मुंबई (Sharad Pawar NDA) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आल्यानंतर शरद पवार गट सत्तेत सामील होणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, "शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार, ही एक 'पेरलेली बातमी' आहे. या बातमीत किंवा सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही. आगामी काळात महाराष्ट्रातून 'एनडीए'मध्ये कोणत्याही नवीन पक्षाचा समावेश केला जाणार नाही", असे त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar NDA)
मुख्यमंत्री फडणवीस मंगळवार, दि. ७ जुलै रोजी सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काही महत्त्वाच्या राजकीय भेटीगाठी घेतल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांच्या पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी आणि ते एनडीएसोबत येण्याच्या शक्यतेविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना त्यांनी या सर्व चर्चांमधील हवा काढून घेतली.
फडणवीस म्हणाले की, "शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. आम्ही आमच्यासोबत आता कोणत्याही नवीन घटकाला किंवा पक्षाला जोडणार नाही. सध्या जे मित्रपक्ष सोबत आहेत, त्यांच्यासहच आगामी वाटचाल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Sharad Pawar NDA)
Mumbai, Maharashtra: On speculation about the NCP (SP) joining the NDA, NCP (SP) leader Rohit Pawar says, “We have been saying this from day one, but no one was willing to believe it. We are neither joining the NDA nor merging with the Congress party. Now that the Chief Minister… pic.twitter.com/jWW5NFOnPE
विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत शरद पवार यांचा पक्ष जर महायुती आणि केंद्र स्तरावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाला, तर पक्षाच्या वाट्याला सत्तेत काय वाटा येऊ शकतो, यावर सविस्तर खल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी लागलीच राष्ट्रवादीच्या आणखी एका अत्यंत वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन चर्चा केली. शरद पवार यांच्या पक्षात सध्या सत्तेत सहभागी होण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे. यातील एका गटाला सत्ताधारी बाकांवर बसण्याची इच्छा आहे, तर दुसरा गट विरोधी पक्षातच राहण्यावर ठाम आहे. (Sharad Pawar NDA)
या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी आपल्या पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यावर विधानसभेतील दहा आमदार आणि लोकसभेतील आठ खासदारांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्याची, तसेच भाजपच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकरणावर जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी मुंबईत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, ही बैठक केवळ अनौपचारिक चर्चेसाठी होती, असे सांगत त्यांनी यातील राजकीय तपशील जाहीर करण्याचे टाळले.
चर्चांमध्ये तथ्य नाही - सुप्रिया सुळे
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अशी कुठली बैठक झाल्याचे माहीत नाही. विनोद तावडे आणि मी देखील अनेकवेळा भेटलो आहे. आम्ही दोघेही संयुक्त संसदीय समितीत असल्याने मागच्या महिन्याभरात २१ वेळा भेटलो असू. ते एकटेच नाही तर भाजपाच्या अनेक लोकांशी माझी भेट झाली आहे. ज्या काही चर्चा वगैरे चालल्या आहेत त्याची मला खरेच गंमत वाटते आहे. अशा प्रकारच्या चर्चा मागच्या १२ वर्षांपासून सुरू आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.