आरोग्यसेवेचा संवेदनशील चेहरा

    11-Aug-2026   


Amit Ashok Pangam
 
 
आरोग्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करत, गरजू रुग्णांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या अमित अशोक पांगम यांच्याविषयी...
 
आर्थिक अडचणींमुळे उपचार पुढे ढकलणारे रुग्ण, योग्य मार्गदर्शनाअभावी दर्जेदार आरोग्यसेवेपासून वंचित राहणारी कुटुंबे आणि उपचारांसाठी सुरू असलेली धावपळ हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत गरजू रुग्णांना योग्य रुग्णालय, आवश्यक प्रक्रिया आणि उपचारांची संधी मिळवून देण्यासाठी, सातत्याने प्रयत्नरत असणार्‍यांमध्ये अमित अशोक पांगम यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या दृष्टीने आरोग्यसेवा हा केवळ व्यवसाय नसून, समाजाप्रतिची जबाबदारी आहे. त्यामुळे आज अनेक गरजू कुटुंबांसाठी ते विश्वासाचे नाव आहे.
 
त्यांचे व्यक्तिमत्त्व घरातील संस्कारांतूनच घडले. आई-वडिलांनी दिलेले प्रामाणिकपणा, शिस्त, माणुसकी आणि इतरांच्या अडचणीत मदतीचे संस्कार, तसेच शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची प्रेरणा यांतून त्यांच्या विचारांना दिशा लाभली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक आणि चिकित्सक दृष्टिकोनाचाही त्यांच्यावर विशेष प्रभाव. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा, हीच भावना त्यांनी जपली. भौतिकशास्त्र विषयातील ‘बीएस्सी’, व्यवस्थापन विषयातील ‘एमबीए’, कायद्याची ‘एलएलबी’ पदवी, तसेच संगणक प्रोग्रॅमिंग आणि हार्डवेअर विषयातील पदविका अशी त्यांची आजवरची शैक्षणिक वाटचाल. विज्ञान, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि कायदा या विविध क्षेत्रांतील ज्ञानामुळे, प्रश्नांकडे व्यापक आणि समतोल दृष्टीने पाहण्याची त्यांची क्षमता विकसित झाली.
 
त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात विमान वाहतूक क्षेत्रातील ‘कार्गो’ विभागातून झाली. त्यानंतर माहिती-तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि फूड-चेन उद्योगातही, विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. प्रत्येक टप्प्यावर नवे अनुभव मिळत गेले. मात्र, आरोग्य क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर, त्यांच्या कार्याला समाजसेवेची अधिक अर्थपूर्ण दिशा मिळाली.
 
सध्या ते ’सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल’ येथे ‘आऊटरीच’ विभागाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. या विभागाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, विविध संस्थांशी समन्वय साधणे, मोफत शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती उपक्रमांच्या नियोजनासारख्या विविध जबाबदार्‍या ते सांभाळतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक रुग्णाशी, कुटुंबाच्या अपेक्षा जोडलेल्या असतात. आजवर अनेक गरजू रुग्णांना हृदयविकार, अस्थिरोग, कर्करोग, नेत्रविकार, तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी त्यांनी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
 
त्यापैकीच एका अनुभवाचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. अहिल्यानगरच्या राहुरी या गावातील माझ्या परिचयातील एका शेतकरी महिलेला गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक होते. लाखो रुपयांचा खर्च परवडणारा नसल्याने, संपूर्ण कुटुंब हतबल होते. ही बाब समजल्यानंतर अमित यांनी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून, सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अत्यंत खर्चिक असलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. शस्त्रक्रियेनंतरही दर्जेदार उपचार, वैद्यकीय मार्गदर्शन आणि नियमित तपासणीमुळे, त्या महिला आज आत्मविश्वासाने आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. हा अनुभव केवळ एका रुग्णाच्या उपचाराचा नाही, तर एका कुटुंबाला पुन्हा उभे राहण्याचा आहे. ‘कोविड-१९’चा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण टप्पा होता. यात त्यांनी आपल्या वडिलांना गमावले. वैयक्तिक दुःख मोठे असतानाही त्यांनी, समाजाप्रतिची जबाबदारी त्यांनी तसूभरही कमी होऊ दिली नाही. आवश्यक वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करत, त्यांनी अनेकांना दिलासा दिला. संकटाच्या काळातही माणुसकी सोडायची नाही, हा जीवनविचार याकाळात अधिकच दृढ झाला. नुकतेच त्यांनी ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण केले असून, आरोग्यसेवेसोबतच कायदेविषयक मार्गदर्शनही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे.
 
भविष्यात आरोग्य, कायदा आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रातून, समाजसेवेचाा त्यांचा संकल्प आहे. विशेषतः अनाथालये, वृद्धाश्रम, गरीब रुग्ण, विद्यार्थी आणि वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा, तांत्रिक शिक्षण, संगणक कौशल्य आणि कायद्याचे प्राथमिक मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी, विविध उपक्रम राबविण्याचीही त्यांची योजना आहे. समाजासाठी उपयुक्त ठरेल असे ज्ञान आणि अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यावरही त्यांचा विशेष भर आहे.
 
आजकाल प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्त्व देणारी माणसे फार कमी आढळतात. अमित यांनी मात्र आपल्या शांत, संयमी आणि संवेदनशील कार्यातून, एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एखाद्या गरजू रुग्णाच्या चेहर्‍यावर उपचारानंतर उमटणारे समाधान हेच त्यांच्या कार्याचे खरे यश. समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची त्यांची धडपड आजही तितयाच निष्ठेने सुरू असून, यामुळेच त्यांची वाटचाल प्रेरणादायीच ठरते. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अमित पांगम
यांना त्यांच्या पुढील सामाजिक, व्यावसायिक आणि सेवाभावी वाटचालीसाठी
मनःपूर्वक शुभेच्छा.




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर