हिंदू आस्थेचा अपमान

    01-Aug-2026   
 
 
Hindu faith, Ram temple, Parliament movement
 
 
संसदेच्या आवारात शुक्रवारी जे काही पाहायला मिळाले, ती केवळ राजकीय नौटंकीच नव्हती; तर कोट्यवधी हिंदूंच्या तीव्र आस्थेचा आणि विश्वासाचा थेट अवमान होता. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या कथित देणगी प्रकरणाचा निषेध नोंदवण्याच्या नावाखाली विरोधी पक्षांनी ज्या प्रकारचा ‘पोरखेळ’ मांडला, त्याने संपूर्ण देशाची मान शरमेने खाली झुकली. पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी साधू आणि पुजार्‍याचा वेश परिधान करून संसदेच्या ‘मकर’ द्वाराबाहेर बसण्याचे जे नाटक रचले, त्यात दानपेटी आणि साक्षात श्रीरामाच्या प्रतिमेचा वापर केला गेला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः या नाटकात सहभाग घेतला. विरोधकांची ही राजकीय सर्कस म्हणजे सनातन परंपरेतील संत, महंत आणि पुजार्‍यांचा सरळसरळ अनादरच.
 
खरे पाहिले तर, काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी हिंदू आस्था ही नेहमीच सोयीच्या राजकारणाचा भाग राहिली. स्वतःला ‘जानवेधारी ब्राह्मण’ म्हणून मिरवायचे, निवडणुकीच्या तोंडावर मंदिरात जाऊन माथे टेकवायचे आणि दुसरीकडे संसदेसारख्या व्यासपीठावर देवांचे फोटो दाखवून राजकीय हेतू साध्य करायचे, हा यांचा जुनाच पायंडा. जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा हिंदूंच्या मूल्यांना आणि प्रतीकांना ठरवून लक्ष्य करायचे, ही काँग्रेसची जुनी खोडच!
 
ज्या समाजवादी पक्षाच्या भूतकाळातील राजकारणाने अयोध्येत निःशस्त्र कारसेवकांवर गोळ्या झाडून शरयूचे पाणी रामभक्तांच्या रक्ताने लाल केले होते, त्याच पक्षातील नेते आज श्रीराम मंदिराच्या नावाने ‘नैतिकतेचा’ आव आणताना दिसताहेत. लोकशाहीत विरोधकांना सरकारवर टीका करण्याचा आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, निषेध व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीराम, अयोध्येतील मंदिर आणि संतांच्या वेशाचा अशाप्रकारे उपहासात्मक वापर करणे कुठल्या नैतिकतेत बसते? सनातन परंपरेचा, संतांच्या वेशाचा आणि साक्षात राम मंदिराचा राजकीय स्वार्थासाठी तमाशा बनवणार्‍या या ‘पोरखेळाने’ विरोधकांचा खरा चेहरा पूर्णपणे उघडा पडला आहे. संसदेच्या पायर्‍यांवर रचलेली ही नौटंकी जनता विसरणार नाही. राम मंदिरावर चिखलफेक करणार्‍या या सर्व राजकीय ढोंग्यांना देशातील रामभक्त धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत! 
 
 
 
संधिसाधू हिंदुत्वाची बेगडी शान
 
विरोधकांच्या ‘अल्टरनेटिव्ह पॉलिटिस’च्या राजकारणात सध्या ‘हिंदुत्व’ या शब्दाची व्याख्या सोयीनुसार बदलण्याचा एक अतिशय विनाशकारी खेळ सुरू दिसतो. ज्या विचारांवर, ज्या मूल्यांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर हिंदुत्वाचा भगवा फडकवत ठेवला, त्याच परंपरेचे वारसदार आज सत्तेच्या आणि राजकीय गणितांच्या लाचारीपोटी कुठल्या थराला जाऊ शकतात, याचे अत्यंत वाईट उदाहरण अलीकडच्या घडामोडींमधून समोर आले. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नावाखाली झालेल्या आंदोलनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजवले. जेव्हा एखादे आंदोलन देशव्यापी सुरक्षेला आणि शांततेला गालबोट लावते, तेव्हा त्याला पाठिंबा देणे म्हणजे थेट अराजकतेला खतपाणी घालण्यासारखेच आहे
.
त्याहून संतापजनक म्हणजे ज्याच्या नेतृत्वात या ‘सीजेपी’च्या आंदोलनाला सुरुवात झाली, त्या अभिजित दीपकेला हे उबाठाचे पक्षप्रमुख ‘विष्णूचा अवतार’ म्हणून संबोधतात. हा तोच अभिजित दीपके आहे, ज्याच्या व्यासपीठावरून कुणाल कामरासारख्या वादग्रस्त आणि हिंदूविरोधी घटकांनी आपल्या आराध्य दैवत प्रभू श्रीरामाचा आणि हिंदू श्रद्धेचा जाहीर अपमान केला होता. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावर तीव्र निषेध नोंदवण्याऐवजी दीपके व्यासपीठावर खळखळून हसताना दिसला. अशा व्यक्तीचे कौतुक करणे किंवा त्याला अप्रत्यक्षपणे विष्णूचा अवतार मानून गौरवणे, हा केवळ करोडो हिंदूंच्या धार्मिक भावनांशी केलेला खेळ नाही; तर सनातन धर्माचा उघडउघड अपमानच.
 
एकीकडे मतपेटीचे गणित डोळ्यांसमोर ठेवून मंदिरात जायचे आणि दुसरीकडे हिंदू दैवतांची टिंगलटवाळी करणार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे, हा विरोधकांचा नवा पायंडाच बनला आहे. स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणारे उबाठाचे नेतेसुद्धा मग मूग गिळून गप्प बसतात. कारण? त्यांना हिंदूविरोधी ‘इकोसिस्टम’ला दुखवायचे नसते. सत्तेच्या लाचारीसाठी ज्यांनी आपल्या स्वाभिमानाला आणि हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली वाहिली, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी; महाराष्ट्राची जनता भावूक असली, तरी मूर्ख नाही. ‘सोयीच्या आणि संधिसाधू हिंदुत्वाला’ महाराष्ट्राची जागरूक जनता येणार्‍या काळात योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर