हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानचेच आराध्य दैवत. शिवचरित्राचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी उक्तीला ठोस कृतीची जोड दिली ती राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे जतन, शिवस्मारकांचे संवर्धन, शिवचरित्राचा व्यापक प्रसार आणि स्वराज्याच्या प्रेरणेचे राष्ट्रीय स्तरावर संवर्धन करण्यासाठी सुधीरभाऊंनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज दि. १ ऑगस्ट रोजी त्यांना ‘श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड’ यांच्या वतीने ‘शिवसन्मान-२०२६’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शासनाच्या निर्णयांतून, सांस्कृतिक धोरणांतून शिवरायांविषयीची श्रद्धा प्रत्यक्षात साकारणार्या सुधीरभाऊंच्या ऐतिहासिक योगदानाचा मागोवा घेणारा हा लेख...
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांच्या पराक्रमाने स्वराज्य घडविले, त्यांच्या विचारांनी राष्ट्राला स्वाभिमान शिकविला आणि त्यांच्या चरित्राने असंख्य पिढ्यांना प्रेरणा दिली. शिवरायांविषयीची श्रद्धा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असते. मात्र, ती श्रद्धा शासनाच्या निर्णयांत, सांस्कृतिक धोरणांत आणि ऐतिहासिक कृतीत उतरविण्याचे भाग्य फार थोड्या व्यक्तींना लाभते. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेली आपली नितांत श्रद्धा अनेक ऐतिहासिक निर्णयांमधून कृतीत उतरविली.
त्यांच्यासाठी शिवभक्ती म्हणजे केवळ घोषणांतील जयघोष नव्हता; ती होती इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी, स्वराज्याच्या स्मृतींचे संवर्धन करण्याची बांधिलकी आणि पुढील पिढीपर्यंत शिवचरित्राचा तेजस्वी वारसा पोहोचविण्याची अखंड धडपड!
दशकानुदशके प्रलंबित असलेल्या अनेक मागण्यांना त्यांनी न्याय दिला. दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी ‘शिवप्रतापदिनी’ प्रतापगड परिसरातील अफजलखानाच्या कबरीभोवती झालेले अतिक्रमण हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत, त्यांनी शिवप्रेमींच्या दीर्घकाळच्या भावनेला न्याय मिळवून दिला. हा निर्णय केवळ प्रशासकीय नव्हता; तो इतिहासाबद्दलची संवेदनशीलता आणि स्वराज्याच्या स्मृतींच्या सन्मानाची अभिव्यक्ती होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचे प्रतीक मानली जाणारी वाघनखे भारतात परत आणण्याची ऐतिहासिक प्रक्रिया त्यांच्या पुढाकारातून यशस्वी झाली. अनेक पिढ्यांच्या भावविश्वाशी जोडलेली ही भावना प्रत्यक्षात आणून त्यांनी इतिहासाला वर्तमानाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
शिवरायांचा वारसा हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, संपूर्ण भारताचा अभिमान आहे; या व्यापक दृष्टीतून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. पाकिस्तान सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच पुतळा उभारून राष्ट्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या जवानांसमोर स्वराज्याच्या प्रेरणेचे तेजस्वी प्रतीक उभे केले. आग्रा येथील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सुरू करण्याचा निर्णयही राष्ट्रीय पातळीवर शिवचरित्राचा गौरव करणारा ठरला.
शिवरायांचे जीवन सर्वांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच, दृष्टिहीन बांधवांनाही शिवचरित्राचा अभ्यास करता यावा, यासाठी ‘ब्रेल’ लिपीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रकाशित करण्यात आले. समावेशकतेचा हा विचार त्यांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा आहे.
छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळावा, यासाठी ‘युनेस्को’कडे प्रस्ताव सादर करण्यात आला. गडकिल्ले हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून, स्वराज्याच्या वैभवाचे आणि स्वाभिमानाचे जिवंत साक्षीदार आहेत, या भावनेतून हा ऐतिहासिक पुढाकार घेण्यात आला.
‘शिवराज्याभिषेक दिन’ शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. दरवर्षी रायगडावर तिथीनुसार ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक प्रसंग नसून सुशासन, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श आहे, ही भावना या निर्णयामागे होती.
प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात चांदीचे छत्र अर्पण करण्यात आले. सिंधखेडराजा येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग आयोजित करून ‘शिवचरित्र’ घराघरांत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले. शिवरायांच्या शस्त्रपरंपरेचा गौरव म्हणून दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून घोषित करण्यात आले. छत्रपतींच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित टपाल तिकिटे प्रकाशित करून त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला.
इतकेच नव्हे, तर श्रीशैलम् येथे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पावनस्थळी तपश्चर्या करीत होते, त्याठिकाणी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांच्या खर्चातून मंदिर उभारण्यात आले. ही केवळ एक वास्तू नव्हे, तर शिवभक्तीची आणि ऐतिहासिक स्मृतींच्या जतनाची जिवंत साक्ष आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या या कार्याची दखल शिवप्रेमी समाजानेही अत्यंत सन्मानाने घेतली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे जतन, शिवस्मारकांचे संवर्धन, शिवचरित्राचा व्यापक प्रसार आणि स्वराज्याच्या प्रेरणेचे राष्ट्रीय स्तरावर संवर्धन करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड’ यांच्या वतीने दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना ‘शिवसन्मान-२०२६’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. हा सन्मान केवळ एका लोकप्रतिनिधीचा गौरव नसून, छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेल्या त्यांच्या अखंड निष्ठेचा, समर्पित शिवसेवेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेसाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या या सर्व निर्णयांकडे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून पाहता येणार नाही. प्रत्येक निर्णयामागे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची नितांत श्रद्धा, इतिहासाविषयीचा आदर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे संवर्धन करण्याची व्यापक दृष्टी स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी शिवरायांना केवळ अभिवादन केले नाही; तर शासनाच्या धोरणांमधून, सांस्कृतिक उपक्रमांमधून आणि ऐतिहासिक निर्णयांमधून शिवविचार जनमानसात रुजविण्याचे कार्य केले.
शिवभक्तीचा खरा अर्थ केवळ घोषणांत नसतो; तो शिवरायांचा इतिहास जपण्यात, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आणि स्वराज्याच्या प्रेरणेला कृतीतून पुढे नेण्यात असतो. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध करून दाखविले आहे. म्हणूनच, त्यांची शिवभक्ती ही शब्दांपेक्षा कृतीत अधिक बोलते. त्यांची सांस्कृतिक कारकीर्द ही केवळ एका मंत्र्याची प्रशासकीय वाटचाल नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित केलेले एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि इतिहासात अजरामर ठरणारे शिवभक्तीचे कृतिपर्व आहे.
- अमोल जाधव