‘वंदे भारत कार्गो’ची यशस्वी धाव! भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत नवे पर्व

Vande Bharat Cargo
 
प्रवाशांनंतर आता मालवाहतुकीतही ‘वंदे भारत’ची दमदार एंट्री झाली आहे. देशातील पहिल्या ‘वंदे भारत कार्गो’ ट्रेनने १४५ किमी प्रतितास वेग गाठत ‘आत्मनिर्भर भारता’च्या रेल्वे तंत्रज्ञानाची ताकद जगासमोर सिद्ध केली आहे. ‘विकसित भारत’च्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यानिमित्ताने...
 
भारतीय रेल्वे म्हटले की, डोळ्यांसमोर सर्वप्रथम उभी राहते, ती प्रवासी वाहतूक. दररोज कोट्यवधी नागरिकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणारी ही व्यवस्था देशाची जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, भारतीय रेल्वेची आणखी एक तितकीच महत्त्वाची जबाबदारी म्हणजे मालवाहतूक. दरवर्षी १.४ अब्ज टनांहून अधिक माल रेल्वेमार्गे देशाच्या कानाकोपर्‍यांत पोहोचतो. उद्योग, शेती, औषधनिर्मिती, ई-कॉमर्स, निर्यात, बंदरे आणि उत्पादन क्षेत्र यांचा कणा असलेल्या या व्यवस्थेला आता अभूतपूर्व वेग मिळणार आहे. कारण, भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या ‘वंदे भारत फ्रेट ईएमयू’ अर्थात ‘वंदे भारत कार्गो’च्या चाचण्यांना सुरुवात केली आहे.
 
कोटा विभागात सुरू असलेल्या या चाचण्यांमध्ये अत्याधुनिक मालवाहू रेल्वेने १४५ किमी प्रतितास वेग गाठत भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवा टप्पा गाठला आहे. हा केवळ एका नव्या गाडीचा प्रवास नाही; तर भारताच्या लॉजिस्टिक्स, औद्योगिक विकास आणि ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेला गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
 
मालवाहतुकीतही ‘वंदे भारत’
 
२०१९ मध्ये सुरू झालेली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणाचे प्रतीक ठरली. देशभरातील १६२ मार्गांवर धावणार्‍या या गाड्यांनी वेग, सुरक्षितता आणि प्रवाशांचा अल्पावधीतच विश्वास जिंकला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या गाड्यांचा सरासरी प्रवासी भराव १०२ टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला. या यशानंतर भारतीय रेल्वेने त्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालवाहतुकीसाठी स्वतंत्र ‘फ्रेट ईएमयू’ विकसित केली आहे. चेन्नईतील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ येथे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार झालेला हा १६ डब्यांचा रेक पूर्णपणे भारतीय अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक आहे. स्वदेशी डिझाईन, आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील लॉजिस्टिस गरजा लक्षात घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
 
१४५ किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी
 
दि. २९ जुलै रोजी कोटा विभागात या ‘फ्रेट ईएमयू’च्या चाचण्यांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विविध टप्प्यांमध्ये १२०, १३५ आणि अखेरीस १४५ किमी प्रतितास इतका वेग नोंदवण्यात आला. रेल्वे सुरक्षा, ब्रेकिंग प्रणाली, ट्रॅकवरील स्थिरता, वळणांवरील कार्यक्षमता आणि उच्च वेगातील नियंत्रण या सर्व बाबींची तपासणी संशोधन रचना आणि मानके संघटना करत आहे. पुढील महिनाभर या गाडीवर ‘ऑसिलेशन ट्रायल्स’, ‘इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स’, ‘कपलर फोर्स’, ‘ट्रॅशन’, ‘रीजनरेटिव्ह एनर्जी’, सिग्नलिंग, दूरसंचार, दारांची कार्यक्षमता, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही आणि ऑनबोर्ड प्रणालींच्या विविध चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
 
पारंपरिक मालगाड्यांपेक्षा कितीतरी पुढे
 
आज भारतातील बहुतांश मालगाड्यांचा सरासरी वेग ५० ते ६० किमी प्रतितास असतो. अनेक वेळा उद्योगांना वेळेवर पुरवठा न होणे, बंदरांवरील विलंब, कोल्ड-चेनमध्ये अडथळे आणि रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण ही मोठी आव्हाने ठरतात. याच्या तुलनेत ‘वंदे भारत फ्रेट ईएमयू’चा अपेक्षित सरासरी कार्यरत वेग ८० ते ९० किमी प्रतितास आहे. त्यामुळे दिल्ली एनसीआर ते मुंबईसारख्या सुमारे १ हजार, ४०० किमीच्या औद्योगिक मार्गावर माल पोहोचण्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
 
शेतकर्‍यांपासून औषध उद्योगापर्यंत सर्वांसाठी लाभ
 
भारतामध्ये दरवर्षी लाखो टन फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य उत्पादने अपुर्‍या कोल्ड-चेनमुळे खराब होतात. ‘वंदे भारत कार्गो’मध्ये ‘रीफर कोच’ तापमान नियंत्रित वाहतूक, फोर्स्ड व्हेंटिलेशन आणि आधुनिक पार्सल सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे, शेतकर्‍यांचा ताजा माल दूरच्या बाजारपेठांमध्ये जलद पोहोचेल. दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता टिकेल. औषध उद्योगाला तापमान नियंत्रित वाहतुकीची विश्वासार्ह सुविधा मिळेल. लस, जैवतंत्रज्ञान उत्पादने आणि संवेदनशील औषधांची सुरक्षित वाहतूक शय होईल. शेतातून थेट बाजारपेठेपर्यंत हा प्रवास अधिक वेगवान आणि परिणामकारक करण्यासाठी ही मोठी पायरी ठरणार आहे. वेग पाच किमी प्रतितासापेक्षा जास्त होताच, सर्व दरवाजे स्वयंचलितपणे लॉक होतात. सर्व दरवाजे पूर्णपणे बंद असल्याची खात्री झाल्याशिवाय गाडी सुरूच होत नाही. सुरक्षिततेसाठी ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे.
 
कोटा विभागाची निवड का?
 
राजस्थानातील कोटा विभाग गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेच्या उच्च वेग चाचण्यांचे प्रमुख केंद्र बनला आहे. उत्कृष्ट ट्रॅक गुणवत्ता, आधुनिक सिग्नलिंग, सुरक्षित कॉरिडोर आणि तांत्रिक पायाभूत सुविधा यांमुळे अनेक अत्याधुनिक रेल्वे प्रकल्पांच्या चाचण्या याच विभागात यशस्वीपणे पार पडल्या आहेत. देशातील पहिल्या ‘वंदे भारत फ्रेट ईएमयू’ची चाचणी याच मार्गावर होत असल्याने भारतीय रेल्वेच्या तांत्रिक क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
 
‘विकसित भारत’च्या दिशेने निर्णायक पाऊल
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व गती दिली आहे. महामार्ग, बंदरे, समर्पित मालवाहतूक कॉरिडोर, मल्टीमॉडेल लॉजिस्टिस पार्क, गतिशक्ती राष्ट्रीय आराखडा आणि आता ‘वंदे भारत फ्रेट ईएमयू’ ही त्याच दूरदृष्टीची पुढची पायरी आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी केवळ कारखाने उभारणे पुरेसे नसते; तर उत्पादन वेळेत आणि कमी खर्चात देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्याची सक्षम वाहतूक व्यवस्था आवश्यक असते. ‘वंदे भारत कार्गो’ ही त्या राष्ट्रीय गरजेची आधुनिक आणि स्वदेशी पूर्तता आहे.
 
‘भारत गौरव’ची नवी ओळख
 
एकेकाळी आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानासाठी परदेशांकडे पाहणारा भारत आज स्वतः अत्याधुनिक रेल्वे संच विकसित करत आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसनंतर आता ‘वंदे भारत फ्रेट ईएमयू’ ही त्याच आत्मनिर्भरतेची पुढची झेप आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पना केवळ घोषवाक्ये राहिलेल्या नाहीत; त्या प्रत्यक्ष रेल्वेच्या रुळांवर धावताना दिसत आहेत. जर या चाचण्या यशस्वी ठरल्या, तर भविष्यात देशातील प्रमुख औद्योगिक आणि मालवाहतूक मार्गांवर अशा वेगवान ‘फ्रेट ईएमयू’ धावू शकतील. त्यातून उद्योगांना नवी ऊर्जा, शेतकर्‍यांना मोठी बाजारपेठ, निर्यातदारांना स्पर्धात्मकता आणि भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळ मिळेल. भारतीय रेल्वेची ‘वंदे भारत’ कथा प्रवाशांपासून सुरू झाली होती. आता ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मालवाहतुकीलाही वेग देण्यासाठी सज्ज झाली आहे. १४५ किमी प्रतितास वेगाने धावणारी ‘वंदे भारत कार्गो’ ही केवळ एक मालगाडी नाही, तर नव्या भारताच्या वेगवान, आत्मनिर्भर आणि जागतिक दर्जाच्या भविष्याची धावती घोषणा आहे.
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘वंदे भारत कार्गो’
 
१६ डब्यांची आधुनिक रचना
३९७ टनांहून अधिक पेलोड क्षमता
२०.३२ टन अ‍ॅसल लोड
न्यूमॅटिक रिट्रॅटेबल रोलर फ्लोअर
प्रत्येक डब्यात चार स्वयंचलित रुंद स्लायडिंग दरवाजे
एलईडी प्रकाश व्यवस्था
सीसीटीव्ही देखरेख
अग्निशमन व अग्निशोधक प्रणाली
कंटेनर लॉकिंग व्यवस्था
आधुनिक ब्रेकिंग आणि प्रोपल्शन प्रणाली
‘कवच’ स्वदेशी अ‍ॅण्टी-कोलिजन सुरक्षा प्रणाली
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर