व्यापार हौतात्म्याचा...

    10-Aug-2026
 
Russia Black Widow Scam

जागतिक पटलावर ‘महासत्ता’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रशियातील ‘ब्लॅक विडो विवाह घोटाळ्या’मुळे, जगात खळबळ माजली आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियासाठी लढणार्‍या जवानांना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्याशी घाईघाईत विवाह केला जात आहे. यानंतर जवानांच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार दाखवून, सरकारकडून मिळणारी कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई लाटण्याचाच हा धक्कादायक प्रकार आहे. ५९ वर्षीय युरी या जवानाच्या मृत्यूच्या अवघ्या दोन दिवस आधी, त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान महिलेने त्यांच्याशी लग्न केले आणि त्यांची सारी संपत्ती लाटली.
 
दुसर्‍या घटनेत एका विशेष तपास अहवालानुसार, एका लष्करी रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिकेने, तिच्या देखरेखीखाली असलेल्या आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तब्बल पाच जखमी सैनिकांशी वेगवेगळ्या वेळी घाईघाईने लग्न केले. त्या सैनिकांच्या मृत्यूनंतर, तिनेही कोट्यवधी रुपयांची सरकारी भरपाई लाटली. यावरूनच या घोटाळ्याची व्याप्ती आणि क्रूरता स्पष्ट होते. एकामागून एक घडणार्‍या या घटनांनंतर, रशियात सैनिकांच्या मृत्यूचा हा काळा व्यापार उजेडात आला. काही प्रकरणांमध्ये तर लष्करी अधिकारी, डॉक्टर यांच्या संगनमतानेच लुटारूंनी टोळ्या बनवल्याचे उघड झाले आहे. यावरून या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर पसरली आहेत, हे लक्षात येते.
 
जागतिक महासत्ता म्हणून मिरवत, अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावणारा देश ही रशियाची विशेष ओळख. द्वयींमधले सुप्त व्यापार युद्धही फार काळ लपलेले नाही. भौगोलिक अथांगतेसोबत सामरिक ताकद, परमाणू सज्जता, आधुनिक लष्करी तंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधने, ऊर्जा महासत्ता या गोष्टी रशियाचे शक्तीवर्धनच करणारे ठरतात.
 
‘फेडरल स्टेट स्टॅटिस्टिस सर्व्हिस’च्या ताज्या आकडेवारीनुसार, रशियातील सर्वसामान्यांचे सरासरी मासिक उत्पन्न सुमारे १ लाख, १० हजार रशियन रुबल (अंदाजे १ लाख, १० हजार ते १ लाख, १२ हजार भारतीय रुपये) आहे. मात्र तरीही, काही डॉक्टर, लष्करी अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित लोकांचे हात या घोटाळ्यांनी बरबटलेलेच आहेत. यावर रशियातील जनमानसांतून संतापाची लाट उसळली असून, ‘ब्लॅक विडो’ घोटाळ्याबाबत रशियन नागरिकांमध्ये तीव्र संताप, भीती आणि सामूहिक अस्वस्थतेचे वातावरण आहे. देशासाठी प्राण पणाला लावणार्‍या सैनिकांच्या रक्तावर आणि बलिदानावर, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला डल्ला मारत असल्याचे उघड झाल्याने, रशियन समाज प्रचंड संतप्त झाला आहे. अशा घटनांना तातडीने लगाम लागण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. रशियन नागरिक या घोटाळ्याकडे केवळ एक आर्थिक गुन्हा म्हणून पाहात नाहीत, तर तो देशाशी आणि युद्धभूमीवर लढणार्‍या सैनिकांशी केलेला विश्वासघातच मानला जात आहे.
 
याबाबत, कायद्यात बदल करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. रशियन जनतेने आणि काही प्रमुख खासदारांनी सरकारकडे मागणी केली आहे की, विवाहाच्या नियमांमध्ये तत्काळ बदल करून कडक पडताळणी सुरू करण्यात यावी. जेणेकरून या लुटारू महिलांपासून, सैनिकांच्या कुटुंबांचे रक्षण करता येईल. रशियन संसदेतही असा कायदा आणण्याचा विचार सुरू असून, यानुसार लग्न होऊन किमान एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पत्नीला कोणतीही मृत्यूनंतरची भरपाई मिळणार नाही. मात्र, यातून सरकारसमोरही पेच आहेच. या नव्या कायद्यामुळे लुटारू महिला, टोळ्या यांना चाप बसेलच, पण ज्यांचे खरे प्रेम आहे आणि युद्धात पती गमावलेल्या खर्‍याखुर्‍या लाखो विधवा आहेत; त्यांच्या हक्काच्या पैशांनाही खीळ बसेल.
 
ते काहीही असो; पण ‘ब्लॅक विडो घोटाळा’ हा मानवी लोभाचे आणि नैतिक अधःपतनाचेच भयानक रूप आहे. याला वेळीच ठेचायलाच हवे. देशासाठी प्राण पणाला लावणार्‍या सैनिकांच्या बलिदानाचा होत असलेला असा क्रूर वापर रोखलाच गेला पाहिजे. सीमेवर देशासाठी लढणार्‍या जवानाच्या रक्ताची किंमत ज्याला कळली नाही, तर तो कसला देशभक्त? त्यामुळेच, हा घोटाळा रोखण्यासाठी केवळ गुन्हेगार महिलांनाच पकडणे पुरेसे नाही; यासाठी रशियन सरकारने लवकरच लष्कर भरती, विवाह नोंदणी नियमांमध्ये अत्यंत कडक आणि पारदर्शक बदल करणे गरजेचे झाले आहे.
 
- रोहित गुरव




संबंधित मजकूर