‘१५ मिनिटांचे शहर’...


15 Minute City, Urban Planning
 
 
कधीकाळी शहरांची ओळख उंच इमारती, रुंद रस्ते आणि वेगवान वाहतुकीने ठरत होती. पण, आज जगभरातील अनेक महानगरे एका वेगळ्याच वास्तवाला सामोरी जात आहेत. लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे, वाहतुककोंडी दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे, प्रदूषणाचा स्तर चिंताजनक आहे आणि माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान वेळ हा दररोज रस्त्यांवर खर्च होत आहे. सकाळी घराबाहेर पडलेला नागरिक संध्याकाळी परत येईपर्यंत त्याचा दिवस प्रवासातच संपतो. अशा परिस्थितीत शहरांची व्याख्याच बदलण्याचा प्रयत्न करणारी एक संकल्पना जगभरात वेगाने पुढे येत आहे. ती म्हणजे ‘१५ मिनिटांचे शहर.’
 
या कल्पनेला आधुनिक स्वरूप देण्याचे श्रेय फ्रेंच-कोलंबियन शहरी नियोजनतज्ज्ञ कार्लोस मोरेनो यांना जाते. २०१६ मध्ये त्यांनी असा विचार मांडला की, शहरांचा विकास हा वाहनांच्या वेगावर नव्हे, तर नागरिकांच्या गरजांवर आधारित असायला हवा. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला दैनंदिन आयुष्यासाठी लागणार्‍या बहुतांश सुविधा घरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध असतील, तर शहर अधिक कार्यक्षम, अधिक मानवी आणि अधिक शाश्वत बनू शकते. चालत, सायकलने किंवा सार्वजनिक वाहतुकीने शाळा, रुग्णालय, कार्यालय, बाजार, उद्यान किंवा सांस्कृतिक केंद्र गाठता येणे, हीच या संकल्पनेची मध्यवर्ती कल्पना.
 
मात्र, या विचाराची बीजे आजची नाहीत. जवळपास १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश नगररचनाकार एबेनेझर हॉवर्ड यांनी ‘गार्डन सिटी’ची संकल्पना मांडत निसर्गाशी सुसंगत आणि स्वयंपूर्ण शहरांचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर अमेरिकन नियोजनतज्ज्ञ लेरेन्स पेरी यांनी ‘नेबरहूड युनिट’ची कल्पना मांडली, ज्यामध्ये प्रत्येक परिसरात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुविधा सहज उपलब्ध असाव्यात, असा आग्रह होता. पुढे जेन जेकब्स यांनी शहराचा आत्मा हा त्याच्या रस्त्यांमध्ये, स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि परिसरातील मानवी संवादामध्ये असल्याचे ठामपणे मांडले. कार्लोस मोरेनो यांच्या १५ मिनिटांच्या शहरामध्ये या सर्व विचारांचा आधुनिक काळाशी जुळवून घेतलेला संगम दिसून येतो.
 
या संकल्पनेचा गाभा अतिशय साधा आहे. शहर नागरिकांच्या वेळेची बचत करणारे असावे, वेळ खाणारे नव्हे. एखाद्या व्यक्तीला रोजच्या गरजांसाठी शहराच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकाला धावपळ करावी लागू नये. शिक्षण, आरोग्य, खरेदी, काम, विरंगुळा आणि सार्वजनिक सेवा या सर्व गोष्टी शय तितया स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे, १५ मिनिटांचे शहर. त्यामुळे प्रत्येक छोट्या कामासाठी खासगी वाहनाचा वापर कमी होतो आणि परिसरच नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याचा केंद्रबिंदू बनतो.
 
‘१५ मिनिटांचे शहर’ हे केवळ नगररचनेचे मॉडेल नसून, सार्वजनिक आरोग्याशीही जोडलेले आहे. चालणे आणि सायकलचा वापर वाढल्याने नागरिकांची शारीरिक हालचाल वाढते, निष्क्रिय जीवनशैली कमी होते आणि मधुमेह, हृदयविकार किंवा लठ्ठपणासारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. वाहतुककोंडीत अडकून राहण्याचा मानसिक ताण कमी झाल्याने जीवनमानातही सकारात्मक बदल घडतो. लहान मुलांसाठी सुरक्षित शाळामार्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहज उपलब्ध सुविधा आणि कुटुंबासाठी अधिक वेळ हीदेखील या मॉडेलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
 
पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिले, तर या संकल्पनेचे महत्त्व आणखी वाढते. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी झाल्यास कार्बन उत्सर्जन घटते, हवेची गुणवत्ता सुधारते आणि इंधनाची बचत होते. पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि हरित क्षेत्रांचा विस्तार शहरांना हवामानबदलाच्या परिणामांशी सामना करण्यासही मदत करतो. त्याचबरोबर स्थानिक दुकाने, कॅफे, बाजारपेठा आणि लघुउद्योगांना चालना मिळाल्याने परिसराची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनते.
 
‘१५ मिनिटांचे शहर’ म्हणजे प्रत्येक समस्या एका दिवसात सुटेल, असा दावा या संकल्पनेत अजिबात नाही. प्रत्येक शहराची लोकसंख्या, भौगोलिक रचना, आर्थिक परिस्थिती आणि विकासाचा वेग वेगळा असल्याने या मॉडेलची अंमलबजावणीही वेगवेगळी असेल. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, भविष्यातील शहरे केवळ मोठी असणे पुरेसे ठरणार नाही; तर ती नागरिकांसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि राहण्यायोग्य असणे गरजेचे.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर