विचार अण्णा भाऊंचा, संकल्प सक्षमतेचा!

    01-Aug-2026   
 
ARTI Maharashtra Interview
 
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि संघर्षातून समाजातील कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या वेदनांना आवाज दिला. शिक्षण, स्वाभिमान आणि संघर्षाच्या माध्यमातून परिवर्तनाचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘आर्टी’ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, स्पर्धा-परीक्षा, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि संशोधनाच्या क्षेत्रात युवक-युवतींसाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...

‘आर्टी’च्या स्थापनेमागची भूमिका आणि संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट याविषयी काय सांगाल?
 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहिले होते. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी आणि विकासाच्या प्रवाहामध्ये सर्वांचा सहभाग असावा, हा त्यांच्या विचारांचा मुख्य आधार होता.
 
याच विचारांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत मातंग आणि तत्सम समाजघटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘आर्टी’ची स्थापना करण्यात आली. समाजातील काही घटक शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिले आहेत. या घटकांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी ‘आर्टी’ संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेची सुरुवात ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समिती’च्या कार्यालयातून झाली. प्रारंभी संस्था भाड्याच्या इमारतीतून कार्यरत होती. मात्र, स्थापनेनंतर अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम सुरू करण्यात आले.
 
‘आर्टी’ची स्थापना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’च्या धर्तीवर करण्यात आली आहे. ‘बार्टी’च्या माध्यमातून प्रशिक्षण, संशोधन आणि विकासात्मक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर समाजातील युवक-युवतींना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘आर्टी’च्या माध्यमातून केला जात आहे. महाराष्ट्र शासनाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ आणि ‘वनार्टी’ यांसारख्या संस्थांची स्थापना केली आहे. या सर्व संस्थांमध्ये प्रशिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सुविधा आणि कार्यपद्धतीमध्ये समानता राहावी, यासाठी शासनाने समान धोरण निश्चित केले आहे.
 
‘आर्टी’चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, युवक-युवतींना शिक्षण, स्पर्धा-परीक्षा, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि संशोधनाच्या माध्यमातून सक्षम करणे. विद्यार्थ्यांना केवळ संधी उपलब्ध करून देणे नाही, तर त्या संधींचा योग्य उपयोग करता यावा, यासाठी आवश्यक प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हे संस्थेचे ध्येय आहे.
 
‘आर्टी’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवक-युवतींसाठी कोणत्या प्रमुख शैक्षणिक व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत?
 
‘आर्टी’ची स्थापना ‘बार्टी’च्या धर्तीवर झाल्यामुळे ‘बार्टी’मध्ये राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांच्या धर्तीवर ‘आर्टी’मध्येही योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या संस्थेची पहिली प्रशिक्षण बॅच सुरू असून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. स्पर्धा-परीक्षांच्या माध्यमातून प्रशासनामध्ये जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टी’ मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ अर्थात ‘यूपीएससी’साठी १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यांपैकी ५० विद्यार्थी दिल्ली येथे आणि ५० विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ अर्थात ‘एमपीएससी’, बँकिंग क्षेत्रातील ‘आयबीपीएस’, रेल्वेभरती, पोलीसभरती आणि सैन्यभरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी विद्यावेतनाची सुविधाही देण्यात आली आहे. ‘यूपीएससी’ प्रशिक्षणासाठी दरमहा १३ हजार रुपये, पोलीस आणि सैन्यभरती प्रशिक्षणासाठी पाच हजार रुपये, तर बँकिंग प्रशिक्षणासाठी सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. याशिवाय दहावीमध्ये चांगले गुण मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘जेईई’ आणि ‘नीट’ या प्रवेश परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण योजना राबविण्यात आली आहे. मागील वर्षी ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये १५० विद्यार्थी ‘जेईई’ आणि १५० विद्यार्थी ‘नीट’ प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये निवड झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधी मर्यादित राहू नयेत, हा ‘आर्टी’चा मुख्य उद्देश आहे.

स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टी’च्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते? प्रवेश प्रक्रिया कशी असते?
 
महाराष्ट्र शासनाच्या विविध संस्था, जसे ‘टीआरटीआय’ (Tribal Research and Training Institute), ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ आणि ‘अमृत’ यांच्या माध्यमातून विविध समाजघटकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. ‘आर्टी’मध्येदेखील ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’, बँकिंग, रेल्वे, पोलीस आणि सैन्यभरतीसाठी आवश्यक पूर्व प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, यासाठी नामांकित प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण संस्थांची निवड करताना त्यांच्या निकालाची टक्केवारी, अनुभवी शिक्षकवर्ग, अभ्यासिका, ग्रंथालय आणि प्रशिक्षणाचा अनुभव अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला.
 
‘यूपीएससी’साठी देशातील नामांकित प्रशिक्षण संस्था ‘आर्टी’शी जोडण्यात आल्या आहेत. तसेच ‘एमपीएससी’, बँकिंग, पोलीस आणि सैन्यभरतीसाठीही गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, यासाठी संस्थेचा सातत्याने प्रयत्न आहे.
 
सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रशिक्षणाची निवड प्रक्रिया कशी राबविली जाते? विद्यार्थ्यांनी यासाठी काय तयारी करावी?
 
‘आर्टी’सह महाराष्ट्र शासनाच्या विविध संस्था जसे ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ आणि इतर संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी समान धोरण निश्चित करण्यात आले आहे. सर्व संस्थांमध्ये प्रशिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सुविधा आणि निवड प्रक्रिया यांमध्ये समानता असावी, हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया राबविली जाते.
 
सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. त्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात ‘सीईटी’ घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते. ‘यूपीएससी’साठी प्रशिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘यूपीएससी’च्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे ‘एमपीएससी’, बँकिंग, पोलीसभरती आणि सैन्यभरतीसाठी संबंधित परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार निवड प्रक्रिया केली जाते.
 
गेल्या वर्षी या सामायिक प्रवेश परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास ४ लाख, ३० हजार विद्यार्थ्यांनी विविध संस्थांसाठी परीक्षा दिली होती. यामधून ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘सारथी’ आणि ‘आर्टी’सह विविध संस्थांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर त्या संस्थेमध्ये प्रशिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले करिअरचे उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे ठरवून त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा गांभीर्याने अभ्यास करावा. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर केल्यास यश निश्चित मिळू शकते.
 
आजच्या काळात कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्षेत्रात युवक-युवतींसाठी ‘आर्टी’ कोणत्या संधी उपलब्ध करून देत आहे?
 
आज प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा-परीक्षांमध्ये यशस्वी होईलच, असे नाही. त्यामुळे कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ‘आर्टी’च्या माध्यमातून युवक-युवतींसाठी विविध कौशल्य विकासाचे उपक्रम राबविले जात आहेत. यासाठी ‘स्किल सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’, ‘एएफसी इंडिया लिमिटेड’, ‘स्किल टेक सर्व्हिसेस’, ‘नीटकॉम’, तसेच इतर मान्यताप्राप्त संस्थांसोबत काम केले जात आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड येथील जगताप कॉलेजच्या माध्यमातून पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षणासाठीही उपक्रम राबविण्यात येत आहेत. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि त्यांच्यामध्ये आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावे, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
 
‘आर्टी’च्या माध्यमातून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर)अंतर्गत विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे. विविध कंपन्या आणि संस्थांच्या सहकार्याने युवकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही संस्थेचा भर आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’च्या माध्यमातून ज्या संस्थांचे ‘एम्पॅनेलमेंट’ करण्यात आले आहे, त्याच संस्थांच्या माध्यमातून ‘आर्टी’च्या विद्यार्थ्यांनाही परदेशातील रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रशियन शासनाच्या माध्यमातून ४० विद्यार्थिनींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या विद्यार्थिनींना रशियन भाषा प्रशिक्षण, निवास, भोजन आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुविधा रशियन शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
युवकांनी केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता, बदलत्या काळानुसार नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी दारे खुली होऊ शकतात.

‘आर्टी’च्या कार्यात संशोधनाला विशेष महत्त्व आहे. समाजातील विविध प्रश्नांवर संशोधन करून त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी कशा प्रकारे केला जाणार आहे?
 
कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. समाजातील समस्या समजून घेणे, त्या समस्यांमागील कारणांचा अभ्यास करणे आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी संशोधन आवश्यक असते. ‘आर्टी’च्या माध्यमातून मातंग आणि तत्सम समाजघटकांशी संबंधित विविध विषयांवर संशोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती, दहावी आणि बारावीनंतर शिक्षणातील गळतीचे प्रमाण, युवकांसमोरील सामाजिक प्रश्न यांचा अभ्यास करून त्यानुसार योजना तयार करण्यावर भर दिला जात आहे. ‘आर्टी’च्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’च्या बैठकीमध्ये या विषयांवर चर्चा करण्यात आली असून, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या गरजांनुसार संशोधनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजातील काही घटकांमध्ये व्यसनाधीनतेची समस्या असल्याचेही निदर्शनास येते. या समस्येवर जनजागृती, संशोधन आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून काम करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. दहावी आणि बारावीनंतर शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
 
संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या वास्तविक परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यातील योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतात. संस्था नवीन असल्यामुळे समाजातून येणार्‍या सूचना, गरजा आणि प्रस्तावांचा विचार करून संशोधनाचे क्षेत्र अधिक व्यापक केले जाईल.

‘आर्टी’च्या योजना आणि उपक्रमांची माहिती राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था कोणते प्रयत्न करत आहे? विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांतील युवकांपर्यंत या संधी कशा पोहोचणार आहेत?
 
‘आर्टी’ संस्था नवीन असल्यामुळे सुरुवातीपासूनच संस्थेच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर दिला जात आहे. संस्थेच्या स्थापनेनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली. त्यावेळी जवळपास सात हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असता, जवळपास २७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यावरून समाजातील युवक-युवतींमध्ये या संधींबाबत मोठी उत्सुकता असल्याचे दिसून आले. आज सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झाले आहे. गावागावांपर्यंत मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती पोहोचत आहे. त्यामुळे सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप समूह आणि विविध डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने ‘आर्टी’च्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. यासोबतच, प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. नाशिक, कोल्हापूर, भिवंडी, बदलापूर यांसह विविध ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील युवकांपर्यंत संधी पोहोचवण्यासाठी ‘आर्टी’ समन्वयक संकल्पना राबविण्यात येत आहे. केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, बँका, रेल्वे आणि विविध विभागांमध्ये काम केलेले अधिकारी-कर्मचारी, तसेच समाजासाठी योगदान देण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना या माध्यमातून जोडले जात आहे. या समन्वयकांच्या माध्यमातून ‘आर्टी’च्या योजना, प्रशिक्षणाच्या संधी आणि उपलब्ध सुविधा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ‘आर्टी’च्या रजिस्ट्रार इंदिरा असवार यांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या विविध योजनांची माहिती असलेली माहितीपुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेमध्ये प्रशिक्षणाचे प्रकार, पात्रता, विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ आणि आवश्यक माहिती देण्यात आली आहे. ऑगस्ट महिना अण्णा भाऊ साठे जयंतीचा महिना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. त्यामुळे या कालावधीत जयंती मंडळे, सामाजिक संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ‘आर्टी’च्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
‘आर्टी’च्या आगामी वाटचालीबाबत आपले काय नियोजन आहे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील युवक-युवतींसाठी आपला संदेश काय असेल?
 
‘आर्टी’ संस्थेस अल्पावधीतच समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘आर्टी’च्या स्थापनेनंतर पहिल्या वर्षात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावर्षी ही संख्या वाढवून चार हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव आणि संबंधित अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ‘आर्टी’च्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’च्या बैठकीमध्ये संस्थेच्या विस्ताराबाबत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात तत्कालीन प्रधान सचिव डॉ. विजय वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य पुढे जात आहे. स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षणासोबतच कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ‘पीएचडी’ करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपच्या माध्यमातून संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२३, २०२४ आणि २०२५ या कालावधीतील एकूण ३०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘आर्टी’च्या माध्यमातून यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘आर्टी’च्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रेरणा खवळे यांची ‘यूपीएससी’मध्ये निवड झाली. मातंग आणि तत्सम समाजघटकांतून ‘यूपीएससी’मध्ये निवड होणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांचा त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
तसेच, कोल्हापूरच्या पारगाव येथील सायली भोसले यांची ‘डीवायएसपी’पदासाठी निवड झाली. समाजातील पहिल्या महिला ‘डीवायएसपी’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच अर्जुनकर यांचीही ‘डीवायएसपी’पदासाठी निवड झाली असून, त्यांचाही सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील इतर युवकांना प्रेरणा देणे, हा ‘आर्टी’च्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कष्टकरी आणि संघर्ष करणार्‍या घटकांना आवाज दिला. त्यांच्या विचारांमध्ये युवक शक्तीला विशेष स्थान होते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आजही मार्गदर्शक आहे. आजच्या काळात शिक्षणासोबत कौशल्य, संघटन आणि विकास यांचा समन्वय साधण्याची गरज आहे. शिक्षणातून व्यक्तीचा विकास, कुटुंबाचा विकास आणि समाजाचा विकास झाला पाहिजे.

‘बार्टी’तील व्यवस्थापकीय संचालकपदापासून ‘आर्टी’च्या प्रमुखपदापर्यंतचा आपला प्रवास प्रेरणादायी आहे. या प्रवासातील एखादा विशेष प्रसंग युवकांना काय संदेश देईल?
 
‘आर्टी’संस्थेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच वर्षी संस्थेच्या माध्यमातून एका विद्यार्थिनीची ‘यूपीएससी’मध्ये निवड होणे, ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद घटना आहे. एखाद्या नवीन संस्थेची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी त्या संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या ‘यूपीएससी’ परीक्षेमध्ये विद्यार्थिनीची निवड होणे, ही मोठी उपलब्धी आहे. प्रेरणा खवळे यांची ‘यूपीएससी’मध्ये निवड झाली. मातंग आणि तत्सम समाजघटकातून ‘यूपीएससी’मध्ये निवड होणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. ही घटना ‘आर्टी’साठी, तसेच संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
 
‘यूपीएससी’ ही अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. अशा परीक्षेमध्ये ‘आर्टी’सारख्या नवीन संस्थेच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी विद्यार्थिनीला यश मिळणे, ही समाधानाची बाब आहे. प्रेरणा खवळे यांच्या यशानंतर समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांचा सत्कार करण्यासाठी नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये दोन दिवसांचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतरही संस्थेच्या माध्यमातून अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सायली भोसले यांची ‘डीवायएसपी’पदासाठी निवड झाली. अर्जुनकर यांचीही ‘डीवायएसपी’पदासाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील इतर युवकांना प्रेरणा देणे, हा ‘आर्टी’च्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. माझा युवकांना संदेश एवढाच आहे की, परिस्थिती कोणतीही असली, तरी शिक्षण, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर पुढे जाता येते. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मात्र, त्या संघर्षाला सामोरे जात ध्येय निश्चित करून प्रयत्न केले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
 
अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांप्रमाणे स्वाभिमान, संघर्ष आणि परिवर्तनाची भावना घेऊन युवकांनी पुढे जावे, हीच अपेक्षा आहे.
 
९९६७०२०३६४




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर