आपल्या कीर्तन-प्रवचनांमधून धर्मविचारांचे तेज युवकांपर्यंत पोहोचविणार्या हभप संतोष महाराज सावंत यांची जीवनगाथा...
भारताचा अध्यात्मविचार हा विश्वकल्याणाचा विचार. या सत्त्वशील विचारगंगेचे प्रतिबिंब इथल्या संस्कृतीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. माणसाच्या जगण्यातील ‘श्रेयस’ नेमके काय? त्याचा शोध कसा घ्यावा? याची साधी, सोपी आणि सरळ उत्तरे देणारी माणसे इथे जन्मली. व्यक्तीच्या उन्नतीमधून समाजाचा उत्कर्ष होतो आणि समाजाच्या उत्कर्षातून राष्ट्राचा उत्कर्ष होतो, हा विचार आपल्या संतांनी आपल्याला दिला. आजही भजन-कीर्तन, हरिनाम सप्ताह अशा वेगवेगळ्या माध्यमांतून समाजाला जोडण्याचे, समाजातील दरी सांधण्याचे काम इथला अध्यात्मविचार तितक्याच निरंतरपणे करीत आहे. महाराष्ट्राला अशा कीर्तनकारांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील एक निःस्पृह कीर्तनकार म्हणजे हभप संतोषजी महाराज सावंत.
मूळचे रत्नागिरीचे असलेल्या संतोषजी महाराजांचे बालपण मुंबईत गेले. मुंबई माणसाला जगवते, वाढवते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घडवतेही. संतोष महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्माची, भगवंताची ओढ होती. त्यांचे शिक्षण शारदाश्रम शाळेत झाले. शाळेमध्ये शिकवले गेलेसे श्लोक ते नियमितपणे म्हणायचे, काळाच्या ओघात त्यांची आवड वाढत गेली. चौथीला असताना थर्माकोलचे कंदील तयार करून ते विकायचे. आपल्या हातून हजारो कंदील तयार करत त्यांनी, त्यांच्यातील कारागिराची आणि कलाकाराची चुणूकच दाखवली होती. लहानपणापासून त्यांना पोहण्यामध्ये विशेष रस होता. त्यांच्या या छंदामुळे त्यांच्या जीवनाची एक वेगळी वाट तयार झाली. काळाच्या ओघात ते पट्टीचे पोहणारे झाले. राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव कमावणार्या संतोषजींनी पुढे ‘पंचतारांकित हॉटेल्समध्ये ‘लाईफ गार्ड’ म्हणून नोकरी स्वीकारली.
याचदरम्यान, समुद्रामध्ये दोन तरुण बुडत असताना, त्यावेळी परवानगी घेऊन संरक्षण भिंतीवरून उडी मारून बुडत असलेल्या तरुणांनाही त्यांनी वाचवले. त्यावेळी महाराज ‘सिव्हील डिफेन्स’चे मेंबर असल्याचे त्यांना कळवले. त्यांच्यामुळे आणि हॉटेलच्या सहकार्याने सर्व वृत्तपत्रांत बातमी पसरली. १९८६ साली तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त डी. एस. सोमण यांच्या हस्ते संतोष महाराजांना ‘पायलट ऑफिसर सी. के. मानकर अॅवॉर्ड’ शौर्य पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले. अशाप्रकारे त्यांच्या जीवनातील यश, सन्मानाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत होता.
उद्योजकतेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी नवीन व्यवसाय उभारला. या व्यवसायातून त्यांना समृद्धी लाभली. भौतिकदृष्ट्या जीवनामध्ये ते वैभवसंपन्न झाले. वयाच्या तिसाव्या वर्षापूर्वीच त्यांनी आपल्या कष्टातून वैभव कमावले आणि याच काळात त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कारण, एका बाजूला भौतिकदृष्ट्या ते संपन्न होते. मात्र, यातून त्यांना आनंद, सुख मिळाले नाही. याच काळात बाबा महाराज सातारकर यांची वाणी त्यांच्या कानावर पडली आणि त्यांच्या जीवनाची संपूर्ण दिशाच बदलली. बाबा महाराज सातारकरांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या परमार्थ जीवनाची सुरुवात झाली.
अध्यात्माच्या प्रवासामध्ये संतोष महाराज सावंत यांनी आपला भोवताल नव्याने अनुभवला. या अनुभूतीतून त्यांना ईश्वर रूपाचे नव्याने दर्शन घडले. दोन दशकांच्या आपल्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक मठांना भेटी दिल्या. परमार्थाच्या वाटेवर माऊलींच्या ओव्यांनी त्यांच्यातील चैतन्य जागृत केले. माऊलींच्या ‘ज्ञानेश्वरी’तील हाच अध्यात्मविचार त्यांनी आपल्या वाणीतून पुढे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ‘पंढरपूरची वारी’ अनुभवणारे असंख्य भक्तगण आज आपल्याला अवतीभोवती बघायला मिळतात. मात्र, वारी नेमकी कशी अनुभवायची, याचा विचार केवळ संतोष महाराज सावंत यांच्यासारखी जाणकार व्यक्तीच देऊ शकते.
परमार्थाचा हा विचार तळागाळापर्यंत पोहोचायला हवा, यासाठी गेली २६ वर्षे राज्याच्या कानाकोपर्यात संतोष महाराज सावंत कुठलेही शुल्क न आकारता कीर्तनसेवा देत आहेत. २०२० झाली पालघर येथे दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. धर्माभिमानी लोकांच्या मनामध्ये भीती पसरवण्यासाठी काही विशिष्ट समाजघटकांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाला दुसरेच वळण लावले. मात्र, खर्या अर्थाने, धर्मासाठी काम करणार्या सत्त्वशील माणसांना कुणीही घाबरवू शकत नाही, थांबवू शकत नाही. पालघरसारख्या दुर्गम भागात पाच दिवसांत १८ गावांचा प्रवास त्यांनी केला. प्रवचनांच्या माध्यमातून समाजजागृतीचे काम केले. काळाच्या ओघात या गावांमध्ये असलेले धर्मांतरित बांधव पुन्हा एकदा हिंदू धर्मात परतले.
कीर्तनातून समाजजागृतीचे काम करता-करता समाजसेवेचे व्रतसुद्धा त्यांनी हाती घेतल्याचे दिसून येते. आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना भोजन देणे असो किंवा शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे असो, या कार्यासाठी सढळ हातांनी संतोषजी महाराज सावंत नेहमीच पुढे असतात. दरवर्षी पावसाळ्यात गावागावांत शेकडो फळ झाडांचे वाटप करणे असो किंवा दिवाळीत फराळाचे वाटप करणे, संतोषजी महाराज सावंत यांच्यातील सेवाव्रती नेहमीच जागृत असतो. ‘धर्मजागरण’ संस्थेच्या माध्यमातून आजच्या युवाशक्तीच्या मनामध्ये धर्मविचार, राष्ट्रविचार पेरण्याचे ते काम करतात.
नव्या पिढीच्या भवितव्यासंबंधी आपले विचार मांडताना ते म्हणतात की, "या नव्या पिढीकडे सर्वकाही आहे. मात्र, आपण त्यांना प्रेम दिले आहे का? त्यांच्यावर संस्कार केले आहेत का? आजच्या या पिढीला जर का समस्यांतून मुक्त व्हायचे असेल, तर त्यासाठी परमार्थाची अनुभूती आवश्यक आहे. आजच्या घडीला आपली संस्कृती, आपला राष्ट्रविचार जपणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांच्या या निःस्पृह कार्यासाठी हभप संतोष महाराजांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!