihanmumbai Municipal Corporation)
गटारे आणि नाल्यांची सफाई ही तांत्रिक स्वरूपाची कामे असल्याने ती या योजनेतून स्वतंत्र करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि विशेष अवजारे स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सार्वजनिक शौचालयांचे संचालन, देखभाल आणि व्यवस्थापनही संबंधित सीबीओमार्फत स्वतंत्रपणे केले जाणार आहे. नागरिकांच्या ऐच्छिक सहभागाच्या रकमेतही वाढ करण्यात येणार आहे. सध्या रहिवाशांकडून २० रुपये आणि दुकानदारांकडून ५० रुपये ऐच्छिक योगदान घेतले जाते. नव्या योजनेत रहिवाशांकडून ५० रुपये, तर दुकानदारांकडून १०० रुपये ऐच्छिक योगदान घेण्याचे प्रस्तावित आहे.(Brihanmumbai Municipal Corporation)
अॅपच्या माध्यमातून नजर
‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजने’मार्फत होणाऱ्या स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अॅप विकसित करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून कामगारांची उपस्थिती, कामाचे ठिकाण आणि प्रत्यक्ष कामाची माहिती जीपीएस व जिओ-टॅगच्या माध्यमातून नोंदविली जाणार आहे. काम पूर्ण केल्यानंतर संबंधित ठिकाणचे छायाचित्रही अॅपवर अपलोड करावे लागणार आहे. कामात निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित संस्थेवर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तीनवेळा दंड झाल्यास संबंधित संस्थेला पुढील कामांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेला दरमहा २१ हजार रुपये अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.(Brihanmumbai Municipal Corporation)