वेध राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचा...

    10-Aug-2026
 
Commonwealth Games 2026
 
अलीकडेच राष्ट्रकुल स्प्रर्धा संपन्न झाल्या. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चौथे स्थान पटकावले. सुरुवातीपासूनच ही स्पर्धा विविध कारणांनी चर्चेत राहिली होती, आता या स्पर्धेचा शतकमहोत्सव भारतात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या स्पर्धेतील भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीचा आढावा घेणारा लेख...
 
कोणी यजमानपद स्वीकारायचे, अर्थकारण सांभाळत त्यात कोणत्या क्रीडाप्रकारांना सहभागी करून घ्यावयाचे, असा सर्वंकष विचार करून ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६’ दि. २३ जुलै ते दि. २ ऑगस्ट रोजीदरम्यान, स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे शांतपणे पार पडली. त्याच्या सांगता समारंभात भारताकडे अधिकृतपणे राष्ट्रकुलची मशाल (बॅटन) ‘कूलली’ सुपूर्द करण्यात आली असून, २०३० मधील शतकमहोत्सवी राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे होणार आहे.
 
भारत चौथ्या स्थानावर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय पथकाने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकत, पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. स्कॉटलंड आणि भारत या दोन्ही देशांनी जरी प्रत्येकी १३ सुवर्णपदके जिंकली असली, तरी रौप्यपदकांच्या संख्येच्या जोरावर भारताने स्कॉटलंडला मागे टाकले. भारताने १७ रौप्यपदके जिंकली, जी स्कॉटलंडपेक्षा नऊने अधिक होती. त्यामुळे भारताने या स्पर्धेतील त्याचे चौथे स्थान निश्चित केले.
 
भारताची कामगिरी...
 
भारताने बॉसिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर तब्बल दहा पदके जिंकली, यामध्ये विक्रमी सात सुवर्णपदकांचाही समावेश आहे. सचिन सिवाच, प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया आणि साक्ष चौधरी यांनी सुवर्णपदके पटकावली. स्टार खेळाडू मीराबाई चानू हिने भारोत्तोलनात सुवर्णपदक जिंकून, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी, ज्युदोमध्ये भारतासाठी पहिलेवहिले ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून नवीन पर्वाची सुरूवात केली. नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदकाची कमाई केली, तर गुलवीर सिंह याने पाच व दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत दोन वैयक्तिक पदके (एक रौप्य व एक कांस्य) जिंकत इतिहास रचला. तसेच, भारताने दिव्यांगांच्या क्रीडा प्रकारात एकूण सात पदके (तीन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य) जिंकत, आजवरची सर्वोत्तम पॅरा-मोहीम पार पाडली.
 
भारतीय लष्कराचे भरीव योगदान...
 
भारताने यावेळेस राष्ट्रकुल स्पर्धेत जेवढी पदके मिळवली, त्यांपैकी आठ सुवर्ण, सात रौप्य आणि एक कांस्य अशी १६ पदके भारतीय लष्कराच्याच खेळाडूंनी पटकावली. देशभरातील होतकरू खेळाडूंना विविध माध्यमांतून शोधत, त्यांना पुण्यात असलेल्या ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ या संस्थेत लष्कर दाखल करून घेते. त्यांचे पालकत्वही लष्कर स्वीकारते. देशांतर्गत असो अथवा राष्ट्रकुल, ऑलिम्पिक अशा विविध क्रीडा स्पर्धेत, त्या खेळाडूंना लष्कर उतरवते. या खेळाडूंचे यशस्वितेचे प्रमाण, जवळपास ८० टक्के असल्याचे दिसून आले आहे. ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये दाखल करून घेण्यासाठी ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या राष्ट्रीय खेलकूद स्पर्धांना लष्कराच्या काही व्यक्ती भेट देतात, आणि प्रभावी जनजातीय खेळाडूंना लष्करात दत्तक घेतात. आज भारताला अशाच जनजातीय खेळाडूंचा फायदा होत आला आहे.
 
दिव्यांग धावपटूची गुरुदक्षिणा...
 
नाशिकच्या दिलीप गावितला उजवा हात कोपराच्या खाली नाही. गावातील झाडावरून खाली पडल्यामुळे, त्याला आपला हात गमावावा लागला होता. २०१६ पासून तो, नाशिकचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. एका आंतरशालेय स्पर्धेदरम्यान, काळे यांची त्याच्यावर नजर पडली आणि पहिल्याच भेटीत ते त्याच्या कामगिरीने प्रभावित झाले. दिलीपची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने, काळे यांनी सुरुवातीच्या काळात त्याच्या प्रशिक्षणाचा, राहण्याचा व इतर खर्चाचा भारही स्वतःच उचलला. अत्यंत जिद्दी स्वभावाचा दिलीप सुरुवातीला दिव्यांगांच्या क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यास तयार नसे. याऐवजी, शारीरिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंसोबतच अधिक आव्हानात्मक वातावरणात स्पर्धा करण्याचाच त्याचा आग्रह होता. दिलीपने राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा सुवर्णपदक मिळवले, तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता. वैजनाथ काळे या आपल्या गुरूंनाच ते पदक गुरुदक्षिणा म्हणून दिलीप गावितने समर्पित केले.
 
...आणि खेळाडू गायब होतात
 
राष्ट्रकुल स्पर्धा संपताच, पाकिस्तानचा मुष्टियोद्धा कुदरतुल्ला संघाच्या हॉटेलमधून फरार झाल्याचे उघडकीस आलं. त्याचे पारपत्र संघ व्यवस्थापकाकडे जमा असून देखील तो पळून गेला. परदेशातील स्पर्धा संपल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना पाकिस्तानात परत जायचे नसल्याने, ते अशाच प्रकारे पसार होतात. २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुलेमान बलोच आणि नझीरुल्ला खानही, असेच पळून गेले होते. २०२४च्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आशियाई सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी मुष्टियुद्धपटू सोहेब रशीदने, खोलीतल्या सहकार्‍यांचेच परदेशी चलन आणि मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. अशा पाकचे ३६ खेळाडू या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाले होते.
 
आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडेल की, असे ते गायब होतात? तर याची कारणे वेगवेगळी असू शकतात. ती केवळ खेळाशी संबंधित असतातच असे नाही. याची तज्ज्ञ मंडळींनी केलेली कारणमीमांसा पाहता, काही कारणे पुढीलप्रमाणे आढळतात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत नसणे, देशातील राजकीय अस्थैर्य, देशातील अपुर्‍या प्रशिक्षण सुविधा, देशात खेळ आणि खेळाडूंना मिळणारी मदत तुटपुंजी असणे, देशातील क्रीडा संघटनांमधील बोकाळलेला भ्रष्टाचार, देशात लैंगिक समानता नसणे, छळाची भीती वाटणे.
 
अनेकांसाठी हा निर्णय म्हणजे क्रीडा कारकीर्द सोडून देणे नव्हे, तर अधिक चांगल्या परिस्थितीत ती घडवण्याचा प्रयत्न करणे, हा असतो. मात्र, यातून अपेक्षित परिणाम मिळेलच, याची खात्री नसतेच. याचे प्रमुख उदाहरण म्हणून आपण पाकिस्तानकडेच पाहू.कारण आपण उल्लेख करतोय, त्यातील किती उदाहरणे पाकिस्तान आणि अन्य राष्ट्रांच्या खेळाडूंना लागू पडतील, त्याचा अंदाज आपण निश्चितच घेऊ शकतो. मग तसे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून, पसार व्हायला ते उद्युक्त होतात.

भारतीय खेळाडू कधी बेपत्ता झाले आहेत का?
 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा किंवा ऑलिम्पिकनंतर आश्रय मिळवण्याच्या उद्देशाने, खेळाडू बेपत्ता झाल्याच्या घटनांमध्ये भारताचा सहभाग क्वचितच दिसला आहे. या संदर्भातील गुरचरण सिंग या मुष्टियुद्धपटूचं उदाहरण,एका क्रीडापत्रिकेत आढळते. सिडनी ऑलिम्पिक २००० मध्ये ‘लाईट-हेवीवेट’ गटात गुरचरण उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता; मात्र त्याला कोणतेही पदक मिळवता आलं नव्हतं. त्यानंतर काही महिन्यांनी, भारतीय संघासोबत चेक प्रजासत्ताक येथे प्रशिक्षण शिबिरात असताना, गुरचरण सिंगनी अधिकार्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तेथून काढता पाय घेतला. तेथून गुरचरण सिंग अमेरिकेला गेला आणि व्यावसायिक मुष्टियुद्धपटू होण्याची धडपड करण्यासाठी तिकडेच राहिला. पण मग पोटापाण्यासाठी त्यांनी लहानमोठी कामंही केली. भारतात असताना गुरचरण सिंग भारतीय लष्करात हवालदार म्हणून कार्यरत होता. तो ज्या प्रकारे पळून गेला, त्यामुळे लष्कराने गुरचरण सिंगला ‘रजेविना गैरहजर’ घोषित करून त्यावर शिस्तभंगाची कारवाई केली.
 
लव्हलिना कूलली नाराजी व्यक्त करते...
 
राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान, ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॉसर लव्हलिना बोरगोहेन ग्लास्गोमधील ‘मिस्टर सिंग्स् इंडिया’ नामक भारतीय रेस्टॉरंटमध्ये, भारताचा चुकीचा नकाशा पाहून नाराज झाली. त्या नकाशातून भारताचा ईशान्य भूभाग आणि जम्मू-कश्मीरचा काही हिस्सा वगळण्यात आला होता. राष्ट्रकुल स्पर्धेतील शानदार कामगिरीनंतर, भारतीय मुष्टियुद्धपटूंचा संघ जेवणासाठी या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्या रेस्टॉरंटच्या लोगो आणि नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशातून, ईशान्येकडील राज्ये पूर्णपणे वगळण्यात आली होती. लव्हलिनाने कोणताही वाद न घालता, अतिशय नम्रपणे रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांना व व्यवस्थापनाला या चुकीची जाणीव करून दिली आणि नकाशा सुधारण्याची विनंती केली. ‘भारतीय मुष्टियुद्ध संघटने’चे अध्यक्ष अजय सिंह यांनीही, या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. यानंतर रेस्टॉरंट व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त करत, लवकरात लवकर नकाशा दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.
 
आता निर्विवादपणे ‘अमदावाद’...
 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३० मध्ये पुन्हा भारतात आयोजित केल्या जातील. गुजरातचे सर्वांत मोठे शहर असलेल्या अहमदाबादमध्ये या स्पर्धेची शताब्दी पार पडेल. २०१०च्या दिल्ली स्पर्धेनंतर भारत दुसर्‍यांदा या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. स्पर्धेची अंतिम रूपरेषा अद्याप निश्चित व्हायची असली, तरी ‘कॉमनवेल्थ स्पोर्ट’ या राष्ट्रकुल संघटनेनं या स्पर्धांची रूपरेषा आखली असून, पुढील वर्षभरात याबाबत अधिक घोषणा होतील. भारतात होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धांना ‘अहमदाबाद २०३०’ असे न म्हणता, ‘अमदावाद २०३०’ (Amdavad) असे का बरे म्हटले जात असावे? याचे कारण म्हणजे, तो काही मुद्रणदोष नसून ‘अमदावाद’ हे अहमदाबादसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे स्थानिक गुजराती नाव आहे. गुजरातची संस्कृती आणि वारसा यांचा गौरव करण्यासोबतच शहराची स्थानिक ओळख अधोरेखित करण्यासाठी, आयोजक आणि ‘कॉमनवेल्थ स्पोर्ट’ यांनी ‘अमदावाद २०३०’ हे या क्रीडा स्पर्धांचे अधिकृत ब्रॅण्ड नाव म्हणून स्वीकारले आहे.
 
भारतीय संघाला चिअरअप करू...
 
राष्ट्रकुल स्पर्धेला गेलेल्या भारतीय चमूनंतर, आता राष्ट्रकुल व्यतिरिक्त क्रीडाप्रकारातल्या समस्त भारतीय क्रीडापटूंना आता आपण शुभेच्छा द्यावयाच्या आहेत. कारण आता भारत-पाक लढत पाहायला मिळणार आहे. त्यातील पहिली लढत असेल दि. १५ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत. बेल्जियम आणि नेदरलॅण्ड्स या दोन देशांतील मैदानांत संयुक्तपणे खेळवल्या जाणार्‍या हॉकी विश्वचषकात, बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी आपल्या संध्याकाळी ६.३० वाजता पुरुषांची, यानंतर दि. ५ सप्टेंबर रोजी दुबईत रात्री ८ वाजता महिला टी-२० आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान महिला संघांचा महामुकाबला होईल. आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात जपानमध्ये होत आहेत. त्यासाठी आता आपले खेळाडू सज्ज होतील. पाठोपाठ दिव्यांग खेळाडूंसाठीच्या आशियाई स्पर्धाही दि. १८ ऑक्टोबर ते दि. २४ ऑक्टोबरदरम्यान होत आहेत. चला तर मग, अशा विविध क्रीडाप्रकारांत सहभाग घेणार्‍या आपल्या संघाला चिअरअप करायला, आपण मात्र ‘कूल’ राहायचं नाही बरं का!
 
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४




संबंधित मजकूर