जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व दूरगामी निर्णय घेतला आहे. राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये दि. १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. युगप्रवर्तक अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा आणि लेखनप्रेरणेचा मागोवा घेणारा हा लेख...
हित्यसम्राट अण्णा भाऊ साठे म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून थेट सातासमुद्रापार झेप घेणारे एक झुंझार व्यक्तिमत्त्व होते. दलित समाजात जन्मलेल्या, तळागाळातील वेदनेला जागतिक वारसा देणारे प्रतिभावंत, विश्वबंधुत्वाचे प्रतीक आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः’च्या भावनेने सर्वसामान्यांच्या मांगल्याची कामना करणार्या सांस्कृतिक वारशाचे ते पाईक होते. ज्यांचे आयुष्य संघर्षाच्या आगीत पोळून निघाले, ज्यांनी बालपणातच जगण्याचे दारिद्य्र आणि विषमतेचे अमानुष चटके सोसले, त्याच अण्णा भाऊंनी कोणतीही औपचारिक शाळा किंवा विद्यापीठाची पायरी न चढता, आपल्या अलौकिक प्रतिभेच्या आणि अफाट अध्ययनशीलतेच्या बळावर १०२ वैविध्यपूर्ण साहित्यकृतींची निर्मिती केली आणि मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. त्यांनी आपल्या लेखणीला प्रखर शस्त्र बनवले आणि शोषित, पीडित, दलित व उपेक्षितांच्या वेदनांना जगाच्या दरबारात वाचा फोडली.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दि. २९ जुलै २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, दि. १ ऑगस्ट रोजी राज्यभरात ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा केला जाणार आहे. यामागची मुख्य भूमिका ही आहे की, अण्णा भाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरांतील तरुण, विद्यार्थी आणि प्रतिभावंत प्रेरित व्हावेत, त्यांनी लिहावे आणि आपली स्वतंत्र प्रतिभा मराठी साहित्यात उमटवावी.
आजच्या डिजिटल युगात जिथे वाचन आणि लेखनाची आवड कमी होत चालली आहे, तिथे तरुणांमध्ये लेखणीची महती रुजवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या ‘लेखन प्रेरणा दिना’निमित्त विद्यार्थ्यांना विविध विषय देऊन त्यांच्यासाठी कविता, कथा आणि निबंधलेखन स्पर्धांचे आयोजन करणे; विविध विषयांवर वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करणे; तसेच स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती व व्याख्यानांचे आयोजन करणे यांसारखे उपक्रम राबवले जावेत. तसेच ग्रंथदिंडी काढून ग्रंथलेखनाचे व वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, अण्णा भाऊंच्या कथा, कादंबर्या, प्रवासवर्णने, लोकनाट्ये, तसेच शाहिरीचे विद्यार्थ्यांनी वाचन करणे आणि त्यांच्या साहित्यावर व व्यक्तित्व-कर्तृत्वावर चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा व साहित्य संमेलनांचे आयोजन करून प्रभावी वैचारिक मंथन घडवून आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अण्णा भाऊंच्या साहित्याचा ‘कॅनव्हास’ केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, तो अखिल भारतीय आणि जागतिक स्तरावर पसरलेला होता. त्यांची बहुआयामी प्रतिभा विविध रूपांतून प्रकर्षाने जाणवते. कादंबरीकार म्हणून ‘फकिरा’ ही त्यांची गाजलेली कादंबरी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करणार्या वीरांच्या सत्यघटनेवर आधारित असून, ही कृती त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केली होती, जो मराठी मातीतील शूरपणाचा आणि विद्रोहाचा अप्रतिम दस्तऐवज आहे आणि इलिनॉईस विद्यापीठ अमेरिका, मॉस्को विद्यापीठ, युनेस्प विद्यापीठ ब्राझील, ‘जेएनयू’ दिल्ली, केंद्रीय विश्वविद्यालय हैदराबाद, केंद्रीय विश्वविद्यालय कर्नाटक, मुंबई विद्यापीठ यांसारख्या आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय विद्यापीठांबरोबरच भारतातील अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात ‘फकिरा’च्या इंग्रजी भाषांतराने मानाचे स्थान मिळवले आहे.
इतकेच नाही, तर त्यांनी जागतिक घटकांना मराठी शाहिरीत स्थान दिले. मराठी भाषेला सातासमुद्रापार ओळख निर्माण करून देणार्या अण्णा भाऊ साठे या महान लेखकाच्या लेखणीचा सन्मान नसून, मराठी मनाला आणि नव्या पिढीला लेखणीची प्रेरणा, ताकद देणारा एक मोठा वैचारिक यज्ञ आहे. त्यांच्या या अफाट साहित्यात बंगाल, गोवा, तेलंगण, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटका, रशिया, जर्मनी, पाकिस्तान, भारत-पाकिस्तान युद्ध, कोरिया यांसारख्या विषयांवर गहन लेखन केले. हे करत असतानाच, महाराष्ट्राची समन्वयकारी लोकसंस्कृती यांचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद, महात्मा फुले यांची समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय या सर्व विचारांचा विराट संगम अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात आढळतो.
दलित साहित्यासह संपूर्ण मराठी साहित्यविश्वावर एका व्यापक दृष्टीने नजर टाकल्यास एक अनामिक थक्क करणार्या वास्तवाची प्रचिती येते. ज्यांना बालपणी शाळेचे उंबरठे नाकारले गेले, ज्यांनी पोटाच्या खळगीसाठी रानावनात कष्टप्रद कामे करत स्वनिर्मितीतून ज्ञानार्जन केले आणि पुढे जाऊन महाराष्ट्रधर्म, संस्कृती, भारतीयत्व, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या उच्च मूल्यांवर आधारलेले कसदार व प्रगल्भ साहित्य निर्माण केले; १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात अमरावती तुरुंगात ज्यांनी अमानुष हालअपेष्टा सहन केल्या; जे एकाच वेळी प्रतिभावंत लेखक, प्रखर पत्रकार, लोकशाहीर, कवी आणि चित्रपटसृष्टीत अभिनय करणारे अष्टपैलू नटही होते; ज्यांच्या अप्रतिम कादंबर्यांवर १९७०च्या दशकातच एकापाठोपाठ एक तब्बल आठ यशस्वी चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकले आणि ज्यांनी महाराष्ट्र, भारत, रशिया, चीनपासून जर्मनीपर्यंतच्या जागतिक पटलावर अभ्यासपूर्ण व मर्मभेदी लेखन केले असे अफाट कर्तृत्व आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेला दुसरा मराठी किंवा भारतीय लेखक शोधणे खरोखरच महाकठीण कार्य आहे. म्हणूनच, अण्णा भाऊ साठे यांच्या या अद्वितीय योगदानाची दखल घेऊन दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी मॉस्को रशिया येथील ‘मार्गारीटा रुडोमिनो ऑल रशिया फॉरेन लँग्वेज लायब्ररी’मध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला, ज्यामध्ये रशियाचे परराष्ट्र खात्याचे मंत्री, शिक्षणमंत्री, महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यामुळे राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये दि. १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. हा निर्णय केवळ १९५०च्या दशकातच मराठी भाषेला सातासमुद्रापार ओळख निर्माण करून देणार्या अण्णा भाऊ साठे या महान लेखकाच्या लेखणीचा सन्मान नसून, मराठी मनाला आणि नव्या पिढीला लेखणीची प्रेरणा, ताकद देणारा एक मोठा वैचारिक यज्ञ आहे. राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये दि. १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. ‘लेखन प्रेरणा दिना’च्या माध्यमातून हाच विचार घराघरांपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
प्रा. डॉ. बळीराम गायकवाड
(लेखक संचालक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, मुंबई विद्यापीठ व अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या इंग्रजी कादंबरीचे भाषांतरकार आहेत.)