शेसपिअरच्या शोकांतिका आणि संस्कृत साहित्याचा सुंदर मिलाप साधत, त्यातील ‘शोक’ अभ्यासणार्या ‘सरस्वती सेकंडरी स्कूल’च्या उपमुख्याध्यापिका डॉ. अमिता भागवत यांच्याविषयी...
तीर्थराज प्रयागमधील गंगा, यमुना आणि गुप्त नदी सरस्वती यांचा संगम घडून, पुढे पवित्र गंगा नदी वाहू लागते. तसेच डॉ. अमिता भागवत यांच्या वाणी आणि लेखणीतून जेव्हा इंग्रजी, संस्कृत आणि सरस्वतीसारखी गुप्तपणे प्रभाव पाडणारी मातृभाषा मराठी यांचा संगम घडून येतो, तेव्हा शेसपिअर आणि आपल्या भास-कालिदासांची अगदी छान गट्टी जमते.
डॉ. अमिता भागवत यांच्या शांत आणि श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणार्या धारदार वाणीतून त्याबद्दल ऐकणे, म्हणजे अक्षरशः पर्वणीच!
डॉ. अमिता भागवत या पेशाने शिक्षिका. बालपणापासूनच ‘शिक्षक’ होण्याचे ध्येय ठेवणार्या काही मोजयांपैकी एक! पूर्वाश्रमीच्या प्रतिभा वेदपाठक या मूळच्या वाईच्या. तेथील त्यांचा सर्वच सभोवताल वेदपठण आणि सांस्कृतिक वारसा जपणारा. महाबळेश्वरकर गुरुजींची वेदशाळा, प्राज्ञपाठशाळा आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचे वास्तव्यही त्यांच्या घराच्या अगदी जवळच; तर मराठी विश्वकोशाचे कार्यालय तर शेजारीच होते. त्यामुळे अगदी न कळत्या वयापासून प्रतिभा यांच्या कानांवर वेदोच्चार पडत गेले. तेथील विद्यार्थ्यांचे राहणीमान, शिस्त, अभ्यास आणि त्यातून परिवर्तित होणारी आर्य संस्कृतीची जाण प्रतिभा यांच्यात सहजी रुजत गेली. वेदशाळेच्या दारात बसून वेदपठण ऐकायला त्यांना मनापासून आवडत असे. पुरातन भारतीय साहित्याबद्दल ओढ आणि त्याचे संस्कार प्रतिभा यांच्यावर बालपणापासून होतच होते.
त्यात इंग्रजी साहित्याची भर पडली, ती शेजारी राहणार्या इंग्रजीच्या प्राध्यापकांमुळे. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रतिभा श्रवणशक्तीने ज्ञानग्रहण करत असत. त्यांच्या वाई हायस्कूलमधील इंग्रजीच्या शिक्षकांची पुस्तकाच्या पलीकडले शिकवण्याची पद्धत तर मुलांना गोष्ट ऐकत असल्यासारखी खिळवून ठेवी. शेसपिअरशी तर प्रतिभा यांची आठवीत असतानाच मैत्री झाली होती.
इंग्रजी आणि संस्कृतचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करणार्या प्रतिभा यांना पदवीला मात्र त्यांपैकी एकाचीच निवड करावी लागली. इंग्रजीतून पदवीचे शिक्षण घेत असतानाच, तेथील प्राध्यापकांमुळे त्यांना ऑस्कर वाईल्ड, बर्नार्ड शॉ, थॉमस हार्डी यांसह अशा असंख्य साहित्यिकांचाही साहित्यिक सहवास लाभला. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही संपादित केली. त्याकाळात त्यांनी शेसपिअरचे सर्वच साहित्य कोळून प्यायले.
प्रतिभा यांना भेटलेली सर्वच आदर्श व्यक्तिमत्त्वे शिक्षकच असल्यामुळे त्यांनीही शिक्षकच होण्याचा चंग बांधला आणि त्यांनी ‘बीएड’देखील पूर्ण केले. त्यानंतर लगेचच त्यांचा विवाह झाल्यामुळे त्या वास्तव्याला ठाण्यात गेल्या आणि तेथील सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये १९९७ पासून अमिता भागवत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
अमिता यांनी आपल्या इंग्रजी साहित्यवाचनात कधीही खंड पडू दिला नाही. तेव्हाच ‘संस्कृत साहित्यामध्ये शोक नाही,’ असे त्यांच्या वाचनात आले. अमिता यांना ते फारसे पटत नव्हते. त्यांनी लगेचच संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ‘एसएनडीटी’ विद्यापीठात प्रवेश घेतला आणि ‘वेदान्तशास्त्रा’त पहिला क्रमांकदेखील पटकावला.
अभ्यासांती अमिता यांना असे लक्षात आले की, प्रत्येक कथा ही सुखांतिका असावी, या ‘नाट्यशास्त्रा’च्या नियमामुळे केवळ दोन अपवाद वगळले, तर एरव्ही संस्कृत साहित्यात शोकांतिका नाहीतच. पण, त्यातही थोड्याफार प्रमाणात तरी शोक असेलच ना, हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याचाच शोध घेत, त्यांनी संस्कृत साहित्यातील ‘वेणीसंहार’ इ. आणि शेसपिअरची ‘हॅम्लेट’ इ. नाटके अभ्यासली. याच्याच तुलनात्मक अभ्यासातून ‘पीएचडी’ करत त्यांनी संस्कृत साहित्यात शोकांतिका नसली, तरी शोक आहेच, हे निश्चित केले आणि अखेर त्या ‘डॉ.’ अमिता भागवत झाल्या.
लोक जगातील कोणत्याही प्रांताचे, भाषेचे असले; तरी मानवी भावभावना मात्र समानच असतात. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीमध्ये मात्र निर्विवादपणे फरक सापडतो. या साम्य-भेदांना सखोल अभ्यासून आता याच विषयातील, डॉ. अमिता यांचे पहिलेवहिले पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. अध्यापनातील निवृत्तीनंतर आपले लेखनकार्यच वृद्धिंगत करत, नवनवीन विषयांचा मागोवा घेण्याचा त्यांचा मानस आहे.
शालेय विद्यार्थ्यांनादेखील लेखनाची गोडी लागण्यासाठी डॉ. अमिता यांनी विद्यार्थ्यांचेच संपादक मंडळ असलेले ‘झेप’ नामक पाक्षिक काही वर्षे चालवले. इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करणार्या अनेक लेखमालादेखील त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिल्या. त्यांना ‘भारत विकास परिषद’, ‘रोटरी लब ऑफ ठाणे नॉर्थ’ अशा अनेक संस्थांकडून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’देखील मिळाला आहे. शिक्षकांसाठी घेतल्या जाणार्या स्पर्धांमध्ये भाग घेत केलेल्या एका अनोख्या उपक्रमासाठी डॉ. अमिता भागवत यांना मानाच्या ‘विद्याव्रती’ पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले आहे.
पूर्वाश्रमी घेतलेला शिक्षक होण्याचा निर्णय डॉ. अमिता यांना आजही समाधान देतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं,’ याचा अनुभव त्यांना विद्यार्थ्यांना शिकवताना वेळोवेळी येतो. कवी आणि लेखक समजून घेतला की, त्यांच्या शब्दांमागील भावना समजून घेणे सोपे जाते, असे त्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतात. कित्येक वर्षे लोटल्यानंतर अजूनही मिळणारे माजी विद्यार्थ्यांचे प्रेम आणि त्यांच्या मनातील आदर, हीच डॉ. अमिता भागवत यांची खरी संपत्ती आहे. पुस्तकापलीकडे जाऊन चांगला माणूस घडवणार्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका डॉ. अमिता भागवत यांना त्रिवार प्रणाम!
- ओवी लेले