काँक्रीटच्या जंगलातील घरटे

    10-Aug-2026

Lapwing Nest in Urban India

शहरी वातावरणात पक्ष्यांमध्ये त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये होणारे बदल टिपण्यासारखे आहेत. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
 
२०२६ मधल्या तापमानाचा जागतिक उच्चांक गाठलेल्या विदर्भातील, वर्धा जिल्ह्यातील उन्हाळा म्हणजे निसर्गाची कठोर परीक्षा. वर्धा शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. वाढत्या उष्णतेमुळे रस्ते शांत आणि निर्मनुष्य झाले होते. घरामधल्या सावलीचा आडोसा घेत, माणसे तेवढी घरात होती. अशा मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात एका इमारतीच्या गच्चीवर एका टिटवीची एक वेगळीच जीवनकहाणी घडत होती. बोरगाव येथील एका इमारतीच्या गच्चीवर दोन टिटव्या वारंवार दिसू लागल्या. इकडून तिकडे फिरत, खाली उतरून पुन्हा उडत, अशा हालचाली चालू होत्या. त्यांच्या लक्षवेधी आवाजामुळे त्यांची उपस्थिती लगेच जाणवायची. एका इमारतीवरून बाजूच्या इमारतीवर टिटव्यांची जा-ये सुरू होती. जणू, लगतच्या किंवा कुठल्या एका इमारतीत एक सुरक्षित जागेचा त्यांचा शोध चालू होता. नेहमीपेक्षा त्यांच्या हालचालींमधला बदल दिसून येण्यासारखा होता. नर आणि मादी टिटवी आळीपाळीने गच्चीच्या एका बाजूला येरझार्‍या घालत होते. त्या जागेभोवती फिरणे, बसणे आणि आजूबाजूचे निरीक्षण करणे, असे एक-दोन दिवस चालले. दुसर्‍या दिवशी लगतच्या इमारतीवर छोटी दगडाची रचना दिसायला लागली. सुरक्षित जागेचा शोध हा घरटे बांधण्यासाठी होता. सहसा टिटवीसारखे पाणपक्षी, जे जमिनीवर घरटी बांधतात, ते सुरक्षित जागेची निवड करूनच घरटी बांधतात. परंतु, पाणपक्ष्यांमध्ये जमीन, नदीकाठ, तळे, असा अधिवास सोडून मानवी वस्तीत सिमेंट काँक्रीटच्या सपाटीवर घरटे बनवावे, हे आश्चर्याचे होते. शहरी भाग आणि काँक्रीटच्या इमारतींमध्ये घरटी बांधणे म्हणजे, पक्ष्यांना नव्या संकटांना सामोरे जावे लागते. जसे की, मानवांचा हस्तक्षेप, नवीन शिकारी पक्षी, वातावरणीय बदल आणि वाढत्या तापमानासमोर जाणे!
 
गच्चीवरील टिटवीने एका आठवड्याच्या आतच जमा केलेल्या गोट्यांना घरट्याचे रूप दिले. गोलाकार आकारात सिमेंटच्या छोट्या गोट्यांची रचना तयार झाली. सामान्यतः टिटवी शेतातील मोकळ्या जमिनीवर, नदीकाठच्या वाळूत किंवा गवताळ प्रदेशात घरटे बांधते. घरटे बांधताना मधे खोलगट भाग करून त्यावर माती, रेती आणि दगड, गोलाकार पद्धतीने पसरवून ठेवते. इमारतीमध्ये नेहमीप्रमाणे असणारे घरटे नव्हते. पण, लहान गोटे, काँक्रीटचे तुकडे आणि आजूबाजूचे बारीक दगड, हे सर्व सिमेंटच्या सपाट आणि समतल भागावर गोलाकार आकारामध्ये लावलेले होते. जवळजवळ घरट्यासारखी रचना दिसून येत होती. नैसर्गिक अधिवास सोडून शहरामध्ये इमारतींवर घरटे बांधणे, हे टिटवीसाठी फायद्याचे ठरले. जमिनीवर असलेल्या शिकारी प्राण्यांपासून टिटव्यांचा बचाव होत होता. परंतु, सिमेंटचा भूभाग वाढत्या तापमानासोबत तापत होता. घरटी बनवायला इमारतीमधील उपलब्ध साधनांचा वापर केला. घरटी बनवायला गच्चीवर असणारे लहान दगड, खडी, सिमेंटचे तुकडे आणि काँक्रीटचे तुकडे जमवून साधा, पण घरट्यासारखा भाग तयार करून त्यामध्ये टिटवीने तीन अंडी दिली. मे महिन्याच्या कडक उन्हात टिटवी नर आणि मादी, आळीपाळीने अंड्यावर बसलेले दिसत होते. पंख पसरून सावली तयार करून टिटवी अंड्यांना ऊब देत होती. सोबतच ती स्वतःची चोच उघडी ठेवून उष्णतेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करत होती.
 
वातावरणीय बदलाचा आणि तापमानाचा अंड्यांच्या उबवण्याचा कालावधीत बदल झालेला आढळून आला. तिन्ही अंड्यांमधून पिल्ले एक आणि दोन दिवसाआड बाहेर आली. दिलेल्या तिन्ही अंड्यांतून तीन पिल्ले जिवंत बाहेर येण्यास सक्षम होती. पण, खरी परीक्षा बाहेर पडल्यानंतर सुरू झाली. दुसर्‍या दिवशी एक पिल्लू काँक्रीटच्या सपाट भागावर उच्च तापमानाने निस्तेज होऊन पडून होते. कुठलीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे तीनमधून आता फक्त दोन पिल्लांचा प्रवास पुढे जाणार होता. राखाडी रंगाची, पांढर्‍या उणी केसासारखी कोवळी पिले, गच्चीवर वावरत होती. शरीराचा रंग आणि शरीरावरील पांढरे-काळे-करडे ठिपके, हे आजूबाजूच्या काँक्रीटच्या तुकड्यांशी एवढे मिसळून जात होते की त्यांना शोधणे कठीण जात होते. हेच वातावरणाशी असलेले साम्य, त्यांचे शहरी शिकारी पक्ष्यांपासून संरक्षण करीत होते. दोन्ही पिले पालकांभोवती फिरत होती. संपूर्ण गच्चीवर फिरताना गच्चीच्या टोकाच्या काठावरही ती आढळून आली. याच प्रयत्नात, दोघांमधील एक पिलू तोल जाऊन गच्चीच्या खाली पडले. अपरिपक्व पंख आणि पिसार्‍याचा अभाव असल्याने ते खाली पडले.
 
शहरी वातावरणात पक्ष्यांमध्ये त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये होणारे बदल टिपण्यासारखे आहेत. घरट्यांसाठी लागणार्‍या साधनांची निवड, मानवनिर्मित साहित्याचा वापर, नवी संकटे, वाढते तापमान आणि वातावरणीय बदल, अशा बदलत्या अधिवासात टिटवी स्वतःला अनुकूल करीत आहे. शहरी भागातील जैवविविधतेमध्येही मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, किंबहुना त्यात वाढच होत आहे. त्यामुळे, भविष्यात अशा पक्ष्यांची, अशा घटनांची नोंद ठेवणे आणि निरीक्षणे करणे आवश्यक आहे.

डॉ. चेतना मिठे (उगले)
(लेखिका पक्षीअभ्यासक असून कळंबच्या इंदिरा महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)




संबंधित मजकूर