हत्याकांडाच्या आगीत 'संशयाचे धूर'! विक्रोळी दुहेरी हत्याकांडात नवा ट्विस्ट

पुरावे नष्ट करण्याचा कट की अपघात? पोलीस तपासाची चक्रे फिरली

    10-Aug-2026
 
Vikroli Murder Case
 
मुंबई: (VikhroliMurder) विक्रोळी पश्चिम येथील राहूल नगर परिसरात मोठ्या आवाजात गाणी वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या बाप-लेकाच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण मुंबई हादरली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकून घटनास्थळ व आरोपींचे घर सील केले होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास या सील केलेल्या घरात भीषण आग लागून मोठा स्फोट झाला. हा स्फोट गॅस सिलेंडरचा असण्याची शक्यता वर्तवली जात असून, या दुहेरी हत्याकांडात आता 'संशयाचे धूर' निघू लागले आहेत.
 
नेमकी काय घडली होती घटना ?
 
पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहूल नगर भागात गाणी वाजवण्यावरून झालेल्या वादातून आरोपींनी विश्वकर्मा कुटुंबावर चाकूने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (४०) आणि त्यांचा १४ वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुनील यांची पत्नी अंजू आणि लहान मुलगा विवान हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोन आरोपींना अटक केली आहे. (VikhroliMurder)
 
सील केलेल्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट ?
 
हत्याकांड घडल्यानंतर फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा करून आरोपींचे घर रीतसर सील केले होते. परंतु, आज पहाटेच्या सुमारास बंद घरातून अचानक मोठा आवाज झाला आणि भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (VikhroliMurder)
 
परंतु, सील केलेल्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत: 
 
जाणीवपूर्वक सिलेंडर लीक केला गेला का ? हत्ये प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे, रक्ताने माखलेले कपडे किंवा हत्यार नष्ट करण्यासाठी कोणी जाणीवपूर्वक गॅस लीक करून आग लावली का? (VikhroliMurder)
 
आगीमागे कोणाचा हात ? आरोपींच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी हा बनाव रचला आहे का? (VikhroliMurder)
 
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
 
स्फोटाचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना व अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सील केलेल्या घरात बाहेरून कोणी आग लावली, गॅस लीक केला की शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला, याचा शोध आता फॉरेन्सिक टीम आणि पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, या आगीमागील 'संशयाचे धूर' शमवण्याचे मोठे आव्हान आता पार्कसाईट पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. (VikhroliMurder)
 
 




संबंधित मजकूर