माणसाच्या आरोग्याची दिशा आपण जगतो कसे, परिस्थितींना कसे सामोरे जातो आणि स्वतःच्या सवयींकडे किती सजगपणे पाहतो, यावर ठरते. आधुनिक जीवनशैलीने सुखसोयी वाढवल्या; मात्र त्याच वेळी निवड आणि त्यातून निर्माण होणारे धोकेही वाढले. ‘मला माहीत आहे, तरी मी असेच करणार’ या वृत्तीपासून ते विवेक हरवण्यापर्यंत, अनेक गोष्टी नकळत आपल्या स्वास्थ्यावर परिणाम करतात. म्हणूनच निरोगी आयुष्याचा विचार आज स्वतःच्या वर्तनाकडे पाहण्याच्या शहाणपणाशी जोडला जाणे आवश्यक आहे.
पण विविध धारणीय (CONTROLLABLE ) आवेगांबद्दल वाचत आहोत. मुख्यत्वे करून यात मानसिक धारणीय वेगांचा समावेश होता. पण काही वाचिक आणि शारीरिकदेखील धारणीय आवेग आहेत, हे आपण आधीच्या लेखांमधून वाचले. आयुर्वेदशास्त्र हे केवळ आजार बरा करण्यासाठी नाही. ते तर जीवनाचे शास्त्र-विज्ञान आहे. जीवन-आयुष्य हे सुखदायी, दीर्घ, रोगरहित आणि समाधानी कसे करावे, असावे याबद्दलचे मार्गदर्शक पुस्तक म्हणजे आयुर्वेद. Preventive Medicine’ हा आयुर्वेदाचा सर्वांत महत्त्वाचा भाग. यासाठी आहार-विहार सेवन-पालनाची नियमावली सांगितली आहे. व्यायाम-निद्रेबद्दलही महत्त्वाच्या सूचना त्यात आहेत. आणि या सर्व गोष्टींचा फायदा केवळ शारीरिक आरोग्यप्राप्ती हा नाही. आयुर्वेदाचे अंतिम ध्येयदेखील मोक्षप्राप्तीच आहे.
वेग धारण म्हणजे केवळ आवेगांना थांबविणे, रोखणे असा अर्थ होत नाही. पण, सोडून देणे, त्या आवेगाला शरीर-मन-बुद्धीत अगदी विचारांमध्येदेखील स्थान न देणे, हाच त्याचा अर्थ होतो. हे वेग काळानुरूप, परिस्थितीनुरूप भिन्न-भिन्न असतात आणि प्रत्येक व्यक्तीची त्या परिस्थितीला हाताळण्याची पद्धतही भिन्न असते. वेगधारणेतून आयुर्वेदाला संतुलित शारीरिक-मानसिक आरोग्य राखणे अपेक्षित आहे. वेग जरी उत्पन्न होणे हे स्वाभाविक आहे, मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्तीही आहे. तरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी की नाही, त्यानंतर कृती करावी की नाही इ. गोष्टींचा ऊहापोह मात्र होणे गरजेचे असते. बाल्यावस्थेत जेव्हा समज कमी असते, तेव्हा बालवय-बालमन अशी अवस्था असते. त्यामुळे विचार आणि आचरणाची प्रगल्भताही नसते. त्यामुळे लगेच कृती केली जाते. पण जसा माणूस वयाने मोठा होतो, त्याची मानसिक-वैचारिक वाढ होणेदेखील आवश्यक आहे. Basic Animal behavior सोडून Human Behavior होणे अपेक्षित आहे. ‘मला वाटले; मी केले,’ असे आयुष्यभर वागून चालत नाही. कृती आणि त्यातून मिळणारा प्रतिसाद-प्रतिक्रिया या दोन्हींचा विचार करूनच, त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे आहे. इतरांना त्रास होईल किंवा न होईल, हा तर विचार त्यामागे असावा. पण असे वागल्याने मला त्रास होतील की फायदा होईल? माझे सर्वांग स्वास्थ्य सुधारेल की त्यावर विपरीत परिणाम होईल, हे जाणूनच मग कृती करणे गरजेचे आहे. असे वागल्याने रोगांच्या प्रगटीकरणावर नियंत्रण आणणे जमते, यालाच आयुर्वेदात ‘रोगानुत्पादनीय = रोग उत्पन्न होऊनच न देणे’ अशी संज्ञा आहे.
संतुलित जीवनशैली ही व्याधी उत्पन्न होण्यापासून प्रतिबंध करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या आवेगांना नियंत्रित ठेवण्यासाठी, आपन्या ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपली पाच ज्ञानेंद्रिये, ही प्रत्येकाची जगाशी संपर्काची दारे-खिडया आहेत. आपल्या आसपास जे काही घडते, ते टिपून मनापर्यंत पोहोचविणे. हे त्यांचे कार्य. मन त्या मिळालेल्या ज्ञानावर चिंतन करते, ऊहापोह करते आणि मग क्रिया (प्रतिक्रिया स्वरूपात) घडते. वाईट, व्यक्तीला हानिकारक अशा पासून लांब ठेवायचे असल्यास, ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. उदा. घाण वास आला की आपण श्वास थोडा रोखतो, नाकावर रुमाल धरतो किंवा कर्णकर्कश आवाज असल्यास, घरातील दार-खिडया लावून घेतो, कान बंद करतो. म्हणजेच काय, ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्याचा संपर्क-तीव्रता कमी करण्याचा आपसूकच प्रयत्न केला जातो. पण काही संवेदना अशा असतात की, त्यांचा शरीराला-मनाला-स्वास्थ्याला त्रास होईल हे ज्ञात नसते. धारणीय आवेग याच प्रकारात येतात. ‘असे करू नका, याचा त्रास होईल,’ असे वडीलधार्यांनी किंवा आप्तजनांनी सांगितले की बरेचदा जी प्रतिक्रिया येते; ती म्हणजे, ‘त्यात काय होते?’ याच Attitude मुळे आपण आपलेच नुकसान करून घेतोय, हे लक्षातदेखील येत नाही. ज्ञानेद्रियांवर नियंत्रण मिळविणे तसे सोपे नाही. मधुमेह आहे, असे माहीत असूनही गोड-धोड खाणे, व्यायाम न करणे, अति चिंता करणे इ. व्याधीला पूरक हेतूंचे सेवन केले जातेच. आहार-विहारावर नियंत्रण मिळविणे हे मनाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. याला आयुर्वेदात ‘जितेन्द्रिय’ असा शब्द आहे. जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होतो, तोच ‘जितेन्द्रिय’.
इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे नक्की काय, तर रोग उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असलेल्या हेतूंचे-कारणांचे समजून-उमजून धारण करणे, थोपविणे, रोखणे. या हेतूंपैकी दोन महत्त्वाचे रोगकारक हेतू म्हणजे, प्रज्ञापराध आणि असाम्येन्द्रियार्थ संयोग. प्रज्ञापराध म्हणजे बुद्धीचा अपराध. यात धी-धृति-स्मृति विभ्रष्ट होते. म्हणजे Intellect, willpower d memory यांचा ताळमेळ सुटणे. धी-धृती-स्मृती यांची कार्यक्षमता आणि घडणारी कृती यांत संभ्रम निर्माण होणे. जे करू नये हे माहीत आहे, तरी ते करणे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत, लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच दैनंदिन जीवनात प्रज्ञापराध करतात. व्यसनाधीनता, अपथ्य करणे, विचारांची गफलत होणे ही त्याची निवडक उदाहरणे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, As You sow, so shall you Reap! म्हणजे, विभ्रम झाल्यामुळे जी कृती केली जाते, त्याचे परिणाम-दुष्परिणाम स्वास्थ्यावर होतात आणि चुकीच्या कर्मांची फळे भोगावीच लागतात. जसे धुळीने माखलेल्या काचेतून स्वच्छ दिसत नाही, तसेच अज्ञानरूपी धुळीने प्रज्ञेवर, सदसद्विवेकबुद्धीवर एक थर साचतो. याचा परिणाम अशुभ कर्म. अशुभ कर्म म्हणजे त्या कृती, ज्या चुकीच्या आहेत, वाईट आहेत आणि अपायकारक आहेत. असे वागल्याने, कृती केल्याने शरीरातील त्रिदोष (वात-पित्त-कफ) यातील समतोल बिघडतो. त्रिदोष हे स्वास्थ्याचे मूळ आहे. त्यांच्यात बिघाड झाला की, विविध स्वास्थ्याच्या तक्रारीही सुरू होतात. काही लगेच, काही कालांतराने.
असात्मेन्द्रियार्थ संयोग म्हणजे, इंद्रिय आणि इंद्रियविषयांमधील चुकीचा संयोग. हे चुकीचे संयोग तीन प्रकारचे आहेत. अतियोग, हीनयोग-अयोग किंवा मिथ्यायोग. अतियोग म्हणजे त्या त्या इंद्रियाचा अति वापर करणे, अति Screen Time, Head Phone इ.चा वापर. हीनयोग म्हणजे गरजेपेक्षा कमी वापरणे. जसे मलामूत्र वेगांचे धारण करणे-रोखणे. मिथ्यायोग म्हणजे, ज्या इंद्रियविषयांशी संपर्क आल्यास अपाय-अस्वास्थ्य उत्पन्न होऊ शकते. जसे कर्णकर्कश आवाज, मिणमिणते-प्रखर दिवे, धूम्रपान इ. हे तिन्ही संयोग बुद्धी-प्रज्ञेच्या अभावामुळे घडते. माझ्या सर्वकालिक भल्यासाठी काय आहे, स्वास्थ्यकर काय आहे, निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी काय, कसे वागावे, खावे इ.चा विचार न करता किंवा त्या विचारांना न जुमानता, स्वैर वागणे म्हणजेच असात्मेन्द्रियार्थ संयोग.
प्रज्ञापराध आणि असात्मेन्द्रियार्थ संयोग टाळण्यासाठी, जितेन्द्रिय राहण्यासाठी नित्य हिताहार सेवन, नित्य हित विहार, सेवन आणि समीक्षकारी वर्तन असणे महत्त्वाचे आहे. या सगळ्या उपायांबद्दल पुढील लेखात सविस्तर वाचूया.
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
वैद्य कीर्ती देव