वनसंपदेचे वारस

    10-Aug-2026
 
Tribal Communities of Maharashtra
 
महाराष्ट्राच्या वनसंपदेचे समाजजीवनाशी अतुट असे नाते आहे. विविध समाजघटकांशी समतोल साधत महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेले अनेक समाज आपल्याला पाहायला मिळतात. यातीलच एक महत्त्वाचा समाज म्हणजे आदिवासी समाज. याच समाजाचे निसर्गाशी असलेले नाते दर्शवणारा हा लेख.
 
‘आम्ही जंगलचे राजे वनवासी’ असं लोकगीतांमधून म्हटलं जाणारा आदिवासी समाज सह्याद्री, सातपुडा, मेळघाट, विदर्भातील वनक्षेत्र, तसेच ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर आणि रायगड या भागांत जंगलावर अवलंबून राहिलेला आढळतो. भारताचे मूळ रहिवासी म्हणून ओळखला जाणार्‍या या समाजाची स्वतःची स्वतंत्र संस्कृती, भाषा, परंपरा आणि जीवनशैली आहे, जी निसर्गाशी अत्यंत जोडलेली आहे. वारली, कातकरी, महादेव कोळी, भिल्ल, गोंड, कोरकू, कोलाम, माडिया यांसारख्या समुदायांनी पिढ्यान्पिढ्या स्थानिक वनस्पती, प्राणी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे ज्ञान जतन केले आहे. आदिवासींसाठी जंगल हे केवळ लाकूड किंवा इंधनाचा स्रोत नसून अन्न, औषध, निवारा, रोजगार, संस्कृती आणि श्रद्धेचा आधार आहे. कोणती वनस्पती कधी गोळा करावी, तिचा कोणता भाग वापरावा आणि तिचे पुनरुत्पादन कसे होईल, याचे पारंपरिक ज्ञान अनेक समुदायांमध्ये आजही आढळते. पालघर आणि आसपासच्या सह्याद्री परिसरात वारली समाज पसरलेला दिसतो. जंगलातील फळे, कंदमुळे, रानभाज्या, औषधी वनस्पती आणि बांबू यांचा पारंपरिक वापर या समाजाने केलेला दिसतो. वारली चित्रामुळे नावारूपाला आलेला हा समाज आज सर्वश्रुत झाला. ‘हिरवा’ हा वारल्यांचा देव. हे नाव गणपतीचं! भाद्रपदात शेत हिरवंगार करणार्‍या या देवाला त्यांनी आदराने ‘हिरवा देव’ म्हटलं. शेतीसाठी महत्त्वाचा असलेला पाऊस त्यांचा ‘पावश्या देव’ झाला. ऊन, वारा, पावसामध्ये त्यांना ‘वावदिवारन’ देव दिसला ढगांचा ‘ढगशारदेव’आजतागायत त्यांनी पुजला. एवढेच नव्हे, तर जंगलातील वाघदेखील त्यांचा ‘वाघदेव’ आहे. जंगलातील फळे, कंदमुळे, रानभाज्या, औषधी वनस्पती आणि बांबू यांचा पारंपरिक वापर हे लोक आजही करतात. महादेव कोळी समाज आजही विविध वनौषधींना महत्त्वाचे स्थान देतो. आघाडा (Achyranthes aspera)या वनस्पतीचे मूळ किंवा संपूर्ण वनस्पती पाण्यात कुटून सर्दी, खोकला आणि तापाच्या पारंपरिक उपचारांसाठी वापरले जाते. हिरडा (Terminalia chebula) या वनस्पतीच्या फळाची पावडर दातदुखीसाठी, तर ताज्या फळांचा उपयोग जखमा आणि खोकल्यासाठी केला जातो. अमरकंद शरीरातील अशक्तपणा व थकवा कमी करण्यासाठी रस किंवा काढ्याच्या स्वरूपात वापरला जातो. मोहाची फुले व फळे आदिवासींच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असून त्यातून पोषण आणि ऊर्जा मिळते; तसेच त्यांचा पारंपरिक औषधी उपयोगही केला जातो. त्याचप्रमाणे दगडी पाला (Tridax procumbens) ही वनस्पती जखमांमधील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आणि जखम भरून येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरली जाते.
 
अशीच वनौषधी वापरून नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील भिल्ल समाज आपले वेगळेपण जपतो. मोह (Madhuca longifolia) ही वनस्पती त्याचे उत्तम उदाहरण आहे. या वनस्पतीचे जतन या समुदायाकडे होत असल्यामुळे ‘लागेल तेवढाच वापर’ या तत्त्वावर फुलांचा भाजीसाठी, तसेच दारू बनवण्यासाठी वापर केला जातो, तर बियांपासून तेल बनवले जाते. गडचिरोलीतल्या गोंड समाजाच्या स्त्रिया आजही बांबूआधारित उद्योगावर निर्धारलेल्या दिसतात. टोपल्या, चटई, घरबांधणी, शेतीची साधन, हस्तकला यातून आपल्या दैनंदिन गरजा भागवतात. बांबूच्या हिरव्या कोंबापासून विशेष भाजी बनवण्याच तंत्र त्यांनी आत्मसात केलय. याउलट मेळघाटातल्या कोरकू समाजाने रानमेवा, कंदमुळे, रानभाज्या, बिया यांचा वापर उपजीविकेसाठी केला. यात तेंदू (Diospyros melanoxylon)ची पाने बीडीनिर्मितीसाठी वापरली जातात, तर त्याची फळे खाद्य म्हणून वापरले जाते. तेंदूपत्ता संकलन हे अनेक आदिवासी कुटुंबांसाठी उत्पन्नाचे साधन आहे. हिरडा (Terminalia chebula), बेहडा (Terminalia bellirica) आणि आवळा (Phyllanthus emblica) यांना औषधी आणि आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. हिरडा आणि बेहडा ही फळे आवळ्यासोबत त्रिफळा या पारंपरिक औषधी संयोजनातील प्रमुख घटक आहेत. आवळ्याचा उपयोग खाद्यपदार्थ, तसेच पारंपरिक औषधी उपयोगांसाठी केला जातो. करंज (Pongamia pinnata)च्या बियांपासून तेल मिळते आणि त्याचा विविध पारंपरिक उपयोग केला जातो. शिकेकाई (Senegalia rugata) ही नैसर्गिक साबणासारखी वापरली जाणारी वनस्पती असून तिच्या शेंगांचा उपयोग केस स्वच्छ करण्यासाठी आदिवासींकडून आजतागायत केला जातोय. ताड आणि खजूर यांसारख्या वनस्पतींच्या पानांचा, फळांचा आणि इतर भागांचा उपयोग घरगुती, तसेच पारंपरिक जीवनात केला जातो. कडुनिंब ही वनस्पती (Azadirachta indica) औषधी, तसेच नैसर्गिक कीडनियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करते. पालघर व रायगड जिल्ह्यात विसावलेला कातकरी समाज अशाच नैसर्गिक संपत्तीवर गुजराण करताना दिसतो. पावसाळ्यातील रानभाज्या, झाडावरती येणारी मधाची पोळी काढून त्यातून नैसर्गिक मध मिळवण्याचं धाडसाचं काम या लोकांकडून केलं जातं.
 
उदरनिर्वाहासाठी शहराकडे मध घेऊन येणारी कातकरी समाजाची अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील हे आदिम समाज निसर्गासोबत केवळ जगत नाहीत, तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत देव शोधून त्यांचं जतन करतात. आदिवासी घरांची निर्मितीदेखील याच नैसर्गिक घटकांनी झालेली दिसते. यात बांबू कारवी (Strobilanthes callosa) च्या काट्यांचा वापर केला जातो. जमिनीवर शेणाचा सारवलेला थर आणि छतासाठी कौले किंवा गवताचा वापर ते करतात. लोकगीतातून आदिवासी समाज एकत्र येतो. तारपाच्या वाद्याच्या साथीनं निसर्गावर आधारित गीत वारली समाजातील लोक म्हणत असतात. पेरणीच्या आणि पावसाच्या गाण्यांनी शेतात घेर धरला जातो. गोंड समाज वनगीतातून रानफुले, पहाड पशुपक्षी यांचे वर्णन करतो. मोह फुले वेचताना आपल्या संस्कृतीची ओळख गाण्यातून केली जाते. कोकणा व ठाकर समाज हळदी-कुंकूच्या सणाला ऋतूंच्या स्वागतासाठी गाण्यातून ठेका धरतो. तूर नृत्य, ढोल नृत्य, कामडी नृत्य, गौरी नृत्य, गावत्या आणि सांबळी नृत्य या सगळ्या नृत्यप्रकारात निसर्गाच्या सान्निध्यातलं शाश्वत जगणं दाखवले गेले आहे. भगवान बिरसा मुंडांच्या प्रेरणेने जागृत झालेला हा समाज नवउमेदीने एकत्र आला की ‘जय जोहार’ करतो. आजही पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार, तलासरी आणि डहाणू या भागात गेल्यावर आदिवासींच्या पाहुणचारानं पाड्यातलं वेगळेपण अनुभवता येतं. बांबूच्या टोपलीत रानमेवा जपणार्‍या प्रत्येक आदिवासी स्त्रीमध्ये कमालीचे कष्ट करण्याची जिद्द बघायला मिळते. पावसाळ्यातल्या रानभाज्यांची आजच्या शहरी जीवनाला ओळख करून देण्यासाठीची तिची मेहनत त्यात दिसते. संकटांवर मात करत आजही हा समाज टिकून राहिला आहे. काँक्रिटीकरणाच्या जाळ्यात कमी होत असलेल्या वनक्षेत्रांमध्ये मालकीच्या जागेसाठी अजूनही प्रतीक्षेत असतानादेखील जल, जंगल, जमीन राखण्याचा प्रयत्न करते.
 
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापकपदावर कार्यरत आहेत.)
७४४७३७६९९७




संबंधित मजकूर