गौरीचा गुरुमंत्र

    10-Aug-2026   

Gauri Karakare 

शिक्षण व्यवस्थेतील आव्हांनावर प्रत्यक्ष कृती करण्याच्या उद्देशाने ‘गुरुकुल’ नामक रोपटे लावत, त्याचा कल्पवृक्ष करणार्‍या गौरी करकरे यांच्याविषयी...
 
शिक्षणाचा उद्देश फक्त परीक्षा देणे इतकाच नसून जगण्याचे कौशल्य शिकवणे, देखील आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये याविषयी मंथनाची फार आवश्यकता आहे. हीच गरज ओळखून, डोंबिवलीतील गौरी करकरे यांनी ‘गुरुकुल द डे स्कूल’ची सुरूवात केली. गौरी यांचा जन्म मिरज इथला. गौरी यांचे वडील मधुकर जोशी हे गायक आणि उत्तम व्हायोलिन वादक. गौरी यांचा जन्म अशा घरात झाल्या, ज्याला पाच पिढ्यांचा गायकीचा वारसा लाभला आहे. गौरी यांची आई सुनंद ‘एमआयडीसी’त कामाला होत्या. त्यांनी अध्यात्मावरही प्रभुत्व मिळविले आहे. गौरी यांना एक भाऊ. त्यांच्या कुटुंबातर्फे भरवला जाणारा ‘औंध संगीत महोत्सव’ हा सर्वासाठीच चर्चेचा विषय.
 
गौरी यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद स्कूल, गोपाळनगर येथे झाले. तर, महाविद्यालयीन शिक्षण पेंढरकर महाविद्यायात. त्यांनी ‘अर्थशास्त्र’ विषयात ‘बीए’ ही पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून ‘इंग्रजी’ या विषयात ‘एमए’देखील केले. गौरी यांनी १९८६ मध्ये, अजित करकरे यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी अजित हे खासगी शिकवण्या घेत असत. गौरी यांचे ‘एमए’चे शिक्षणही १९८८ साली पूर्ण झाले. याचकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासही सुरुवात केली. त्यामुळे कधी नोकरी करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. तसेच, डोंबिवलीत त्यांचे ‘फाईन आर्ट कॉलेज’ही होतेच. त्यामुळे एकीकडे शिकवणीवर्ग आणि दुसरीकडे ‘आर्ट कॉलेज’ असा प्रवास सुरू होता.
 
याचवेळी शिक्षण व्यवस्थेतील अनल गोष्टी मनाला पटत नसल्याने, त्यांनी वेगळे शिक्षण देणारी शाळा काढण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच त्यांनी जागा शोधण्यास सुरुवात केली. आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करून ती जागाही त्यांनी घेतली. त्यांच्याकडच्या पैशांतून, डोंबिवली स्थानकापासून दूरवरच त्यांना जागा मिळाली आणि सन २०००मध्ये शाळा उभी देखील राहिली. ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. ती दप्तराविना भरते. विद्यार्थ्यांची परीक्षा ‘सरप्राईझ’ होते. फक्त शालेय अभ्यासक्रम भविष्यात उपयोगी नाही, त्यासाठी इतर कलागुणांच्या विकासावरही त्यांनी भर दिला. त्यामुळे ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी ठरली.
 
ही शाळा ‘आयजीसीएसई’ बोर्डाची शाळा असून, स्थानकापासून दूर असल्याने अनेक पालक विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश घेऊन देण्यास रस दाखवत नव्हते. तरी पहिल्या वर्षी २२ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. ही शाळा सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत भरते.
 
गौरी आणि त्यांचे पती अजित यांनी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. सुरुवातीची दहा ते बारा वर्षे त्यांना नफा तर सोडाच, पण उदरनिर्वाहाचाही प्रश्न होता. पण ‘फाईन आर्ट कॉलेज’ने ती वेळ निभावून नेली. मात्र हळूहळू परिस्थिती बदलली. दर्जेदार शिक्षण कायम ठेवल्याने, डोंबिवलीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत येत आहेत. शाळा सुरू करताच, करकरे दाम्पत्याने शिकवणी वर्ग बंद केले. सध्या या शाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे शाळेत विशेष लक्ष दिले जाते. त्याचबरोबर मागील २५ वर्षांत विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, गायन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतदेखील कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. एकांकिका स्पर्धेतही विद्यार्थी सहभागी होतात. या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी लावू नये, म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शाळाच घेते. तसेच शाळेतील विद्यार्थी, पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे साठवतात. शाळेतर्फे एका सामाजिक संस्थेला भेटही दिली जाते. त्या संस्थेला विद्यार्थी ते पैसे दान देतात यातून विद्यार्थ्यांमध्ये दातृत्व गुणही वाढीस लागतो.
 
या शाळेच्या माध्यमातून मागील ४४ वर्षांपासून, सांस्कृतिक महोत्सवाचेही आयोजन होते. यामध्ये काही संस्थाचाही हातभार लागतो. त्यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सव भरतो. यंदाच्या वर्षी ‘गुरुकुल द डे स्कूल’सोबतच ‘लक्ष्मी नारायण संस्था’, ‘स्वर्गीय सुधीर फडके स्मृती समिती’, लायन्स लब, डोंबिवली जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव, डोंबिवली जिमखान्यात सुरू आहे.या स्पर्धेत ३५ शाळा सहभागी झाल्या आहेत. एकाचवेळी चार ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन होते. त्यामध्ये मोनो अ‍ॅक्टिंग, संगीत, फोक संगीत, तबला, शास्त्रीय नृत्य अशा विविध प्रकारचा समावेश आहे. शाळेतर्फे ‘मेगा प्रोजेट’ ही संकल्पनाही राबविली जाते. यात विद्यार्थी एखाद्या कलेवर, कलाकारावर, संगीत, विज्ञान, तंत्रज्ञान अशा कोणत्याही विषयांवर प्रकल्प सादर करतात.
 
ही शाळा वाचनावर अधिक भर देते. प्रवेशाच्या वेळीच पालकांना तशी कल्पना दिली जाते. गौरी यांचा मुलगा परदेशी शिक्षण घेऊन, पुन्हा भारतात येऊन शाळेची जबाबदारी सात वर्षांपासून सांभाळत आहे. ‘भविष्यवेधी शिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा’ म्हणूनच गौरी यांची ‘गुरुकुल द डे स्कूल’ नावारूपाला आली आहे. गौरी यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.




संबंधित मजकूर