मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील युवा वन्यजीव संवर्धक चिन्मय प्रकाश सावंत यांची 'इंटरनॅशनल युनियन फॉर काॅन्झर्वेशन ऑफ नेचर'च्या (आययुसीएन) तरस विशेष गटासाठी सदस्य म्हणून (Species Survival Commission (SSC) Hyaena Specialist Group) अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. माणदेशातील पट्टेरी तरस आणि खुल्या नैसर्गिक परिसंस्थांच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी केलेल्या कार्याची ही जागतिक स्तरावरील दखल मानली जात आहे. चिन्मय सावंत हे दै. मुंबई तरुण भारतच्या २०२४ सालच्या 'स्पिसिज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड'चे विजेते आहेत. (Hyaena Specialist Group)
चिन्मय सावंत गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील माणदेश परिसरातील खुल्या नैसर्गिक परिसंस्थांमध्ये पट्टेरी तरस तसेच गवताळ प्रदेशातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातून त्यांनी संवर्धनाचे प्रभावी मॉडेल विकसित केले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, वन्यजीव निरीक्षण, अधिवास संरक्षण, जनजागृती आणि समुदाय-आधारित संवर्धन उपक्रम राबविले आहेत. खुल्या नैसर्गिक परिसंस्थांचे महत्त्व अधोरेखित करताना वन्यजीव आणि स्थानिक समाज यांच्यातील सहअस्तित्व मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत आययूसीएन एसएसी तरस स्पेशालिस्ट ग्रुपने त्यांना आयोग सदस्य म्हणून निवडले आहे.
या नियुक्तीमुळे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केवळ दोन सदस्यांपैकी एक म्हणून चिन्मय सावंत यांना जगातील १३ देशांतील २० संशोधक, वन्यजीव तज्ज्ञ आणि संवर्धन व्यावसायिकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून तरसांच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक संशोधन, माहितीची देवाणघेवाण, संवर्धन धोरणे विकसित करणे, तसेच मानव–वन्यजीव सहअस्तित्वाला चालना देणारे उपक्रम राबविण्यात ते सक्रिय भूमिका बजावणार आहेत. ही संधी जागतिक स्तरावर तरस संवर्धनासाठी योगदान देण्याबरोबरच महाराष्ट्रातील माणदेशाच्या खुल्या नैसर्गिक परिसंस्थांमध्ये पट्टेरी तरसाच्या संवर्धनासाठी माझी बांधिलकी अधिक दृढ करणारी आहे, असे चिन्मय सांवत यांनी सांगितले आहे.
काय आहे हा ग्रुप?
IUCN च्या Species Survival Commission अंतर्गत कार्यरत असलेला Hyaena Specialist Group हा जगभरातील तरस प्रजातींच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संशोधक, वन्यजीव तज्ज्ञ आणि संवर्धन व्यावसायिकांचा आंतरराष्ट्रीय समूह आहे. वैज्ञानिक संशोधन, संवर्धन धोरणे तयार करणे, जागतिक स्तरावर ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधनाला चालना देणे आणि विविध देशांमधील सहकार्य वाढविणे हे या समूहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तरसांच्या सर्व प्रजातींचे दीर्घकालीन संरक्षण आणि त्यांच्या अधिवासांचे जतन करण्यासाठी हा समूह महत्त्वाची भूमिका बजावतो.