नाशिक : (Nashik Pune Rail Project) नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या निर्णयाविरोधातील असंतोष अखेर रविवारी, ९ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरला. क्रांतिदिनाचे औचित्य साधत नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सिन्नरच्या गोंदे फाटा परिसरात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी नाशिक–पुणे महामार्गासह समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखली. पोलिसांनी तांबे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
सिन्नरपुरते आंदोलन मर्यादित न राहता संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण परिसरातही आंदोलनाची तीव्रता जाणवली. या लढ्याला विविध राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधी, रेल्वे कृती समित्या, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचा सहभाग मिळाला. बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी मूळ मार्ग कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे. (Nashik Pune Rail Project)
GMRTचा पेच आणि सरकारची नवी चाल
नारायणगावजवळील खोडद येथील GMRT रेडिओ दुर्बिणीच्या संवेदनशीलतेमुळे मूळ रेल्वे अलाइनमेंटवर तांत्रिक आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर–शिर्डीमार्गे सुधारित अलाइनमेंटचा पर्याय पुढे केला. मात्र, मूळ मार्गावर अभियांत्रिकी उपाययोजना करून रेल्वे नेणे शक्य आहे का, याचा फेरविचार करण्याची मागणी सुरू राहिली. (Nashik Pune Rail Project)
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने माजी अणुऊर्जा आयोग अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समितीत रेल्वे बोर्डाचे पायाभूत सुविधा सदस्य विवेक गुप्ता तसेच पुणे व नाशिक विभागीय आयुक्तांचा समावेश आहे. मूळ आणि सुधारित दोन्ही मार्गांचा तांत्रिक, आर्थिक, प्रवासकालीन, भूसंपादन आणि सामाजिक-आर्थिक परिणाम तपासून ६० दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश आहेत. (Nashik Pune Rail Project)
“वळसा नको, थेट जोडणी हवी”
आंदोलनकर्त्यांचा आग्रह केवळ रेल्वे मार्गाचा नसून नाशिक–सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–मंचर–चाकण या औद्योगिक पट्ट्याला थेट रेल्वे जोडणी देण्याचा आहे. त्यांच्या मते, या मार्गामुळे उद्योग, रोजगार, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतीमाल वाहतुकीला मोठी चालना मिळू शकते. (Nashik Pune Rail Project)